सावरगावतळ येथील हिराबाई नेहे यांच्या शेतात आढळले ‘ ७ किलोचे रताळे ’

संगमनेर Live
0
चार महिन्यापासून या रताळीच्या वेलीला पाणी नसतांना झाला निसर्गाचा चमत्कार 

संगमनेर Live | संगमनेर तालुक्यातील सावरगावतळ हे पूर्वी रताळाचे सावरगाव म्हणून प्रसिद्ध होते. तेथे सात किलो वजनाचे “रताळू" सापडल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. जमिन मुरमाड हलक्या प्रतीची तर आहेच शिवाय चार महिन्यापासून या रताळीच्या वेलीला पाणी दिलेले नसतांनाही असा हा निसर्गाचा चमत्कार सावरगावतळ येथील हिराबाई रामनाथ नेहे यांच्या शेतात झाला.

त्याचे शेत अतिशय हलक्या प्रतीचे म्हणजेच मुरमाड प्रकारचे आहे. मागील वर्षीच्या खरिपात ऑगस्ट महिन्यात कांदा पीक लावले होते. त्या पिकाच्या कडेला हिराबाई नेहे यानी जमिनीपासून एक फूट उंचीवर “रताळी"चा वेल लावला होता. जेथे आता तीन चार महिन्यापासून कोणतेही पीक नाही. त्यामुळे तेथे पाणी देण्याचा प्रश्नच नसतांना त्या एकाच रताळीच्या वेलाला जमिनीत एकच सात किलोवजनाचे "रताळी" कंद लागले आहे. 

या वेलीला कोणत्याही प्रकारचे खत, औषध किंवा चार महिन्यापासून पाणी सुद्धा नसतांना मिळाले. याला आपल्या काळ्या आईचा, धरणी मातेचा चमत्कारच समजावे का.? की विनाकारनच आपण आपल्या भूमातेवर रासायनिक खते, औषधे बेसुमार पाणी यांचा अघोरी वापर करून अनन्वित अत्याचार, आघात  तर करत नाही ना.? हिराबाई नेहे अर्थात "काकू" या नावाने प्रसिद्ध असणाऱ्या प्रती राहीबाई पोपेरेच असल्याचे नागरीकानी म्हटले आहे.

त्यानी एकही मुळाक्षरे गिरविलेले नाही. अर्थात त्या शाळेची पायरीच कधी चढलेल्या नाहीत. कुटुंबातील व्यक्तींचे आरोग्य सुदृढ राहण्यासाठी तिचे एक वेगळेच तत्वज्ञान आहे. तिच्या हातचा चुलीवरच्या स्वयंपाक आजही अप्रतिमच नव्हे तर स्वादिष्टही असतो. घरी आपल्याला लागणारा भाजीपाला असेल किंवा डाळी असेल त्याचे अनेक देशी सेंद्रिय वाण त्या लग्न होऊन सासरी आल्यापासून म्हणजेच पन्नास वर्षांपासून जतन करत आहे. 

यामध्ये देशी गावरान डांगर, भोपळा, कारले, दोडका, घोसाळे, भेंडी, वांगे, मेथी, शापू, करडई, आंबाडी, तांदुळसा, चंदनबट्टा पालक, आंबेचिक्कू, धने, मोहरी, तूर, उडीद, मूग, चवळी, काळा वाल, पांढरा वाल, घेवडा, पापडा, कुहिरी वाल यासारख्या पन्नास प्रकारच्या वाणांचा यात समावेश आहे. विशेषतः ह्या सर्व वाणांची लागवड त्यानी शेतातील बांधाच्या कडेलाच करतात. ह्या सर्वांना कधीही कोणत्याही प्रकारचे रासायनिक खते, औषधे दिली जात नाही.

यामुळे हा सर्व विषमुक्त सेंद्रिय भाजीपाला आजही त्याच्या कुटुंबाला कर्तव्यदक्षतेमुळे मिळत आहे. हे सर्व बियाणांचे वाण संवर्धित करण्याचे त्याचे एक वेगळेच तंत्र आहे. त्या वेगवेगळ्या खपराच्या मडक्यांत राख टाकून हे सर्व बियाणे जतन करून ठेवतात. यामुळे हे सर्व बियाणे ३ ते ४ वर्ष जरी राहिले तरीही ते खराब होत नाही. हे बियाणे त्या आपल्या कुटुंबाबरोबरच परिसरातील इतर कुटुंबानाही अनेक वर्षांपासून गरजेनुसार मोफत वाटप करत आहेत. एकंदरीत याबाबत त्याचे हे देशी वाण जतन आणि संवर्धन करण्याचे ज्ञान शिकल्या सवरलेल्या व्यक्तींनाही लाजविणारे आहे.

दरम्यान अनेक पारंपरिक ओव्या, गीते, जात्यावरील गाणी तयार करण्याचा आणि म्हणण्याचा हिराबाई नेहे यांचा छंद अफलातून असल्याचे कुटुंब व ग्रामस्थांचे म्हणणे आहे.

Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !