राष्ट्रध्वजाचा वापर करतांना घ्यावयाच्या दक्षता....!

संगमनेर Live
0

ध्वज फडकविण्याबाबतचे नियम..

संगमनेर Live | भारतीय स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर, जनतेच्या मनात स्वातंत्र लढ्याच्या स्मृती तेवत रहाव्यात, स्वातंत्र्य संग्रामातील अज्ञात नायक, क्रांतिकारक, स्वातंत्र्य संग्रामात घडलेल्या विविध घटना यांचे स्मरण व्हावे, स्वातंत्र्यासाठी चेतवलेले स्फुलिंग कायम तेवत रहावे व देशभक्तीची जाज्वल्य भावना कायमस्वरूपी जनमानसात राहावी, या उद्देशाने या देदीप्यमान इतिहासाचे अभिमानपूर्वक स्मरण करण्यासाठी १३ ऑगस्ट ते १५ ऑगस्ट २०२२ या कालावधीसाठी केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे "घरोघरी तिरंगा' हा उपक्रम राबविण्यात येत आहे. 

हा उपक्रम राबविताना ध्वजसंहिता २००२ व डिसेंबर २०२१ व जुलै २०२२ मधील बदलेल्या अधिसूचनांचे अचूक पालन होण्यासाठी काय दक्षता घ्यावी. याबाबतचे संक्षिप्त विवरण..

ध्वज तयार करण्याबाबत निर्देश..

• तिरंगा ध्वजाचा आकार आयताकार असावा.
• तिरंगा ध्वजाची लांबी रुंदी हे प्रमाण ३: २ असे असावे.
• तिरंगा बनविण्यासाठी खादी अथवा कॉटन, पॉलीस्टर, सिल्क कापड यापासून बनविण्यात यावे.

• ध्वजामध्ये सर्वात वर केशरी, मध्यभागी पांढरा व खाली हिरवा रंग असा तिरंगा बनविला जातो. मध्यभागातील पांढऱ्या पट्टीवर २४ रेषांचे गोलाकार निळया रंगाचे अशोकचक्र असते. 

ध्वज फडकविण्याबाबतचे नियम..

• प्रत्येक नागरिकाने तिरंगा ध्वज फडकविताना भारतीय ध्वज संहिता २००२ व डिसेंबर २०२१ व जुलै २०२२ मधील बदलेल्या अधिसूचनांचे पालन करावे.

• तिरंगा ध्वज फडकविताना केशरी रंग वरच्या बाजूने असावा.
• तिरंगा ध्वज उतरविताना काळजीपूर्वक सन्मानाने उतरवावा.
• १३ ते १५ ऑगस्ट २०२२ या कालावधीत 'घरोघरी तिरंगा' उपक्रमांतर्गत लावण्यात आलेले ध्वज अभियान कालावधीनंतर ध्वज फेकला जावू नये, तो सन्मानाने जतन करून ठेवावा.

• अर्धा झुकलेला, फाटलेला, कापलेला ध्वज कुठलेही परिस्थितीत लावला जावू नये.

• वाणिज्यिक प्रयोजनासाठी ध्वजाचा वापर करता येणार नाही.
• कोणत्याही व्यक्ती किंवा वस्तूला मानवंदना देण्यासाठी ध्वज खाली आणता येणार नाही.

• ज्या प्रसंगी, शासनाने दिलेल्या निर्देशांनूसार सरकारी इमारतीवरील ध्वज अर्ध्यावर उतरविण्यात येतो त्या प्रसंगाखेरीज ध्वज अर्ध्यावर उतरविण्यात येणार नाही.
• खासगी अंत्यसंस्कारासह जे कोणतेही असेल अशा कोणत्याही स्वरुपातील आच्छादन म्हणून ध्वजाचा वापर करता येणार नाही.

• ध्वजाचा कोणत्याही प्रकारच्या पोशाखाचा अथवा गणवेशाचा भाग म्हणून वापर करता येणार नाही किंवा त्याचे उशा, हातरुमाल, हात पुसणे यांवर किंवा कोणत्याही पोषाख साहित्यावर भरतकाम करता येणार नाही किंवा छपाई करता येणार नाही.

• ध्वजावर कोणत्याही प्रकारची अक्षरे लिहिता येणार नाहीत.
• ध्वजाचा कोणतीही वस्तू घेण्याचे, देण्याचे, बांधण्याचे किंवा वाहून नेण्याचे साधन म्हणून वापर करता येणार नाही.

• ध्वजाचा वक्त्याचा टेबल (डेस्क) झाकण्यासाठी वापर करता येणार नाही किंवा वक्त्याच्या व्यासपीठावर आच्छादता येणार नाही.

• ध्वजाचा जाणीवपूर्वक भूमिशी किंवा जमिनीशी स्पर्श होऊ देऊ नये किंवा तो पाण्यावरुन फरफटत नेऊ नये.

• ध्वज मोटार वाहन, रेल्वे गाडी, जहाज किंवा विमान यांच्या झडपावर, छतावर, बाजूंवर किंवा पाठीमागच्या बाजूस आच्छादता येणार नाही.

• ध्वजाचा एखाद्या इमारतीचे आच्छादन म्हणून वापर करता येणार नाही.

• ध्वजाचा " केशरी " रंगाचा पट्टा खालच्या बाजूस येईल अशाप्रकारे जाणीवपूर्वक ध्वज लावता येणार नाही.
• ज्या ज्या ठिकाणी राष्ट्रध्वज लावण्यात येईल अशा प्रत्येक ठिकाणी त्याची प्रतिष्ठा राखून आणि तो स्पष्टपणे दिसेल अशा प्रकारे लावला पाहिजे.

• फाटलेला अथवा चुरगळलेला ध्वज लावण्यात येऊ नये.
• ध्वज अन्य कोणत्याही ध्वजासोबत किंवा ध्वजांसोबत एकाच वेळी एकाच काठीवर फडकवू नये.

• ध्वज संहितेच्या भाग तीनच्या कलम नऊ मध्ये अंतर्भूत केलेल्या तरतुदीं व्यतिरिक्त कोणत्याही वाहनांवर ध्वज लावण्यात येऊ नये.

• राष्ट्रध्वजापेक्षा उंच किंवा राष्ट्रध्वजाच्या वर किंवा त्याच्या बरोबरीने अन्य कोणताही ध्वज किंवा पताका लावू नये, तसेच ज्या काठीवर ध्वज फडकत ठेवला असेल त्या काठीवर किंवा त्या काठीच्या वरच्या टोकावर फुले किंवा हार यासह कोणतीही वस्तू ठेवू नये अथवा बोधचिन्ह लावू नये.

• ध्वजाचा तोरण, गुच्छ अथवा पताका म्हणून किंवा अन्य कोणत्याही प्रकारे शोभेसाठी उपयोग करू नये,
• ध्वज फाटेल अशा प्रकारे तो लावू नये किंवा बांधू नये.

ध्वज लावण्याची योग्य पद्धत..

• ज्या ज्या ठिकाणी ध्वज लावण्यात येईल अशा प्रत्येक ठिकाणी त्याची प्रतिष्ठा राखून तो स्पष्टपणे दिसेल अशा रीतीने लावला पाहिजे.

• जेव्हा खिडकीची कड, सज्जा अगर इमारतीचा पुढील भाग अशा ठिकाणी आडव्या किंवा तिरक्या बसविलेल्या काठीवरून ध्वज फडकविण्यात येतो तेव्हा ध्वजाची केशरी रंगाची बाजू काठीच्या वरच्या टोकाकडे असावी.

ध्वजसंहिता नियमात बदल..

• भारतीय ध्वज संहिता २००२ भाग - १ मधील परिच्छेद १.२ मधील राष्ट्रध्वज हे “हाताने कातलेल्या किंवा विणलेल्या लोकर/सुत/सिल्क/खादी कापडापासून बनविलेला असेल”, या तरतुदीमध्ये ३० डिसेंबर २०२१ रोजीच्या अधिसूचनेन्वये बदल करण्यात आला आहे. या बदलानुसार राष्ट्रध्वज हे हाताने कातलेल्या आणि हाताने विणलेल्या किंवा मशीनद्वारे तयार केलेल्या सूत / पॉलिस्टर/ लोकर/ सिल्क/खादी पासून बनविलेल्या कापडाचे असावेत, असा उल्लेख केला आहे. यानुसार प्लास्टीक ध्वजाचा वापर होऊ नये, यासाठी आपण सर्वांनी कटाक्षाने खबरदारी घेणे गरजेचे आहे.

• २० जुलै २०२२ ला केलेल्या सुधारणेनुसार आता राष्ट्रध्वज दिवसा आणि रात्री दोन्ही वेळेला फडकावता येईल. मग तो खुल्या जागेवर किंवा घरावर असेल तरीही तो फडकावण्याची परवानगी देण्यात आली आहे. या आधी राष्ट्रध्वज सूर्योदय ते सूर्यास्त या काळातच फडकावण्याची परवानगी होती. ध्वजारोहण मात्र सुर्यादयानंतर सकाळीच करावयाचे आहे.

• शासकीय कार्यालये व संस्था वगळता इतर सर्व खासगी व्यक्तींना १३ ते १५ ऑगस्ट २०२२ या कालावधीत ध्वजसंहिता पालन करत दिवस-रात्र आपल्या इमारतींवर ध्वज फडकाविता येईल. मात्र शासकीय कार्यालये व संस्थांनी ध्वजसंहितेच्या नेहमीच्या नियमांचे पालन करावे.

Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !