◻ राष्ट्रीय वयोश्री योजने अंतर्गत जेष्ठ नागरीकांना साधन साहित्याचे ना. आठवले यांच्या हस्तें वितरण
◻ आघाडी सरकार हे फक्त धनदांडगे, माफीया यांच्यासाठी काम करते - आ. विखे पाटील
संगमनेर Live | पाच राज्यांच्या निवडणूकीत कॉग्रेसचे पूर्णपणे पाणीपत झाले आहे. हा पक्ष आता कुठे पाहायलाही मिळत नाही. पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्यावर टिका करुन, राहुल गांधींचा अजिबात फायदा नाही, प्रियांका गांधीवर उत्तर प्रदेशची जबाबदारी होती तिथे कॉग्रेसची काय परिस्थिती झाली हे संपूर्ण देशाने पाहीले, पुर्वीप्रमाणे कॉग्रेसचे आकर्षण राहीले नसल्याची टिका केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना. रामदास आठवले यांनी केली.
राहाता येथे राष्ट्रीय वयोश्री योजने अंतर्गत जेष्ठ नागरीकांना साधन साहित्याचे वितरण मंत्री ना. रामदास आठवले यांच्या उपस्थितीत करण्यात आले. याप्रसंगी आ. राधाकृष्ण विखे पाटील, आण्णासाहेब म्हस्के पाटील, खासदार डॉ. सुजय विखे पाटील, आरपीआयचे जिल्हाध्यक्ष सुरेंद्र थोरात, बाळासाहेब गायकवाड, श्रीकांत भालेराव, विजयराव वाकचौरे, गणेश कारखान्याचे चेअरमन मुकूंदराव सदाफळ, सभापती भाऊसाहेब जेजूरकर, अँड. रघुनाथ बोठे, डॉ. राजेंद्र पिपाडा, भाजयुमोचे सतिष बावके, भिमा बागुल, राजाभाऊ कापसे आदि याप्रसंगी उपस्थित होते.
पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी संपूर्ण देश पादाक्रांत केला आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली सरकार लोकांसाठी काम करते, म्हणूनच चार राज्यांच्या निवडणूक निकालातुन याचा प्रत्यय आला. २०२४ साली सुध्दा देशामध्ये भाजपाचे सरकारच सत्तेवर येईल असा विश्वास व्यक्त करताना कोव्हीड काळात ८० कोटी लोकांना दोन, अडीच वर्षे केंद्र सरकारने मोफत धान्य दिले, मोफत लसिकरण करुन अनेकांचे प्राण वाचविले आहेत. सर्वधर्माच्या लोकांना मदत करुन, पंतप्रधान नरेंद्रजी मोदी जगात एक नंबरचे नेते झाले असल्याचे ना. आठवले यानी आवर्जुन नमुद केले.
राष्ट्रीय वयोश्री योजनेची प्रभावी अंमलबजावणी केल्याबद्दल खा. डॉ. सुजय विखे पाटील यांचे अभिनंदन करुन, मंत्री आठवले म्हणाले की, सामाजिक न्याय मंत्रालयाच्या माध्यमातून २०११ च्या जनगणने नुसार देशात २ कोटी ६७ लाख दिव्यांग लोक आहेत. वयाश्री लोकांची संख्या तुलनेने मोठे आहे. या योजनेतील लोकांना साहित्य मिळत आहे. यंदाच्या अर्थसंकल्पात १ लाख ४२ हजार कोटी रुपयांची तरतुद या विभागासाठी करण्यात आली असल्याची माहीती त्यांनी दिली. पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकार सामान्य माणसासाठी काम करते. नुकत्याच झालेल्या निवडणूकांमध्ये चार राज्यांमध्ये मिळालेले पाठबळ हे मोदीजींच्या कामाला मिळाले असून, २०२४ साली पुन्हा देशामध्ये मोदीजींच्या नेतृत्वाखालीच भारतीय जनता पक्षाची सत्तास्थापन होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
माजी मंत्री आ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी आपल्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सबका साथ सबका विकास हा मंत्र प्रत्यक्ष कृतीत उतरविला. सामान्य माणसासाठी योजनांची प्रभावी अंमलबजावणी करुन, या माणसांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे काम त्यांनी केले. कोव्हीड संकट असो की, ऑपरेशन गंगा या सर्व मोहीमेत इतर देशांपेक्षाही मोदीजींचे कार्य हे जगामध्ये सरस ठरले. त्यामुळेच त्यांचे नेतृत्व विश्वव्यापी झाले असल्याचे त्यांनी सांगितले.
एकीकडे केंद्र सरकारच्या माध्यमातून देशात योजनांची अंमलबजावणी होत असताना राज्यात मात्र आघाडी सरकार हे फक्त धनदांडगे, माफीया यांच्यासाठी काम करीत आहे. कालच्या अर्थसंकल्पातून राज्याच्या जनतेच्या हाती काहीही लागले नाही अशी टिकाही आ. विखे पाटील यांनी आपल्या भाषणात केली.
खा. डॉ. सुजय विखे पाटील यांनी सर्वांचे स्वागत करुन, राष्ट्रीय वयोश्री योजनेबाबच्या अंमलबजावणीची माहीती दिली. या कार्यक्रमास राहाता आणि पंचक्रोषितील जेष्ठ नागरीक, महिला आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मंत्री ना. रामदार आठवले यांनी आपल्या भाषणात लोकनेते पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील यांच्या कार्याचा आवर्जुन उल्लेख करत आ. राधाकृष्ण विखे पाटील त्यांचा वारसा पुढे घेवून जात आहेत. आठवले नेहमी शिर्डीत येत राहो अशी इच्छा आ. विखे पाटील यांनी व्यक्त केली. त्याला अनुसरुन मंत्री आठवले म्हणाले की, मी शिर्डीत जरुर येत राहील नेहमी यायचे असेल तर माझ्याकडे तुम्हाला पाहावे लागेल अशी शाब्दीक कोटी केली. याच कार्यक्रमात मंत्री आवठले आणि आ. विखे पाटील सादर केलेल्या कवितांना टाळ्यांच्या गजरात सगळ्यांनी दाद दिली.