महसुल विभागातील भ्रष्‍टाचाराच्‍या प्रश्‍नांवर सरकार गप्‍प का.? - आ. विखे पाटील

संगमनेर Live
0

महाविकास आघाडी सरकारच्या भ्रष्टाचाराच्या विरोधात पोलखोल अभियान सुरू

संगमनेर Live (शिर्डी) | नाशिकचे पोलीस आयुक्त दिपक पांडेय यांनी काही दिवसांपूर्वी दिलेल्‍या पत्राचा अंगुली निर्देश थेट सरकारपर्यंत जात आहे. मात्र त्‍यांची आता बदली करण्‍यात आली. त्‍यांनी महसुल विभागातील भ्रष्‍टाचाराच्‍या संदर्भात उपस्थित केलेल्‍या प्रश्‍नांवर सरकार गप्‍प का.? असा थेट सवाल आ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी उपस्थित केला. मुंबईतच नव्हे तर राज्यातही महाविकास आघाडी सरकारच्या भ्रष्टाचाराच्या विरोधात पोलखोल अभियान सुरू करण्याचा इशारा त्यांनी माध्यमांशी बोलताना दिला.

राज्यातील पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्यानंतर सरकारने काही तासात पाच अधिकाऱ्यांच्या बदल्या रद्द करण्याचा निर्णय घेतला, यावर आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना आ. विखे पाटील म्हणाले की, हे युटर्न सरकार आहे. घेतलेल्या कोणत्याच निर्णयावर सरकार ठाम राहात नाही. सरकारने कोणत्या पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आणि रद्द केल्या यामध्ये आम्हाला रस नाही. 

असे स्पष्ट करून आ. विखे पाटील म्हणाले की, दिपक पांडेय यांनी सरकारला पत्र दिल्यानंतर त्यांच्यावर काय कारवाई करायची हा सर्वस्वी अधिकार सरकारचा आहे. परंतू त्यांच्या पत्राचा अंगुली निर्देश हा सरकारकडे आहे. महसूल विभागातील जमीन खरेदी विक्री व्‍यवहारांच्‍या संदर्भात त्यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नावर सरकार बोलत नाही. त्‍यांनी उपस्थित केलेल्‍या मुद्यांवर सरकार काही बोलणार नसेल आणि कार्यवाही करणार नसेल तर, या विरोधात न्‍यायालयाची दारे आम्‍हाला ठोठवावेच लागतील असे आ. विखे पाटील यांनी ठणकावून सांगितले.

राष्ट्रवादी काँग्रेसचे आ. अमोल मिटकरी यांनी ब्राह्मण पुरोहीतां संदर्भात केलेल्या वक्तव्याचा निषेध करून आ. विखे पाटील म्हणाले की, याबाबत प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिलगीरी व्यक्त केली असली तरी मिटकरी माफी मागायला तयार नाहीत यावरूनच राष्ट्रवादीचा दुटप्पीपणा उघड  होतो. बेताल आरोप करण्‍याची राष्‍ट्रवादी कॉग्रेसचे परंपराच आहे. धर्मात आणि जातींबाबत वेगवेगळी मुक्‍ताफळे उधळायची आणि जेव्‍हा अंगावर येते तेव्‍हा क्षमा मागायची. एकाने मारल्या सारखे करायचे आणि दुसऱ्याने माफी मागायची यासाठी राष्ट्रवादीने बेताल वक्तव्य करण्यासाठी काही माणस पुढे केली असल्याचा आरोप आ. विखे पाटील यांनी केला.

मुंबई महापालिकेत झालेल्या भ्रष्टाचाराच्या विरोधात भाजपाने पोलखोल अभियान सुरू केले आहे. मात्र भ्रष्टाचाराची सर्व लफ्तरे आता समोर येतील या कारणाने अभियानाच्‍या रथावर दगडफेक करण्‍यात येत आहे. काही ठिकाणी स्‍टेजची मोडतोड करण्‍यात आली. पण या कृतीने आम्ही गप्प बसू असे कोणी समजत असेल तर तो त्‍यांचा गैरसमज आहे. येणाऱ्या काळात महाविकास आघाडी सरकारच्या भ्रष्टाचाराची पोलखोल करण्यासाठी सुध्दा राज्यभर आशाच पोलखोल अभियान यात्रा सुरू करण्याचा इशारा आ. विखे यांनी दिला.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने घेतलेल्या भूमिकेबद्दल राज ठाकरे यांचे अभिनंदन करून आ. विखे पाटील म्हणाले की, त्यांच्या भूमिकेमुळे महाविकास आघाडीचे मंत्री मंदीरात दिसू लागले, पालख्या खांद्यावर घेताना दिसून आले. आघाडी सरकारची पळताभुई थोडी झाल्याचे स्पष्ट दिसते. आत्‍तापर्यंत या सर्वांची त्‍यांना लाज वाटत होती. महाविकास आघाडी सरकारमधील नेत्‍यांना आता जाग आली आहे. भाजपाची यासर्व विषयातील भूमिका अतिशय सुस्पष्ट आहे, त्यामुळे भाजपला कोणाचा पुरस्कार करण्याची आवश्यकता नसल्‍याचे विखे यांनी ठामपणे सांगितले.
Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !