◻ जनसेवा मंडळाच्या इशाऱ्यानतंर ग्रामपंचायतीकडून प्रसिद्धीपत्रक
संगमनेर Live | संगमनेर तालुक्यातील आश्वी बुद्रुक येथे ग्रामपंचायतीकडून सुरू असलेलेल्या विकास कामावर जनसेवा मंडळाच्या प्रमुख कार्यकर्त्यानी आक्षेप घेत प्रसिद्धी पत्रकाद्वारे आंदोलनाचा इशारा दिला होता. त्यामुळे अमरेश्वर मंडळ व आश्वी बुद्रुक ग्रामपंचायतीने हे सर्व आरोप नाकारले असून यावेळी प्रसिद्धीसाठी दिलेल्या पत्रकात सरपंच महेश गायकवाड यानी विरोधक गावात जातीय तणाव निर्माण करून अशांतता निर्माण करण्याचा प्रयत्न करत असल्याचा गंभीर आरोप केला आहे.
प्रसिद्धीसाठी दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, गावात सर्वाधिक विकास कामे योग्य त्या कायदेशीर मार्गाने सुरू असून त्यावर सर्वसामान्य जनता खुश असल्याने विरोधकांना पोटशूळ उठला आहे. ना. बाळासाहेब थोरात, आ. डॉ. सुधीर तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली सध्या आश्वी बुद्रुक येथे मोठ्या प्रमाणावर विकास कामे सुरू असून त्यामध्ये गावातील रस्ते, शॉपिंग सेंटर, सुसज्ज ग्रामपंचायत कार्यालय, गाळे बांधकाम, सार्वजनिक शौचालय, मुतारी यासारख्या असंख्य विकास कामांचा समावेश आहे.
ज्यांनी गावच्या पाणी योजनेसाठी आलेले दोन कोटी रुपये भ्रष्टाचार करून लाटले, त्यांना ही विकास कामे सहन होत नसल्याने त्यांचा आटापिटा सुरू असल्याचे म्हटले असून कोणतीही विकास कामे ही ग्रामसभेच्या माध्यमातून पार पाडली जातात. परंतु आमचे विरोधक मात्र जनता त्यांना पाणी योजनेचा हिशोब विचारतील या भीतीने कधीही ग्रामसभेला फिरकत नसतात, मग त्यांना ग्रामसभेत काय चालू आहे कसे समजणार.? मुळात आश्वी सारख्या मोठ्या गावात ग्रामसभा आयोजन करण्यापूर्वी लाऊडस्पिकरवर दवंडी देऊन रितसर प्रसिद्धी देऊन ग्रामसभेच आयोजन केलं जातं, मग अशा वेळी सभेला यायला विरोधकांना अडकले कुणी.? असा सवाल उपस्थित करण्यात आला आहे.
लकी ड्रॉ साठी गोळा केलेला एक ना एक रुपया हा बँक खात्यात सुरक्षित असून कोरोना कालखंडात लॉकडाऊन मुळे सोडत जाहीर करण्यास उशीर झाला. परंतु यामध्ये आयोजकांचा कोणत्याही स्वरूपाचा दोष नसून लवकरच लकी ड्रॉ सार्वजनिक रित्या घोषित करणार असून पै ना पै चा हिशोब देणार असल्याचे स्पष्ट केले आहे. विरोधक हे जातीयवाद करत असून ज्यांनी ह्या देशाचे संविधान लिहिले त्या डॉक्टर आंबेडकर यांच्या मानवंदना स्तंभाच्या प्रस्तावित कामास जातीयवादी मानसिकतेतून विरोध करत असून हे अत्यंत दुर्दैवी असल्याचे नमुद करण्यात आले असून गावात जातीय सलोखा आणि शांतता राखण्यासाठीच स्तंभ आवश्यक असल्याचे म्हटले आहे. परंतु विरोधक अतिक्रमण हे गोंडस नाव देऊन जातीयवादाचा छुपा अजेंडा चालवत असल्याचं गंभीर आरोप करण्यात आला आहे.
स्मशानभूमी विकास कामासाठी आ. डॉ. सुधीर तांबे तसेच ग्रामपंचायत वित्त आयोगाच्या माध्यमातून २० लाखांचा निधी मंजूर करण्यात आलेला असून गेल्या ४० वर्षापासून स्मशानभूमी अत्यंत खराब अवस्थेत होती. विरोधक तेव्हा सत्तेत होते, तेव्हा का त्यांना ही दुर्गधी किंवा कचरा दिसला.? असा प्रशन उपस्थित करत स्मशानभूमीत कचरा टाकण्याची सुरुवातचं विरोधकांकडे सत्ता असताना झाल्याचे म्हटले आहे. तसेच जीर्ण व धोकादायक झालेली नारळाची झाडे काढण्यासाठी रितसर परवानगी घेऊनच काम सुरू असल्याचे म्हटले आहे.
गावात बाजार तळावर समाजकल्याण विभागाचे जे खेळणी साहित्य बसवले आहे तिथे गावातील सर्व लहान थोर मुले आणि जनता एकत्र येऊन त्याचा आनंद उपभोगत आहेत आणि मुलांना आणि थोरा मोठ्यांना मनोरंजनाचे एक उत्कृष्ट साधन उपलब्ध झाले आहे. जनता त्या कामावर प्रचंड खुश असून तिथे खेळणी साहित्य बसविल्या बद्दल कोणाचीही तक्रार नसताना जनतेचा आणि बाळ गोपाळांचा आनंद विरोधकांना पाहवत नसल्याचे म्हटले आहे.
गावातील सर्व अवैध धंदे हे विरोधकांच्या आशीर्वादाने छुप्या पद्धतीने सुरू असून त्यावर लवकरच पोलिस स्टेशन येथे रीतसर निवेदन देऊन कारवाईची मागणी आक्रमक रित्या करणार असल्याचे सागून नुकत्याच झालेल्या पोटनिवडणूकित जनतेने निसटते बहुमत देऊन विरोधकांना त्यांची जागा दाखवून दिल्याने त्यांचा जळफळाट सुरू असल्याचा टोला लगावला आहे. पाण्यासारख्या पुण्याच्या योजनेत भ्रष्टाचार करणाऱ्या जातीवादी मानसिकतेच्या लोकांना जनता थारा देणार नसल्याचे म्हटले आहे.
दरम्यान या प्रसिद्धीपत्रकावर सरपंच महेश गायकवाड, उपसरपंच राहुल जऱ्हाड यांच्या सह्या आहेत.