◻ माजी मुख्यमंत्री नारायण राणे तसेच दिवंगत मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचे खाजगी सचिव म्हणून केले काम.
आश्वी सह पंचक्रोशीतील नागरीकानकडून अभिनंदनाचा वर्षाव
संगमनेर Live | महाराष्ट्र राज्य प्रदूषण महामंडळाचे अध्यक्ष आबासाहेब जऱ्हाड यांना राज्य शासनाने प्रधान सचिवपदी पदोन्नती दिली आहे. ते तूर्तास याच महामंडळाचे काम संभाळणार असून त्यांच्या पदोन्नतीबद्दल आश्वीसह पंचक्रोशीतील नागरिक आनंद व्यक्त करत आहेत.
संगमनेर तालुक्यातील आश्वी बुद्रुक येथिल शेतकरी कुटुंबात जन्मलेले जऱ्हाड यांनी चिकाटीने कृषी पदव्युत्तर शिक्षण घेतले. १९९७ च्या तुकडीतून ते भारतीय प्रशासकीय (आयएएस) सेवेत आले. वित्त विभागात सुरूवातीला त्यांनी सेवेला सुरूवात केली. ठाणे जिल्हापरिषदेत जिल्हा कृषी अधिकारी, कोकण विभागाचे कृषी उपसंचालक, तत्कालीन मुख्यमंत्री नारायण राणे, दिवंगत मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचे खाजगी सचिव, ठाण्याचे जिल्हाधिकारी म्हणून त्यांनी प्रयोगशील कामे केली.
नवी मुंबई महापालिका आयुक्त, एमआयडीसीचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी, मंत्रालयात पशुसंवर्धन, दुग्धविकास व जलसंधारण खात्याचे सचिव म्हणून त्यांनी उत्कृष्ट कामगिरी केली. त्यांच्या कामाची दखल घेऊन त्यांची मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त त्यानंतर त्यांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कार्यालयाचे सचिव म्हणून नियुक्त झाली.
दरम्यान त्यांच्या कामाची दखल घेऊन जऱ्हाड यांची महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाली होती. याच पदावर ते कार्यरत असताना राज्यशासनाने त्यांची प्रधान सचिव म्हणून पदोन्नती केली असून ते याच पदावर कार्यरत राहणार आहे.