◻निषेधार्थ संगमनेर मध्ये काँग्रेसकडून धरणे आंदोलन
◻केंद्रीय यंत्रणांच्या दबावाला काँग्रेस कधीही घाबरणार नाही - डॉ. तांबे
संगमनेर Live | काँग्रेस पक्षाला त्यागाची व बलिदानाची मोठी परंपरा आहे. १८८५ ते १९४७ या कालखंडात अनेक स्वातंत्र्यवीरांनी इंग्रजांच्या गोळ्या छातीवर झेललेल्या आहेत. त्यामुळे ईडी व तत्सम केंद्रीय यंत्रणांच्या दबावाला काँग्रेस कार्यकर्ते कधीही घाबरणार नाही. खा. श्रीमती सोनिया गांधी ह्या आजारी असताना त्यांना त्रास दिला जात असून त्यांच्यावरील चुकीच्या ईडी कारवाईचा आम्ही तीव्र निषेध करत असल्याचे आमदार डॉ. तांबे यांनी म्हटले आहे.
संगमनेर बस स्थानक येथे विधिमंडळ पक्षनेते आ. बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका व शहर काँग्रेसच्या वतीने काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा श्रीमती सोनिया गांधी यांच्यावरील चुकीच्या ईडी कारवाईच्या निषेधार्थ मोदी सरकार विरुद्ध धरणे आंदोलन करण्यात आले.
यावेळी नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार डॉ. सुधीर तांबे, कारखान्याचे अध्यक्ष बाबा ओहोळ, संचालक इंद्रजीत थोरात, तालुका अध्यक्ष मिलिंद कानवडे, शहराध्यक्ष सोमेश्वर दिवटे, माजी नगराध्यक्ष दिलीपराव पुंड, लक्ष्मणराव कुटे, प्रा. बाबा खरात, जिल्हा परिषद सदस्य रामहरी कातोरे, युवक काँग्रेसचे कार्याध्यक्ष सुभाष सांगळे, सुरेश झावरे, युवक शहराध्यक्ष निखिल पापडेजा, शकील पेंटर, अल्पसंख्याक अध्यक्ष जावेद शेख, शहर उपाध्यक्ष गणेश मादास, शफी तांबोळी, उबेद शेख, सुरेश थोरात, आनंद वर्पे, निलेश थोरात, गौरव डोंगरे आदींसह काँग्रेसच्या सर्व सेलचे पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी बोलताना आमदार डॉ. तांबे म्हणाले की, काँग्रेस पक्षाला त्यागाची परंपरा आहे. श्रीमती इंदिरा गांधी व राजीव गांधी यांनी देशाच्या एकात्मतेसाठी बलिदान दिले आहे. त्याच इंदिराजांच्या सून श्रीमती सोनिया गांधी यांनी दोन वेळा पंतप्रधान पद नाकारले. देशाचे हित घेऊन काम करणारा काँग्रेसचा विचार आहे.
या पक्षाने कधीही भेदभाव केला नाही. याउलट धर्माच्या नावावर मते मागणारा भाजप पक्ष सातत्याने जनतेची दिशाभूल करत आहेत. वाढलेली महागाई, बेरोजगारी यावरून लक्ष हटवण्यासाठी यंत्रणाचा वापर करून विरोधकांना नमोहरण करण्याचा प्रयत्न करत आहे. हे देशाच्या एकात्मतेला अत्यंत घातक असून हा लोकशाहीचा गळा घोटण्याचा प्रकार आहे. मोठमोठ्या उद्योगपतींना अब्जावती रुपयांचे अनुदान दिले जात आहे. मात्र गोरगरिबांच्या अनुदानाला कात्री लावून त्यांना रेवड्या म्हणून त्यांना हिणवले जात आहे.
भाजपा सरकार सर्व पातळ्यांवर अत्यंत अपयशी ठरले जात असून या अपयशाविरुद्ध आवाज उठवणाऱ्या काँग्रेस पक्षावर ते ईडी सारख्या यंत्रणांचा वापर करत आहेत. काँग्रेस पक्षाच्या कार्यकाळात अवघ्या ४० ईडी कारवाया झाल्या होत्या. मात्र भाजपच्या काळात ४ हजार ईडी कारवाया झाल्या आहेत. हे द्वेषाचे राजकारण अत्यंत चुकीचे असून सोनिया गांधी या खंबीर आहेत . लढवैय्या आहेत. त्या कधीही अशा कारवायांना भीक घालणार नाही. त्यांच्या पाठीशी पूर्ण भारतातील जनता असल्याचेही आमदार डॉ. तांबे यांनी म्हटले आहे .
यावेळी तालुका अध्यक्ष मिलिंद कानवडे, बाबा ओहोळ आदिनी आपले मनोगत व्यक्त केले. दरम्यान याप्रसंगी पक्षातील विविध पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी मोदी सरकार व ईडी विरोधात घोषणाबाजी करण्यात आली.