खुनाचे कारण अस्पष्ट ; पोलीस ठाण्यात ३०२ प्रमाणे गुन्हा दाखल
संगमनेर Live (राजू नरवडे) | संगमनेर तालुक्यातील चंदनापुरी येथे टायर पंक्चर टपरीचालकाचा निर्घृण खून झाल्याची घटना शुक्रवारी (दि. ४ फेब्रुवारी) सकाळी उघडकीस आली आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली असून अब्दुल मोहम्मद युनूस कादीर (वय - २७) असे खून झालेल्या तरूणाचे नाव आहे. दरम्यान, श्वानपथकासह ठसेतज्ज्ञ पथकाला घटनास्थळी पाचारण करण्यात आले आहे.
याबाबत तालुका पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, चंदनापुरी गावांतर्गत असलेल्या जावळेवस्ती येथे अब्दुल कादिर या तरूणाची टायर पंक्चर काढण्याची टपरी आहे. अज्ञात व्यक्तीने अब्दुलच्या टपरीत जावून त्याच्या पाठीत सुरा भोसकून निर्घृण खून केल्याचे प्रथम दर्शनी दिसते. याबाबत सकाळी घटनेची माहिती गावचे पोलीस पाटील ज्ञानदेव राहणे यांनी तालुका पोलिसांना दिली.
घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक पांडुरंग पवार, सहाय्यक फौजदार इस्माईल शेख, पोलीस नाईक शिवाजी डमाळे आदिंनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर श्वानपथकासह ठसेतज्ज्ञ पथकाला घटनास्थळी पाचारण करण्यात आले होते. याचबरोबर अप्पर पोलीस अधिक्षीका स्वाती भोर, उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल मदने यांनीही घटनास्थळास भेट देऊन तपासाबाबत पोलिसांना सूचना केल्या.
यावेळी पोलिसांनी परिसरात असलेल्या हाॅटेलमधील सीसीटीव्ही फुटेजही तपासले आहे. नेमका या तरूणाचा खून कोणी.? आणि तो कशासाठी केला.? ते मात्र समजू शकलेले नाही. याप्रकरणी पोलीस पाटील ज्ञानदेव रहाणे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तालुका पोलिसांनी अज्ञात इसमाविरूद्ध गुन्हा रजिस्टर नंबर ४१/२०२२ भादंवि कलम ३०२ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक पांडुरंग पवार हे करीत आहेत.