संगमनेर Live | संगमनेर तालुक्यातील पिंप्री - लौकी अजमपूर येथील तरुण शेतकरी संतोष पांडुरंग लावरे (वय - ३८) याने सततच्या शेत मालाला मिळणाऱ्या कवडीमोल भावाला कंटाळून गळफास घेत आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना मंगळवारी दि. २४ मे रोजी उघडकीस आल्याने पंचक्रोशीत शोककळा पसरली आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, पिंप्री - लौकी अजमपूर येथील तरुण शेतकरी संतोष लावरे यांच्याकडे उदरनिर्वाह करण्यापुर्ती कोरडवाहू शेती होती. परंतू सततच्या नापिकीमुळे त्यांची आर्थिक परिस्थिती हालाखीची झाली होती.
त्यामुळे कुटुंबाचा उदरनिर्वाह या शेतीवर होत नसल्यामुळे संतोष लावरे हे मोल-मजुंरीचे काम करत होते. सततच्या बिकट आर्थिक परिस्थितीला कंटाळून संतोष लावरे यांनी घराच्या थोड्या अंतरावर असणाऱ्या डोंगराच्या कडेला असलेल्या झाडाला गळफास घेत आत्महत्या केली.
दरम्यान या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी जाऊन घटनेचा पंचनामा करत लावरे यांचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी लोणी येथील प्रवरा ग्रामीण रुग्णालयात पाठवला. संतोष लावरे यांच्या पश्चात पत्नी, दोन विवाहीत मुली व मुलगा असा परिवार असून त्याच्या अकस्मात निधनामुळे पंचक्रोशीत शोककळा पसरली आहे.