◻ एकलव्य संघटनेचे ना. शिवाजीराव ढवळे व रिपाईचे जिल्हाध्यक्ष सुरेंद्र थोरात यांच्या नेतृत्वाखाली दोन तास ठिय्या आंदोलन
लेखी आश्वासनानतंर ठिय्या आंदोलन मागे
संगमनेर Live (गोरक्ष नेहे) | संगमनेर तालुक्यातील आदिवासी समाज बांधवांच्या प्रलंबित असणाऱ्या विविध मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य एकलव्य संघटना आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट यांच्या वतीने तालुक्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या आदिवासी समाज बांधवांनी प्रांताधिकारी कार्यालय दणका मोर्चा काढत सुमारे दोन ते तीन तास ठिय्या आंदोलन केले.
संगमनेर तालुक्याच्या काना - कोपऱ्यातून आपल्या न्याय हक्कासाठी आलेले सर्व आदिवासी बंधू - भगिनींनी शहरातील बीएड कॉलेज जवळ एकत्र येत नवीन अकोले रोड बस स्थानक मार्गे प्रांताधिकारी कार्यालयावर दणका मोर्चा काढण्यात आला होता.
एकलव्य संघटनेचे राज्य अध्यक्ष व म्हाडाचे नाशिक विभागाचे सभापती राज्यमंत्री शिवाजीराव ढवळे, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे जिल्हाध्यक्ष सुरेंद्र थोरात, रिपाई नेते अशोकराव खरात, युवक जिल्हाध्यक्ष पप्पू बनसोडे, संगमनेर तालुका अध्यक्ष आशिष शेळके, शहराध्यक्ष कैलास कासार, महिला अध्यक्षा रुपाली सोनवणे, मधुकर सोनवणे, योगेश मुन्तोडे, विजय खरात, एकलव्यचे उत्तर महाराष्ट्र सचिव विजय बर्डे, जिल्हाध्यक्ष गीताराम बर्डे, तालुका अध्यक्ष अनिल बर्डे, पूनमताई माळी, संतोष बर्डे, मारुती पवार, भाऊसाहेब माळी, राजेंद्र बर्डे, बाळासाहेब माळी, सुभाष मोरे, अनिल रोकडे, कुंदन सुर्यवंशी, बाळासाहेब दरेकर आदी सह आदिवासी बांधव व भगिनी या मोर्च्यात सहभागी झाले होते.
मोर्च्याकरांच्या वतीने दिलेल्या विविध मागण्याचे निवेदन स्वीकारण्यासाठी प्रांताधिकारी कार्यालयातील श्री. मेंगाळ आले असता “ तुम्हाला या मागण्यांबाबत निर्णय घेण्याचा अधिकार आहे का.? ” असे एकलव्य संघटनेचे अध्यक्ष तथा राज्यमंत्री शिवाजीराव ढवळे यांनी मेंगाळ यांना सवाल करत “ ज्यांना या मागण्या बाबतचा निर्णय घेण्याबाबतचा अधिकार आहे त्यांनाच बोलवा ” असे खडेबोल सुनावत मेंगाळ यांना मोर्च्याच्या ठिकाणावरून हाकलून दिले.
त्यानंतर नायब तहसीलदार लोमटे हे मोर्चास्थळी आले तेव्हा राज्यमंत्री ना. ढवळे म्हणाले की “ गेल्या सहा दिवसांपूर्वी एकलव्य संघटना आणि रिपब्लिकन पक्ष आठवले गटाच्या वतीन आदिवासी समाज बांधवांच्या विविध मागण्यांचे निवेदन दिले होते. त्याबाबत तुम्ही काय कार्यवाही केली.? असा सवाल केला. त्यावर प्रांताधिकारी नगर येथे बैठकसाठी गेले आहे, त्यांच्याशी चर्चा करून निर्णय देतो असे लोमटे यांनी ढवळे यांनी सांगितले.
आदिवासी समाज बांधवांच्या किरकोळ मागण्या आहेत. त्या मागण्याबत तुम्ही काय कार्यवाही करणार असे आम्हाला लेखी द्यावे असे ना. ढवळे यांनी लोमटे यांना सूचित केले. त्यानंतर नायब तहसीलदार लोमटे यांनी प्रांताधिकारी डॉ. मंगरुळे यांच्याशी चर्चा करत वरील सर्व मागण्यांच्या बाबत ७ फेब्रुवारी रोजी प्रांतअधिकारी कार्यालयात पंचायत समिती गटविकास अधिकारी, नगरपालिकेचे मुख्याधिकारी, पोलीस निरीक्षक आणि गटशिक्षणाधिकारी यांच्या उपस्थितीमध्ये सर्व आदिवासी समाज बांधवांची बैठक लावून या मागणीबाबत योग्य तो मार्ग काढला जाईल असे लेखी दिल्यानंतर सायंकाळी पाच वाजता मोर्चेकऱ्यांनी हे ठिय्या आंदोलन मागे घेतले.
संगमनेर अकोले उपविभागातील प्रमुख पोलिस ठाण्याच्या अधिकाऱ्यांची बैठक घेण्यासाठी नाशिक परिक्षेत्र विभागाचे पोलीस उपमहानिरीक्षक बी. जी. शेखर संगमनेरला आले होते. परंतु प्रांताधिकारी कार्यालयाजवळ आदिवासी समाज बांधवांचा मोर्चा सुरू होता. मोर्च्याकरांच्या मागण्यांबाबत निर्णय होत नव्हता व पोलीस उपमहानिरीक्षक जिल्हा पोलीस प्रमुख आणि अप्पर पोलीस अधीक्षक यांना बैठकीला येण्यासाठी जागाच नव्हती म्हणून पोलीस उपअधीक्षक राहुल मदने व पोलीस निरिक्षक मुकुंद देशमुख यांनी मोर्चेकराच्या नेत्यांशी चर्चा करून जागा करून द्यावी अशी विनंती केली. त्यानंतर मोर्चेकऱ्यांनी अधिकाऱ्यांनी येण्यासाठी जागा मोकळी करून दिली. तरी सुद्धा मोर्चा संपल्यानंतरच पोलीस उपमहानिरीक्षक व जिल्हा पोलिस प्रमुख बैठकीसाठी यशवंतराव चव्हाण प्रशासकीय भवनात आले.