◻ खजिनदारपदी गौरव राठी यांची निवड
संगमनेर Live | लायन्स क्लब संगमनेर सफायरचा १७ वा पदग्रहन समारंभ मालपाणी हेल्थ क्लब येथे नुकताच पार पडला. २०२२-२३ या वर्षासाठी अध्यक्ष म्हणून उद्योजक उमेश कासट, सचिवपदी उद्योजक कल्याण कासट तर खजिनदारपदी उद्योजक गौरव राठी यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.
पदग्रहन अधिकारी म्हणून पुणे येथील प्रसिद्ध उद्योजक लायन्सचे माजी डिस्ट्रिक्ट गव्हर्नर जितेंद्र मेहता उपस्थित होते. पदग्रहन समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून लायन्सचे माजी मल्टिपल कौन्सिल चेअरपर्सन प्रसिद्ध उद्योजक गिरीश मालपाणी, संगमनेर सफायरचे माजी अध्यक्ष मिलिंद पलोड, लायन्सचे रिजन चेअरपर्सन सुनील साठे, झोन चेअरपर्सन रोहित मणियार हे उपस्थित होते.
लायन्स क्लबच्या माजी अध्यक्षा मीना मणियार यांनी यावेळी आपले मनोगत व्यक्त केले. कोव्हीडच्या काळातही लायन्स क्लबच्या सर्व सदस्यांनी उल्लेखनीय कामगिरी केल्याचे मणियार यांनी सांगितले. प्रवरा नदीपात्र स्वछता, गणेशोत्सव निर्माल्य संकलन, आरोग्य तपासणी, मधुमेह तपासणी व उपचार, गरजू विद्यार्थ्यांना संगणक प्रदान, कोव्हिड योद्ध्यांचा सन्मान असे अनेक प्रकारचे उपक्रम राबविल्याचे त्यांनी सांगितले. माजी सचिव पूजा कासट आणि माजी खजिनदार स्वाती मालपाणी यांचे त्यांनी आभार मानले.
सन २०२२-२३ मध्ये ३० नवीन सदस्यांनी लायन्स क्लब ऑफ संगमनेर सफायरचे सदस्यत्व घेतले. माजी अध्यक्ष मिलिंद पलोड यांनी या नवीन सदस्यांना पदग्रहणाची शपथ दिली.
पदग्रहन अधिकारी ला. जितेंद्र मेहता यांनी संचालक मंडळाला पदग्रहणाची शपथ दिली. प्रत्येकाला आपल्या पदाची जबाबदारी समजावून सांगितली. लायन्स क्लब संगमनेर सफायरच्या कामाचे त्यांनी कौतुक केले. सचिव कल्याण कासट आणि खजिनदार गौरव राठी यांनी शपथ घेऊन यावर्षी अनेक समाजोपयोगी कामे करून अध्यक्ष उमेश कासट यांना सर्वोतोपरी मदत करणार असल्याचे सांगितले.
नूतन अध्यक्ष उमेश कासट यांचा व्यक्तिपरिचय ला. जितेश लोढा यांनी उपस्थितांना करून दिला. उमेश कासट यांनी अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारताना यावर्षी विविध समाजोपयोगी उपक्रम राबविणार असल्याचे सांगितले.
माजी मल्टिपल कौन्सिल चेअरपर्सन आणि लायन्स क्लब संगमनेर सफायरचे आधारस्तंभ ला. गिरीश मालपाणी यांनी सर्व पदाधिकारी आणि सदस्यांना शुभेच्छा दिल्या. सचिव कल्याण कासट यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले.