◻ वाळू उपशासंदर्भात झाला निर्णय
संगमनेर Live (मुंबई) | महसूल विभागाचे अधिकाधिक संगणकीकरण करून ऑनलाईन सुविधा देण्याचा प्रयत्न आहे. यामुळे पारदर्शकता, जलदता आणि अचुकता येत असल्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी विधानपरिषदेत सांगितले.
अंतिम आठवडा प्रस्तावावर महसूल मंत्री ना. थोरात बोलत होते. महसूल विभागाच्या माध्यमातून नागरिकांना जास्तीत जास्त सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न आहे. सातबाराचे संगणीकरण करण्यात आले असून या प्रक्रियेत काही दोष असल्यास ते दोष दूर करण्यात येणार आहे.
मुद्रांक नोंदणीसाठी ई सरिता ही ऑनलाईन प्रणाली उपलब्ध करून देण्यात आली आहे. कोविडच्या काळात मुद्रांक शुल्कामध्ये दिलेल्या सवलतीमुळे महसूलात वाढ झाली असल्याचे ना. थोरात पुढे म्हणाले.
वाळू उपशासंदर्भात काही निर्णय घेण्यात आले. लिलाव प्रक्रियेचा कालखंड तीनवरून पाच वर्षापर्यंत वाढविण्यात आला असून लिलावाचे क्षेत्र पाच हेक्टरपर्यंत वाढविण्यात आले आहे. शासकीय कामासाठी घाट राखून ठेवण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे मंत्री ना. थोरात म्हणाले.
दरम्यान यावेळी झालेल्या चर्चेत सदस्य परिणय फुके, प्रसाद लाड, निरंजन डावखरे, अनिकेत तटकरे, विनायक मेटे आदी सदस्य सहभागी झाले होते.