◻ वीज कनेक्शन तोडण्याचा निर्णय सरकरकडून मागे
◻ भाजप तसेच शेतकऱ्यानी रस्त्यावर उतरून केलेल्या संघर्षाचे हे यश
संगमनेर Live (शिर्डी) | वीज कनेक्शन तोडण्याचा निर्णय अखेर आघाडी सरकारला मागे घ्यावा लागला. शेतकऱ्यांची तोडलेली वीज पुन्हा जोडून देण्याचा घ्यावा लागलेला निर्णय म्हणजे सरकारला उशिरा सुचलेल शहाणपण म्हणावे लागेल. भाजपाने विधानसभेत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली आणि रस्त्यावर उतरून शेतकऱ्यांनी केलेल्या संघर्षाचे हे यश असल्याची प्रतिक्रिया आ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केली.
आ. विखे पाटील म्हणाले की, मागील अनेक महीन्यापासून वीज प्रश्नासंदर्भात आम्ही सरकारला धारेवर धरून शेतकऱ्यांच्या कृषी पंपाचे कनेक्शन तोडू नका आशी मागणी करीत होतो. यासाठी आजपर्यत झालेल्या सर्वच अधिवेशनात शेतकऱ्यांना न्याय देण्याची मागणी केली. परंतू सरकार या मागणीकडे राजकीय भूमिकेतून पाहात होते.
डिसेंबरच्या अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी उपमुख्यमंत्र्यांनी कोणत्याही शेतकऱ्याचे वीज कनेक्शन तोडले जाणार नाही असा निर्णय जाहीर केला. मात्र वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी कनेक्शन तोडण्याची मोहीम सुरूच ठेवल्याने शेतकऱ्यांमध्ये मोठा आक्रोश निर्माण झाला होता. या विरोधात वितरण कंपनीच्या कार्यालयावरही मोर्चे काढण्यात आले परंतू शेतकरी विरोधी सरकारला कोणत्याही जाणीवा नव्हत्या.
अर्थसंकल्पिय अधिवेशन सुरू झाल्यापासून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली वीजेच्या प्रश्नावर सरकारला सातत्याने जाब विचारला. सोलापूर जिल्ह्यातील तरुण शेतकरी सूरज जाधव यांने फेसबुक पोस्ट करून वीज बीलाच्या कारणाने स्वतःचे आयुष्य संपवून घेतले.
यावरून सरकार काही धडा घेणार का असा प्रश्न उपस्थित करून आघाडी सरकारला धारेवर धरले. वीजेच्या प्रश्नावर निर्णय होत नाही तोपर्यंत कोणतेही कामकाज अधिवेशानात चालू न देण्याचा निर्णय घेवून विरोधी पक्षाने निर्माण केलेल्या दबावामुळेच सरकारला आज झुकावे लागले. वीज कनेक्शन न तोडण्याचा निर्णय उर्जामंत्र्यांना अखेर जाहीर करावा लागला.
सरकारला उशिरा सुचलेले हे शहाणपण म्हणावे लागेल आणि विरोधी पक्षाने सभागृहात आणि रस्त्यावर उतरून केलेल्या संघर्षाचे यश असल्याची प्रतिक्रिया आ. विखे पाटील यांनी व्यक्त केली.