◻ डॉ. आण्णासाहेब शिंदे स्मृती पुरस्कार डॉ. सुधीर भोंगळे यांना दिला जाणार.
संगमनेर Live | सहकारातील दिपस्तंभ व दंडकारण्य अभियानाचे प्रणेते थोर स्वातंत्र्य सेनानी सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात व कृषी औद्योगिक क्रांतीचे प्रणेते डॉ. अण्णासाहेब शिंदे यांच्या जयंतीनिमित्त सहकार, समाजसेवा, पर्यावरण, पत्रकारिता या क्षेत्रात उल्लेखनिय कार्य असणाऱ्या व्यक्तिंसाठाच्या स्वातंत्र्यसैनिक भाऊसाहेब थोरात स्मृती पुरस्काराने ज्येष्ठ विचारवंत, लेखक डॉ. अण्णासाहेब हरि साळूंखे यांना तर कृषी, शिक्षण,साहित्य व संशोधन या क्षेत्रात उल्लेखनिय कार्य असणाऱ्या व्यक्तिंसाठीचा डॉ. अण्णासाहेब शिंदे स्मृती पुरस्कार ज्येष्ठ पत्रकार,लेखक व कृषी तज्ञ डॉ. सुधीर भोंगळे यांना जाहिर झाला आहे.
सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या जयंती निमित्त कारखाना कार्यस्थळावरील प्रेरणास्थळ येथे अभिवादन कार्यक्रमात या पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. आ. डॉ. सुधीर तांबे, बाजीराव खेमनर, सौ. दुर्गाताई तांबे, ॲड. माधवराव कानवडे, बाबासाहेब ओहोळ, प्रा. बाबा खरात, केशवराव जाधव, कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर आदि उपस्थित होते.
महसूलमंत्री नामदार बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली दरवर्षी जयंती महोत्सवानिमित्त भव्य दिव्य पुरस्कार वितरण वैचारिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. यासाठी राज्य व राष्ट्रीय पातळीवरील विविध मान्यवरांच्या उपस्थित पुरस्कार वितरण व सांस्कृतिक क्षेत्रातील दिग्गज कलाकारांच्या उपस्थितीत सांस्कृतिक कार्यक्रम होत असतो. परंतू कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हा कार्यक्रम पुढे ढकलण्यात आला असून या निमित्त पुरस्कार जाहीर करण्यात आले आहे.
अमृतवाहिनी शेती व शिक्षण विकास संस्थेच्या वतीने सहकार, समाजसेवा, पर्यावरण या क्षेत्रात उल्लेखनिय कार्य असणाऱ्या व्यक्तिंसाठी स्वातंत्र्यसैनिक भाऊसाहेब थोरात स्मृती पुरस्काराने ज्येष्ठ विचारवंत, लेखक डॉ. अण्णासाहेब हरि साळूंखे यांना जाहिर झाला आहे.
डॉ. आ. ह. साळूंखे विचारवंत व्याख्याते व गाढे अभ्यासक असून त्यांचे अंधाराचे बुरुज ढासाळतील, एकलव्य, प्राईड ऑफ स्वराज्य, उमाजी राजे नाईक, तुकारामांचा शेतकरी, विद्रोही तुकाराम यांसह ६० पुस्तके प्रकाशित झाले आहे. त्यांना राज्य पातळीवरील विविध पुरस्कार मिळाले असून महाराष्ट्रात ४० हजार किमी चा प्रवास करुन त्यांनी अनेक व्याख्याने दिली आहेत. कृषी, शिक्षण, साहित्य व संशोधन या क्षेत्रात उल्लेखनिय कार्य असणाऱ्या व्यक्तिंसाठीचा डॉ. अण्णासाहेब शिंदे स्मृती पुरस्काराने ज्येष्ठ पत्रकार, लेखक व कृषी तज्ञ डॉ. सुधीर भोंगळे यांना जाहीर झाला आहे.
डॉ. सुधीर भोंगळे यांनी विविध वृत्तपत्रांमध्ये वरिष्ठ पदावर काम केले असून शेतीवर वादळ मळा, विकास वाटा, पाणीदार जलचिंतन यांसह १० पुस्तके तर नुकतेच शरद पवार यांच्यावर नेमकचि बोलणे हे चरित्र ग्रंथण प्रकाशित झाले आहे. शेती, पाणी, सहकार, ऊर्जा अशा मुलभूत विषयांवर देशातील व परदेशातील विद्यापीठांमध्ये त्यांची व्याख्याने झाली आहे. या दोन ही व्यक्तींना कोरोना नंतर विशेष कार्यक्रमात एक लाख रुपये रोख व सन्मान चिन्ह देवून गौरविण्यात येणार असल्याची घोषणा आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी निवड समितीच्या वतीने केली आहे.
या निवड समितीमध्ये कृषीरत्न विजय अण्णा बोऱ्हाडे, आ. डॉ. सुधीर तांबे, उल्हास लाटकर, डॉ. राजीव शिंदे, उत्कर्षा रुपवते, प्रा. बाबा खरात, केशवराव जाधव यांचा समावेश आहे.