अहमदनगर-पुणे मार्गावर धावली राज्यातील पह‍िली 'ई-बस'

संगमनेर Live
0
महामंडळाचे पह‍िले वाहक लक्ष्मणराव केवटे यांच्याहस्ते ह‍िरवा झेंडा

◻बस एकदा चार्ज केल्यानंतर जाणार २५० कि.मी. पर्यंत

◻आत्याधुनिक सोय सुविधानी बस सज्ज

◻१९४८ च्या इतिहासाची झाली पुनावृत्ति

संगमनेर Live (ज‍िमाका वृत्तसेवा) | राज्य पर‍िवहन महामंडळाची पह‍िली बस १ जून १९४८ रोजी पुणे - अहमदनगर मार्गावर धावली होती. त्या इत‍िहासाची १ जून २०२२ रोजी अहमदनगर - पुणे दरम्यान पुनरावृत्ती झाली. अहमदनगर-पुणे दरम्यान 'श‍िवाई' या राज्यातील पह‍िल्या व‍िद्युत घटावरील (ई-बस) सेवेची सुरूवात महाराष्ट्र राज्य पर‍िवहन महामंडळाचे पहिले वाहक अहमदनगर येथील लक्ष्मणराव शंकरराव केवटे यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून करण्यात आली. 

एसटी महामंडळाच्या प्रवासी सेवेला ७४ वर्ष पूर्ण झाली आहेत. अमृत महोत्सवी वर्षात पदार्पण झाले आहे. एसटीची पहिली बस माळीवाडा येथून पुण्याच्या द‍िशेने धावली होती. श‍िवाई ही 'ई-बस' ही याच मार्गावरून धावणार आहे. आज तारकपूर आगारातून या 'ई-बस' सेवेला सुरूवात करण्यात आली. यावेळी जिल्हाधिकारी डॉ राजेंद्र भोसले, महापौर रोहिणी शेंडगे, आयुक्त शंकर गोरे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी उर्मिला पवार, निवासी उपजिल्हाधिकारी संदीप निचित, विभाग नियंत्रक विजय गीते, शिवाई ई - बसचे वाहक जयदेव हेंद्रे व चालक गणेश साबळे आदी उपस्थ‍ित होते.

श‍िवाई 'ई-बस' अहमदनगर येथून पहिल्या द‍िवशी सकाळी साडेनऊ वाजता व त्यानंतर रोज सकाळी सात वाजता पुण्याच्या द‍िशेने जाणार आहे. एसटी महामंडळाने एक मोठे पाऊल उचलले आहे. टप्प्याटप्प्याने श‍िवाई ई-बस वाढव‍िण्याचे न‍ियोजन आहे. या उपक्रमामुळे इंधनबचतीबरोबरच प्रदूषण ही कमी होणार आहे. 

विद्युत प्रणालीवर चालणाऱ्या शिवाई बसची वैशिष्ट्ये..

शिवाई बस विद्युत घटावर चालणारी आहे. त्यामुळे बस प्रदूषण विरहित, पर्यावरण पूरक, वातानुकुलीत व आवाज विरहित आहे. बसला आकर्षक रंगसंगतीमध्ये ‘शिवाई’असे नाव देण्यात आले आहे. बस एकदा चार्ज केल्यानंतर जास्तीत जास्त २५० कि.मी. पर्यंत जाऊ शकते. प्रत्येक प्रवाशांसाठी स्वतंत्र व स्वनियंत्रित वातानुकुलीत लुव्हर बसविण्यात आले आहे व त्या सोबत वाचण्यासाठी स्वतंत्र दिवा देण्यात आला आहे. ही बस १२ मीटर लांबीच्या सांगाड्यावर बांधण्यात आली असून तिची रुंदी २.६ मीटर व उंची ३.६ मीटर आहे. सांगाड्याच्या खालच्या बाजूस बसच्या मधोमध प्रशस्त असा सामान कक्ष देण्यात आला आहे. 

शिवाई बसमध्ये ४३ प्रवाशांसाठी बैठक व्यवस्था असून प्रवासी सीट हे ‘पुश बॅक‘ प्रकारचे देण्यात आले आहे. प्रत्येक दोन सीटच्यामध्ये दोन्ही प्रवाशांचे मोबाईल चार्जिंगसाठी स्वतंत्र युएसबी पोर्ट देण्यात आले आहे. चालक केबिन मध्ये प्रवाशी घोषणा यंत्रणा बसविली आहे. तसेच आपात्कालीन परिस्थितीमध्ये प्रवाशांना सावध करण्यासाठी यंत्रणा असून त्याचे बटन चालक कक्षात देण्यात आले आहे. प्रवासी कक्षातील हालचालीवर देखरेखीसाठी कॅमेरा प्रवाशी कक्षात बसविण्यात आले आहे. प्रवाशांच्या मनोरंजनासाठी अँड्रॉईड टीव्ही बसविण्यात आला आहे.

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !