◻ कृषि क्षेत्रातील नवीन प्रयोगासाठी प्रवरा बॅकेच्या माध्यमातून होणार कर्जाची उपलब्धता
◻ महिला बचत गटाच्या प्रकल्पाला प्रवरा सहकारी बॅकेच्या माध्यमातून मिळणार पाठबळ
◻ २२ राज्यात सीमॅपच्या माध्यमातून सुंगधी औषधी वनस्पतींवर काम सुरु असल्याने शेतकऱ्यांना होतोय मोठा फायदा
संगमनेर Live | औषधी व सुगंधी वनस्पतींच्या शेती संवर्धनात सीमॅप सारख्या संशोधन संस्थेने मार्गदर्शन करण्याची घेतलेली भूमिका महत्वपूर्ण आहे. वनस्पती शेतीतूनही आता रोजगाराच्या संधीही उपलब्ध होवू शकतात. कृषि क्षेत्रातील या नवीन प्रयोगासाठी महिला बचत गट पुढे आल्यास प्रवरा सहकारी बॅकेच्या माध्यमातून कर्जाची उपलब्धता करुन देण्याची ग्वाही आ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली.
जनसेवा फौंडेशन, राहाता पंचायत समिती आणि लखनौ येथील सीमॅप या संशोधन संस्थेच्या संयुक्त विद्यमाने औषधी, सुगंधी वनस्पती लागवड व फुलशेतीच्या संदर्भात कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेस वनस्पती शेतीक्षेत्रात कार्यरत असलेले शेतकरी तसेच बचत गटांमधील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. या कार्यशाळेत सीमॅप संस्थेचे संचालक डॉ. प्रबोधकुमार त्रिवेदी सीमॅपचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. अलोक कार्ला, सीमॅपचे निर्देशक डॉ. महेंद्र दारोरकर, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ. शालिनी विखे पाटील, रणरागीणी महीला मंडळाच्या अध्यक्षा सौ. धनश्री विखे पाटील, गटविकास आधिकारी समर्थ शेवाळे, कृषि विज्ञान केंद्राचे डॉ. संभाजी नालकर, प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेचे सह मुख्य कार्यकारी आधिकारी डॉ. शिवानंद हिरेमठ यांच्यासह सीमॅप संस्थेचे सर्व शास्त्रज्ञ याप्रसंगी उपस्थित होते.
आपल्या भाषणात आ. विखे पाटील म्हणाले की, औषधी व सुगंधी वनस्पतींच्या शेतीचे संवर्धन करण्यासाठी कृषि क्षेत्रातील नव्या प्रयोगाची सुरुवात आपल्या भागात होत आहे. ही शेती करण्यासाठी उत्सुक असलेल्या किंवा सध्या ही शेती करीत असलेल्या शेतकऱ्यांसाठी हा सुरु होत असलेल्या प्रकल्प दिशादर्शक ठरणार आहे. औषधी वनस्पतींच्या बाबतीत केंद्र सरकारनेच आता महत्वपूर्ण धोरण घेतले आहेच, परंतू सीमॅप सारखी संशोधन संस्था यामध्ये पुढाकार घेवून शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शकाची भूमिका बजावत असल्याने या वनस्पती शेतीकडे आता उद्योग म्हणूनच पाहावे लागेल. यातून शेतकऱ्यांना मोठ्या संधी उपलब्ध होतील असेही त्यांनी आवर्जुन नमुद केले.
वनस्पती शेतीला अद्यापही बॅका अर्थसहाय्य करीत नाहीत. त्यामुळे इच्छा असतानाही शेतकरी ही शेती करु शकत नाही परंतू आपल्या भागामध्ये महिला बचत गट वनस्पती शेती करण्यासाठी पुढे आल्यास प्रवरा बॅकेंच्या माध्यमातून कर्जरुपी अर्थसहाय्य करण्याची घोषणाही त्यांनी या कार्यशाळेत केली. जिल्हा सहकारी बॅकेचे चेअरमन असताना महिला बचत गटांना ६ टक्के व्याजदराने कर्जाची उपलब्धता करुन दिली होती. कारण बचत गटांच्या कर्जाची शंभर टक्के वसुली होती. वनस्पती शेती क्षेत्रातील उत्पादनातून बचत गटांचे कर्जही वसुल होवू शकते ही खात्री असल्यामुळे सीमॅप संशोधन संस्था मंजुर करेल त्या बचत गटाच्या प्रकल्पाला प्रवरा सहकारी बॅकेच्या माध्यमातून पाठबळ देणार असल्याचे त्यांनी सांगितले.
सीमॅपचे संचालक डॉ. प्रबोधकुमार त्रीवेदी म्हणाले की, देशामध्ये २२ राज्यात सीमॅपच्या माध्यमातून सुंगधी औषधी वनस्पतींवर काम सुरु आहे. यातून शेतकऱ्यांना मोठा फायदा होत असून, देशातील जिरायत भागातील शेतकऱ्यांना उभे करण्यासाठी आत्मनिर्भर करणारी ही योजना महत्वपूर्ण ठरत असल्याचे त्यांनी सांगितले. सुंगधी तेलाची मागणी भविष्यात मोठ्या प्रमाणात वाढणार असून, त्यादृष्टीने या भागात शेतकरी, जनसेवा फौंडेशन आणि सीमॅपच्या माध्यमातून सुरु होत असलेला हा नवा प्रकल्प शेतकऱ्यांबरोबरच महिलांसाठी सुध्दा दिशादर्शक ठरेल असे त्यांनी सांगितले.
सीमॅपचे शास्त्रज्ञ डॉ. अलोक कार्ला यांनी सीमॅपच्या माध्यमातून सुगंधी औषधी वनस्पतींबरोबरच फुलशेतीवर सुध्दा संशोधन सुरु असून, या माध्यमातून सुरु असलेल्या अरोरा मिशनमुळे उत्पादकता आणि गुणवत्ता वाढविण्यास मोठी मदत झाली असल्याचे सांगितले. सी मॅप चे निर्देशक महेंद्र दारोरकर यांनी पारंपारिक शेतीपेक्षा वनस्पती शेतीमध्ये मोठ्या संधी शेतकऱ्यांना आहेत. पडीत जमीनींचा सुध्दा उपयोग याकरीता करता येतो. सुंगधी तेल निर्मिती बरोबरच फुलशेती आणि मधुमक्षीका या पुरक उद्योगातून मधाचे उत्पादनसुध्दा आता या शेतीमधून उद्योजकतेला नवी दिशा देत असल्याचे त्यांनी आवर्जुन सांगितले.
जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ. शालिनीताई विखे पाटील म्हणाल्या की, कोव्हीड नंतर औषधी वनस्पतींच्या संदर्भात एक कार्यक्रम घेवून औषधी वनसस्पतींचे वाटप जनसेवा फौंडेशनच्या माध्यमातून केले होते. औषधी वनस्पतींची परसबाग हा प्रकल्प हाती घेतला होता. या कार्यशाळेच्या निमित्ताने या प्रकल्पालाच आता मोठे स्वरुप प्राप्त होत असून, सीमॅपच्या माध्यमातून महिला बचत गटांना एक नवी दिशा मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली.
दरम्यान या कार्यक्रमाचे प्रास्ताविक गटविकास आधिकारी समर्थ शेवाळे यांनी केले. याप्रसंगी सीमॅपआणि जनसेवा फौंडेशन यांच्या माध्यमातून उत्पादीत करण्यात येत असलेल्या सॅनीटरी नॅपकीनच्या प्रकल्पाचे उद्घाटन करण्यात आले. लखनौ येथे प्रशिक्षण पुर्ण केलेल्या प्रतिनिधींना प्रमाणपत्राचे वितरण करण्यात आले. तसेच उमेद महाराष्ट्र ग्रामीण जिवनोन्नती अभियान योजनेतून राहाता तालुक्यातील ७० बचत गटांना १ कोटी ६१ लाख ३६ हजार रुपयांच्या धनादेशांचे वितरण सौ. शालिनी विखे पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.