कोविड नियमांचे काटेकोरपणे पालन होईल याकडे लक्ष देणे आवश्‍यक - जिल्हाधिकारी

संगमनेर Live
0
संगमनेर Live (अहमदनगर) | जिल्‍ह्यात नववर्षाचे स्वागत करताना धार्मिक स्थळी, पर्यटन स्थळे तसेच कोणत्याही कार्यक्रमात, नागरीकांची जास्त गर्दी होणार नाही तसेच, सामाजिक अंतर पाळले जाईल व कोविडच्‍या सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन होईल याबाबत स्‍थानिक प्रशासनाने लक्ष देणे आवश्‍यक आहे  अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी संबंधित यंत्रणांना दिल्‍या. 

जिल्हाधिकारी कार्यालयात कोविड १९ चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी, प्रतिबंधात्मक उपाय योजना बाबत, सर्व उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी, यांच्याशी दूरदृश्य प्रणालीद्वारे आयोजित बैठकीत श्री. भोसले बोलत होते.

यावेळी बैठकीत, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र शिरसागर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. रामटेके, निवासी उपजिल्हाधिकारी संदीप निचित, आरोग्य विभाग आणि पोलिस विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

श्री. भोसले म्हणाले, जिल्ह्यामधील, धार्मिक स्थळे व पर्यटन स्थळे येथे नागरिकांची जास्त गर्दी होणार नाही, त्यासाठी संबंधित प्रांताधिकारी तहसिलदार आणि गट विकास अधिकारी, पोलीस अधिकारी यांनी, नियंत्रण ठेवण्‍यासाठी प्रत्येक ठिकाणी पथकाची नेमणूक करावी. नवीन वर्षाच्या स्वागतासाठी नागरिकांची संभाव्य गर्दी लक्षात घेऊन, या बाबतचे नियोजन स्‍थानिक प्रशासनाने करावे, अशा सूचना त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्‍यात. 

जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता आणि प्रशासनातर्फे जाहीर करण्यात आलेल्या प्रतिबंधात्‍मक आदेशाचे काटेकोरपणे पालन होत आहे किंवा नाही, याबाबत पाहणी करून नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर तात्काळ कारवाई करावी. त्याबाबतचा अहवाल प्रशासनास सादर करावा. कोविडचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी, कोविड चाचण्यांची संख्या वाढवावी. तसेच कोरोना लसीकरणाचे प्रमाण वाढले पाहिजे यासाठी नियोजन करावे, गावात व तालुक्यात १०० टक्के लसीकरण लवकर कसे पूर्ण होईल, याबाबत नियोजन करावे. संभाव्य तिसरा लाटेचा धोका लक्षात घेता आणि जिल्‍ह्यातील वाढती रुग्ण संख्या या दृष्‍टीने आरोग्य विभागाने रुग्णालयातील बेडची संख्या, ऑक्सिजन व्यवस्था, अतिदक्षता विभागातील सेवा सुविधा, औषधसाठा याबाबत सुद्धा नियोजन करणे आवश्यक आहे. 

प्रशासन व आरोग्य यंत्रणा यांनी सतर्क रहावे, आरोग्य विभागाने रुग्णालयातील फायर ऑडिट, सेफ्टी ऑडिट, स्ट्रक्चर ऑडिट बाबत दक्षता घ्यावी, अशा सूचना ही त्यांनी बैठकीत दिल्या. कोविड आजारामुळे मृत पावलेल्या व्यक्तीच्या वारसाला शासनातर्फे जाहीर केलेल्या ५० हजार रुपये आर्थिक मदतीबाबतच्‍या प्रकरणांचा आढावा यावेळी त्‍यांनी घेतला. या बैठकीत महसूल विभागातर्फे राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांच्या कामकाजाचा सुध्‍दा आढावा घेण्‍यात आला.

अधिनियम 1897 कलम 2(1) नुसार कोरोना प्रतिबंध आदेश जारी..

कोरोना विषाणूच्या ओमायक्रॉन व्हेरियंटचा प्रसार रोखण्यासाठी आणि उपाययोजना करणे कामी जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 आणि साथरोग अधिनियम 1897 च्या नियमावलीनुसार त्यांना प्राप्त अधिकारानुसार जिल्हयात ३१ डिसेंबर रोजीचे रात्री १२ वाजेपासून पुढीलप्रमाणे प्रतिबंधात्मक निर्बंध आदेश जारी केले आहेत. 

त्यानुसार विवाह समारंभ, बंद किंवा मोकळया जागेत आयोजित करताना उपस्थितांची संख्या जास्तीत जास्त ५० पर्यंत मर्यादित ठेवण्याचे आदेशित केले आहे. तसेच, कोणत्याही मेळावे, कार्यक्रमाच्या बाबतीत मग ते सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय अथवा धार्मिक कार्यक्रम बंद जागेत अथवा मोकळया जागेत आयोजित करताना उपस्थितांची संख्या जास्तीत जास्त ५० पर्यंत मर्यादित ठेवण्याचे आणि अंत्यविधीसाठी जास्तीत जास्त २० व्यक्तीपर्यंत मर्यादित ठेवण्याचे आदेशित केले आहे. 

या आदेशाचे उल्‍लंघन केल्‍यास आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 व साथरोग अधिनियम 1897 च्या तरतूदीनुसार भारतीय दंड संहिता च्या कलम 188 नुसार दंडनिय व कायदेशीर कारवाईस पात्र राहतील असेही त्यांनी आदेशित केले आहे.

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !