◻ १९ लाख १७ हजार रुपयेची रोख रक्कम लांबविली
पोलीस घटनास्थळी दाखल
संगमनेर Live (राजू नरवडे) | संगमनेर तालुक्याच्या पठारभागातील घारगाव येथील दौलत रिफ्रेशमेंट शेजारील भारतीय स्टेट बँकेचे एटीएम मशीन चोरट्यांनी फोडून १९ लाख १७ हजार ५०० रुपये लांबविल्याची खळबळजनक घटना शुक्रवार (दि. ४ फेब्रुवारी) पहाटे घडली आहे.
त्यामुळे बंद घरे व दुकानांपाठोपाठ चोरट्यांनी एटीएम मशिनही फोडल्याने आता या चोरट्यांचा शोध लावणे घारगाव पोलिसांपुढे मोठे आव्हान ठाकले आहे.
याबाबत घारगाव पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी, की घारगाव येथील दौलत रिफ्रेशमेंटच्या आवारात भारतीय स्टेट बँकेचे एटीएम मशीन आहे. दररोज असंख्य लोक रोख रक्कम काढण्यासाठी येथे येत असतात.
शुक्रवारी पहाटेच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी सीसीटीव्हीच्या वायर कापून एटीएम मशीनचा दरवाजा गॅस कटरच्या साहाय्याने कापला. त्यानंतर आतील १९ लाख १७ हजार ५०० रुपये चोरुन पोबारा केला.
यावेळी चोरट्यांनी डीव्हीआर देखील चोरुन नेला आहे. या घटनेची माहिती समजताच पोलीस निरीक्षक सुनील पाटील, पोलीस नाईक राजेंद्र लांघे, संतोष फड, शाखा व्यवस्थापक कांचन दाभने आदिंनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली.