आई साठी काय लिहू,
आई साठी कसे लिहू,
आई साठी पुरतील एवढे
शब्द नाहीत कोठे,
आई वरती लिहीण्याइतपत
नाही माझे व्यक्तिमत्व मोठे.!
असं म्हणतात की, देव स्वतः या जगात येऊ शकत नाही म्हणून त्याने आईला या जगात पाठविले. आपल्या सर्वाच्याच आयुष्यात आईचे महत्वपूर्ण असे स्थान असते व त्याबद्दल शब्दात सांगणे कठीण असते म्हणूनचं आई म्हणजे देवाचं दुसरं रूप असते. भारताचे माजी राष्ट्रपती भारतरत्नं डॉ. अब्दुल कलाम यानी आपल्या वडीलाच्या निधनानतंर भावना व्यक्तं करताना म्हटले होते की, जगाच्या दृष्टीने तो एक वृध्द व्यक्तीचा मृत्यू होता. त्यामुळे त्याना श्रध्दांजली वाहण्यासाठी कोणतीही सभा झाली नाही, ध्वजही अर्ध्यावर उतरवले गेले नाही. अथवा मृत्यूलेख लिहून वर्तमानपत्रानी ही त्याना आदरांजली वाहिली नाही. याचं भावना माझ्यासुध्दा आहेत. कारण माझी आई कोणी बुध्दिवंत नव्हती, ती राजकीय नेता अथवा धनाढ्य उद्योगपती ही नव्हती. मात्र देवाने जसे तिला या पृथ्वीवर साधे अन् पारदर्शक पाठवले तसेचं ती आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यत जगली.
माझी आई कै. गं. भा. मथुराबाई ठकाजी पाटील होडगर हिने कानिफनाथाच्या पवित्र परिसरात वयाच्या १०६ व्या वर्षी शेवटचा श्वास घेतला व परमेश्वराकडे ती निघुन गेली. तिच्या पश्चात २ मुले, ३, सुना, ३ मुली, जावई, १४ नातु, १६ नाती, नातु, नातसुना असे १४० ते १५० लोकाचे मोठे कुटुंब एक परिवार म्हणून घट्ट बंधनात बाधुन ठेवत समाजात एक कुटुंब म्हणून समाजमान्यता ही मिळवून दिली. आज आमचे कुटुंब राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, वैदकीय, कृषी, प्रशासन आदि क्षेत्रात नाव उचावत असले तरी त्यामागे तिची प्रेरणा व आशिर्वाद हेचं मुळ आहे.
माझ्या आईने आयुष्यभर मांगल्याची आराधना केली. ती नाईलाज म्हणून नव्हे तर एक जीवनमुल्य म्हणूनचं तिने आयुष्यात चांगल्याचाचं अवलंब केला. त्यासाठी तिला अपार कष्ट करावे लागले. जसजशी वयाची वर्ष वाढत गेली तसे तिच्या आयुष्यातील हिन जळून गेले अन् फक्त त्यांच्यात जे देवत्व शिल्लक होते तेच हळूहळू फूलत गेले. त्या देहरूपी मृत्यूने शेवटचे हिन अनंतात विलीन झाले. उरले ते सोन्यासारखे देवत्न, ते ईश्वराकडे परत गेले. ठरवलेल्या स्वर्गाच्या वाटेवर जाऊन पावन झाले.
माझ्या आईच्या आयुष्याकडे, जीवन विषयक व्यवहाराकडे पाहिले की मला नवीन पिढीसाठी तिच्या स्वभाव वैशिष्ट्याविषयी नमुद करणे आवश्यक वाटते. निजामांच्या राजवटीतील वैजापूर तालूक्यातील सावखेड गंगा या गावी ठोंबरे परिवारात तिचा जन्म झाला. त्याकाळात तिचे शिक्षण ऊर्दू माध्यमातून इयत्ता ४ थी पर्यंत झाले. तिचे चुलते मोठ्याबाबा ठोंबरे हे त्याकाळी ग्रामीण भागातून ७ वी पर्यत शिकले होते. त्यामुळे तुलनात्मकदृष्टया त्यांचा जीवनमानाचा स्तर बऱ्यापैकी होता. त्या वातावरणाचा परिणाम बालपणीच तिच्या मनावर बिंबलेला असावा तिची आई लहानपणीच वारल्याने तिची चुलत बहिण श्रीमती तान्हाबाई केसकर (त्याकाळातील एक श्रीमंत कुटुंब) यांनी माझ्या आईचा साभाळ केला. लग्नानंतर तिचे संपूर्ण आयुष्य आश्वी बुद्रुक या गावात गेले. आमचे ग्रामीण भागातील अत्यंत गरीब असे शेतकरी कुटुंब होते. अत्यंत थोड्या जमिनीत आमची आजी रुक्मिणीबाई, वडील ठकाजी पाटिल आणि मातोश्री मधुराबाई या तिघांनी कुटुंबासाठी अपार कष्ट घेतले. पुरेसे उत्पन्न काढले व त्यावर आपला संसार चालवला. प्रपंच चालवताना ज्या नाविण्यपूर्ण वैशिष्ट्यावर संसार केला तो आज निश्चितच महिलांसाठी आदर्शवत असून १०० वर्षापूर्वीची समाजव्यवस्था नजरेसमोर ठेवल्यास त्याकाळात जो विज्ञानवादी दृष्टीकोन स्विकारला, तो निश्चितच आगळावेगळा आहे.
तिने कोणताही दैववाद, अंधश्रद्धा याला अजिबात थारा दिला नाही. ती मुळातच ईश्वरवादी नव्हती. तिने जीवनभर देव ही संकल्पना मान्य केली नव्हती. त्यामुळे उपास - तापास पुजापाठ, कर्मकांड केले नाही. प्रत्येक गोष्ट ती शास्त्रीय दृष्टीकोनातून पहात असे, आम्हा मुलांना हाता-पायाला खरचटले तरी ताबडतोब डॉक्टरकडे नेऊन टी. टी. चे इंजेक्शन घ्यायला भाग पाडत होती. अथवा कुटुंबातील कोणीही आजारी पडल्यास गावठी उपाय न करता ताबडतोब वैद्यकीय उपचार केले जात होते.
आरोग्याचे अनन्य साधारण महत्व तिने त्याकाळातच ओळखले होते. ती नेहमी म्हणायची की, “ व्यक्तीने रजाचे गज करावे " म्हणजेच कापसासारखे शरीर लोखंडासारखे बनवावे. ज्याकाळात जेवणाची भ्रांत होती त्याकाळात आम्हा मुलांना दुध, सकाळच नाश्ता, आठवड्यातून दोन वेळा चिकन, एखाद्या दिवशी पुरणपोळी, खिरपुरी अशा उच्चतम आहाराची जीवनभर व्यवस्था तिने केली. परिस्थिती बेताची असूनही त्याकाळात ही व्यवस्था करणे तिच्या विज्ञानवादी दृष्टिकोनाचा परमोच्च बिंदू होय. जीवनामध्ये संगतीचे अनन्यसाधारण महत्व तिने त्याकाळी ओळखले. त्यानुसार व्यापारी व उच्चभू कुटुंबाशी संबंध प्रस्थापित केले. मला तर एका व्यापाऱ्याकडे आठवड्यातून एक दिवस एक रुपया रोजावर कामावर ठेऊन व्यापारी दृष्टिकोन आत्मसात करण्याची मोठी संधी दिली.
माझ्या आईची चुल सकाळी ६ वाजता पेटायची तर संधाकाळी ७ वाजेपर्यत कधी आयुष्यभर विझली नाही. आमचे घर रस्त्याच्या कडेला असल्याने दारावर आलेली कोणतीही व्यक्ती उपाशी कधी तिने जाऊ दिली नाही.
कुटुंबाचा विस्तार जसजसा वाढत गेला तसा तिने स्वतःमध्ये बदल करून सर्व कुटुंब एकत्र राहावे याची कटाकक्षाने दक्षता घेतली. १४०-१५० लोकांच्या परिवाराला समाजामध्ये आमचा सर्वांचा मिळून जणूकाही एकत्र कुटुंब आहे अशी मान्यता तिने प्राप्त करुण दिली. व्यक्तीगत आरोग्य व स्वच्छतेविषयी तिने आयुष्यभर खूपच दक्षता बाळगली मग ती स्वच्छता, निर्मळपणा शरीराचा असो वा वास्तव्याचा असो. जुन्या काळामध्ये जेव्हा शिक्षणाचा प्रचार प्रसार नव्हता अशा काळात आणि वातावरणामध्ये तिने शिक्षणाचे महत्व ओळखून कुटुंबातील बहुतांशी सदस्यांना उच्चशिक्षित करून कुटुंबाचा शैक्षणिक दर्जा फार उंचीवर नेला. आरोग्याच्या जागरुतीबाबत दक्ष कसे असावे याचे उत्तम उदाहरण तिच्या स्वतःच्या उदाहरणातून आम्हा कुटुंबियाना व समाजाला दाखवून दिले. वयाच्या १०६ वर्षापर्यंत तिला साखर, बीपी किंवा कोणताही आजार नव्हता. दिसणे व ऐकण्यात किंचितही कमी आलेली नव्हती. तिचा एकही दात पडलेला नव्हता, शरीराच्या सर्व सिस्टीम्स अत्यंत सुस्थितीत होत्या.
आयुष्यभर कर्मवादातुन निरपेक्ष भावनेतुन तिच्या परीने तिने इतरांची केलेली सेवा तिला निश्चितच उपयोगी पडल्याने तिने शेवटचा श्वास बोलता बोलता डोळे झाकुन सुलभ, शांतरितीने प्राणत्याग केला. समाजामध्ये अशा अनेक कर्तृत्ववान स्त्रिया आहेत त्यांना प्रसिद्धी मिळत नाही कि समाजाकडूनही त्याचा नोंद घेतली जात नाही. पण त्यांचे कार्य त्यांच्या कार्यक्षेत्रापुरते अलौकिक असते. त्यांच्यामुळेच समाजाचा विकास होत असतो. अशा दुर्मिळ, विज्ञाननिष्ठ व कर्तुत्वान स्त्रियांपैकी माझी आई एक होती. हे आमच्या घराण्याला व पुढील पिढीला प्रेरणादायी व्यक्तीमत्व ठरेल. आमच्या घराण्यातील एक उत्तुंग पर्वाचा तिच्या रूपाने अंत झाला असला तरी तिची चैतन्यशक्ती आमच्या वंशजांना फलदायी ठरो ही ईश्वरचरणी प्रार्थना. समाजातील विविध घटकांनी मातोश्रींच्या निधनानंतर अंत्यविधीला उपस्थित राहून, घरी येऊन सांत्वन केले. त्याबद्दल मी आमच्या कुटुंबाच्या वतीने सर्व जनतेचे मी मनपूर्वक आभार मानतो.
माझे हात हातात तुझ्या आई,
मी चालतो ठायी ठायी,
अशीच थाप तुझी राहू दे गं आई,
मी जग जिंंकेन पायी पायी.!
अँड. शाळीग्राम होडगर, संस्थापक मांचीहिल शैक्षणिक संकुल
***शब्दांकन :- पत्रकार संजय गायकवाड, ९८५०९८१४८५