◻ केरळ राज्याचे राज्यपाल आरिफ मोहम्मद खान राहणार उपस्थित
◻ खा. डॉ. सुजय विखे पाटील यांची माहिती
संगमनेर Live (लोणी) | सहकारी साखर कारखानदारीचे जनक पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील यांच्या १२२ व्या जयंती दिनानिमित्त देण्यात येणाऱ्या राज्यस्तरीय साहित्य आणि कलागौरव पुरस्कार वितरण सोहळ्यास केरळ राज्याचे राज्यपाल आरिफ मोहम्मद खान प्रमुख अतिथी म्हणून उपस्थितीत राहणार असून, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष भारत सासणे यांच्या अध्यक्षतेखाली हा जयंती दिन समारंभ संपन्न होणार असल्याची माहीती खा. डॉ. सुजय विखे पाटील यांनी दिली.
पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील यांच्या जयंती दिनाचे औचित्य साधुन दरवर्षी साहित्य आणि कलागौरव पुरस्काराचे वितरण करण्यात येते. प्रवरानगर येथील डॉ. धनंजयराव गाडगीळ सभागासमोरील प्रांगणात बुधवार दि. ११ ऑगस्ट रोजी सकाळी १० वा. या साहित्य पुरस्कार वितरण सोहळ्यास केरळ राज्याचे राज्यपाल आरिफ मोहम्मद खान हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार असून, ९५ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष भारत सासणे यांच्या अध्यक्षतेखाली हा पुरस्कार वितरण सोहळा संपन्न होणार आहे.
या पुरस्कार वितरण सोहळ्यास बुलढाणा को-ऑपरेटीव्ह सोसायटीचे चेअरमन राधेशामजी चांडक, सामाजिक कार्यकर्ते शिवराज सिंग, मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील, माजीमंत्री आण्णासाहेब म्हस्के पाटील, प्रवरा अभिमत विद्यापीठाचे कुलपती डॉ. राजेंद्र विखे पाटील, पुरस्कार निवड समितीचे अध्यक्ष डॉ. रावसाहेब कसबे, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ. शालिनीताई विखे पाटील यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी तसेच साहित्यप्रेमी उपस्थित राहणार असल्याचे खा. डॉ. विखे पाटील म्हणाले.
यावर्षी जेष्ठ साहित्यीक आणि विचारवंत किशोर बेडकिहाळ यांना जीवनगौरव पुरस्कार, बुलढाणा येथील रविंद्र इंगळे यांच्या ‘सिंधूकालीन लिपी’ आणि भारतीय भाषांचा इतिहास या संशोधन ग्रंथास उत्कृष्ठ साहित्य पुरस्कार, मंगेश नारायण काळे यांच्या ‘चित्रसंहिता’ या चित्र समिक्षा ग्रंथास विशेष साहित्य पुरस्कार,
संगमनेर येथील के. जी भालेराव यांच्या ‘तमासगीर माणसं’ या ललितलेख संग्रहास अहमदनगर जिल्हा उत्कृष्ठ साहित्य पुरस्कार, संगमनेर येथील हिरालाल पगडाल यांच्या ‘इलेक्शन बिलेक्शन’ या पुस्तकास जिल्हा विशेष साहित्य पुरस्कार, संगमनेर येथील छबुबाई चव्हाण यांना कलेच्या सेबेबद्दल पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील कलागौरव पुरस्कार,
ठाणे येथील (अभय कांता) यांच्या ‘परिवर्तनाचा वाटसरु’ यांना समाज प्रबोधन व नांदेड येथील दत्ता भगत यांना नाट्यसेवा पुरस्काराने सन्मानित करण्याचा निर्णय पुरस्कार निवड समितीने घेतला आहे.
दरम्यान या पुरस्कारर्थीचा सन्मान प्रवरा परिवाराच्या वतीने करण्यात येणार आहे. या साहित्य पुरस्कार वितरण सोहळ्यास व शेतकरी दिनास शेतकरी, कार्यकर्ते आणि साहित्य प्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन प्रवरा परिवाराच्या वतीने करण्यात आले आहे.