◻ पत्र पाठवून केले कौतुक ; सोमनाथ गिते हे शिबलापूर येथिल रहिवासी
संगमनेर Live | महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी तसेच राज्याचे महसूलमंत्री ना. बाळासाहेब थोरात यांनी सोमनाथ गिते यांच्या लिखाणाचे कौतुक केले आहे. गिते यांनी मागील काही काळापासून व्यसनमुक्तीवर सातत्याने लिखाण केले असून यामधून त्यांनी तंबाखू, सिगारेट, दारूसारख्या व्यसनाधीनतेतून समाजाचे झालेले नुकसान आणि सद्यस्थिती मांडण्याचा सातत्याने प्रयत्न केला. याची दखल घेत राज्यपाल कोश्यारी म्हणाले की सोमनाथ गिते समाजासाठी चांगले काम करत आहेत.
सोमनाथ गिते हे संगमनेर तालुक्यातील शिबलापूर येथिल रहिवासी असून नोकरीनिमित्त पुणे येथे वास्तव्यास आहेत. आपली नोकरी साभाळून त्यानी आघाडीची वर्तमानपत्रे तसेच अन्य माध्यमांतून व्यसनामुळे समाजाच्या झालेल्या नुकसानाचे भीषण वास्तव मांडले आहे.
गिते यांच्या याच कामाचे कौतुक कोश्यारी यांनी एका पत्राद्वारे करताना म्हटले कि, समाजामध्ये व्यसनाचे भीषण परिणाम दिसत आहेत. व्यसनाचे दुष्परिणाम एकट्या व्यक्तीला नाही तर, संपूर्ण कुटुंबाला भोगावे लागतात. तुम्ही केलेल्या लिखाणाचा फायदा समाजाला होत आहे. शाळा, महाविद्यालयांत व्यसनमुक्त विद्यार्थी घडण्यासाठी याचा फायदा होईल असेही राज्यपालांनी पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे.
यापूर्वी राज्याचे महसूलमंत्री ना. बाळासाहेब थोरात यांनी पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे की, तुम्ही केलेल्या लिखाणाचा फायदा व्यसनमुक्त समाज घडण्यासाठी होत आहे. तर मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्राच्या संचालिका श्रीमती मुक्ता पुणतांबेकर यांनी देखील गिते यांच्या कामाची दखल घेत त्यांच्या कामाचे कौतुक केलेले आहे.