◻ चूकिच्या प्रथेला पायबंद घालण्यासाठी वारकरी संप्रदाय डॉ. विखे च्या पाठीशी
या भूमीकेमुळे कोणाला काही त्रास होत असेल तर त्याची मी काळजी करणार नाही
संगमनेर Live (लोणी) | शिर्डी मतदार संघातील माता भगिनिंना सुरक्षित राहण्यासाठी कोणत्याही किराणा दुकानात मद्य विक्री करू देणार नाही. किराणा दुकानात मद्य विक्री सुरू करण्याच्या भ्रष्ट राज्य सरकारच्या निर्णयाला कडकडून विरोध करणार असल्याचे प्रतिपादन नगर दक्षिणचे खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी केले.
लोणी येथील श्री वरद विनायक सेवाधामच्या स्वागत कमानिचे उद्घाटन डॉ. सुजय विखे पाटील यांचे हस्ते आज (दि. ४) रोजी करण्यात आले. यावेळी सेवाधामचे संस्थापक महंत उध्दव महाराज मंडलिक (नेवासेकर), भाषाप्रभू जगन्नाथ महाराज पाटील, विश्वनाथ महाराज मंडलिक, ट्रक सोसायटिचे अध्यक्ष नंदकिशोर राठी, बाळासाहेब आहेर उपस्थित होते.
डॉ. सुजय विखे म्हणाले की, संसदेत मी गोरगरीब व सामान्य जनतेच्या आशिर्वादाने पोहोचलो आहे. गोरगरीबींची बाजू संसदेत माडण्याचे कर्तव्य मी सातत्याने करीत राहणार असून माझ्या या भूमिकेमुळे कोणाला काही त्रास होत असेल तर त्याची मी काळजी करणार नाही.
किराणा दुकानात मद्य विक्री करण्याचा राज्य सरकारचा हा निर्णय अतिशय दुर्दैवी असून या निर्णयाला माझा ठाम विरोध असून कोणीही आडवे आले तरी त्याची तमा न बाळगता चूकीची प्रथा पडू देणार नाही. या चूकीच्या निर्णयाला नियंत्रणात आणण्यासाठी जनतेने देखील आज संकल्प केला पाहीजे. जर किराणा दुकानात कोणी मद्य विक्री करताना आढळून आल्यास त्या दुकानदाराचे दुकान सिल करून त्याला मोठा विरोध केला जाईल असा इशारा डॉ. विखे यांनी दिला.
जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शालिनी विखे पाटील व आ. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या माध्यमातून तिर्थ क्षेत्राचा कसा विकास होउ शकतो हे या वरद विनायक परिसराचे भव्य दिव्य विकास पाहिल्यावर आपल्याला लक्षात येईल. सर्वसामान्यांच्या सुविधेसाठी सातत्याने विकास करण्याचा प्रयत्न विखे कुटूंबियांचा राहीलेला असल्याचे डॉ. विखे म्हणाले.
उध्दव महाराज मंडलिक यानी मतदार संघातील किराणा दुकानात मद्य विक्री होऊ देणार नसल्याच्या खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांच्या निर्णयाचे स्वागत केले आहे. माता भगिनींच्या कल्याणासाठी व चूकिच्या प्रथेला पायबंद घालण्यासाठी त्यांच्या या निर्णयाच्या पाठीशी सर्व वारकरी संप्रदाय ठामपणे उभे राहणार असल्याचे अभिवचन दिले.