साहित्‍यीक व कलाकारांचा होणारा सन्‍मान हे समाज जिवंत असल्‍याचे लक्षण - राज्यपाल

संगमनेर Live
0
पद्मश्री डॉ. विखे पाटील यांच्‍या १२२ व्‍या जयंतीनिमित्त राज्‍यस्‍तरीय साहित्‍य व कलागौरव पुरस्‍कारांचे वितरण राज्‍यपालांच्‍या हस्‍ते संपन्‍न 

संगमनेर Live (लोणी) | भारतीय संस्‍कृतीचा मुलभूत सिंध्‍दांतच हा त्‍यागाशी जोडला गेला आहे. ही संस्‍कृती सगळ्यांमध्‍ये एकता निर्माण करणारी आहे. येथील साहित्‍य आणि कलासुध्‍दा मानवाला एकत्रित ठेवून मजबुत करण्‍याचे काम करत असल्‍यामुळेच उद्याच्‍या काळात भारत देश बौध्‍दीक, अध्‍यात्मिक, वैज्ञानिक, आर्थिेक क्षेत्रात जगावर राज्‍य करेल असा अशावाद केरळचे राज्‍यपाल आरीफ महोमंद खान यांनी व्‍यक्‍त  केला.

सहकार चळवळीचे जनक पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील यांच्‍या १२२ व्‍या जयंतीचे औचित्‍य साधून परंपरेप्रमाणे देण्‍यात येणाऱ्या राज्‍यस्‍तरीय साहित्‍य आणि कलागौरव पुरस्‍कारांचे वितरण राज्‍यपालांच्‍या हस्‍ते संपन्‍न झाले. ९५ व्‍या अखिल भारतीय साहित्‍य संमेलनाचे अध्‍यक्ष भारत सासणे यांच्‍या अध्‍यक्षतेखाली संपन्‍न  झालेल्‍या या कार्यक्रमास बुलढाणा अर्बन बॅकेचे अध्‍यक्ष राजेश्‍यामजी चांडक, पुरस्‍कार निवड समितीचे अध्‍यक्ष जेष्‍ठ साहित्‍यीक डॉ. रावसाहेब कसबे, माजी मंत्री आण्‍णासाहेब म्‍हस्‍के पाटील, प्रवरा अभिमत विद्यापीठाचे कुलपती डॉ. राजेंद्र विखे पाटील, खासदार डॉ. सुजय विखे पाटील, माजी आमदार चंद्रशेखर कदम, भाजपाचे जिल्‍हाध्‍यक्ष राजेंद्र गोंदकर, जिल्‍हा परिषदेच्‍या माजी अध्‍यक्षा सौ. शालिनीताई विखे पाटील यांच्‍यासह प्रवरा परिवाराचे सर्व संस्‍थाचे पदाधिकारी याप्रसंगी उपस्थित होते. प्रारंभी सर्व मान्‍यवरांनी सर्व पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील यांच्‍या स्‍मृतीस्‍थळास अभिवादन करुन पुष्‍पचक्र अर्पन केले. लोकनेते खा. डॉ. बाळासाहेब विखे पाटील यांच्‍या स्‍मृतीस्‍थळासही पुष्‍पाजंली अर्पन करण्‍यात आली.

यंदाच्‍या वर्षी साहित्‍य जीवन गौरव पुरस्‍काराने किशोर बेडकीहाळ, रविंद्र इंगळे-चावरेकर, अभय गुलाबचंद कांता, मंगेश नारायण काळे, के. जी भालेराव, हिरालाल पगडाल यांना साहित्‍य पुरस्‍काराने तर दत्‍ता भगत आणि छबुबाई चव्‍हाण यांना कला गौरव पुरस्‍काराने सन्‍मानित करण्‍यात आले. रोख रक्‍कम स्‍मृतीचिन्‍ह असे या पुरसकाराचे स्‍वरुप असून, पुरस्‍काराचे यंदाचे ही ३२ वर्ष आहे.

आपल्‍या भाषणात राज्‍यपाल आरीफ महोमंद खान म्‍हणाले की, समाजातील साहित्‍यीकांचा आणि कलाकारांचा होणारा सन्‍मान हे समाज जिवंत असल्‍याचे लक्षण असून, जे शेतकऱ्यांशी जोडल्‍या गेलेल्‍या संघटनातून हा सत्‍कार होत असल्‍याने याचे महत्‍व अधिक असल्‍याचा गौरवपूर्ण उल्‍लेख करुन, त्‍यांनी सांगितले की, महाराष्‍ट्राच्‍या भूमिला संत ज्ञानेश्‍वर आणि संत तुकारांमाचा जसा अध्‍यात्मिक वारसा मिळाला तसाच छत्रपती शिवाजी महाराजांकडून स्‍वराज्‍याचीही कल्‍पना मिळाली. या संकल्‍पनेतूनच स्‍वातंत्र्यांच्‍या आंदोलनाची प्रेरणा मिळाली असल्‍याचे स्‍पष्‍ट करुन, त्‍यांनी सांगितले की, मी कोण आहे किंवा मी कुठून येतो यापेक्षाही भारतीय संस्‍कृतीचे मुळ शोधले पाहीजे ती खरी आपली चेतना आहे. घरामध्‍ये जशी आपण किमती वस्‍तु जपून ठेवतो तशीही संस्‍कृती मुल्‍य आणि आदर्शांच्‍या आधारावर आपल्‍याला जपावी लागणार आहे. हे आदर्शच उद्या चरितार्थाचा भाग बनणार असल्‍याचे त्‍यांनी सांगितले.

हजारो वर्षांपुर्वीचा हा संस्‍कृतीचा इतिहास रामायण, महाभारत, कुराण, बायबल या सर्वच ग्रंथामध्‍ये पाहायला मिळतो. याचाच अर्थ ही एक शब्‍दाची ताकद आहे. शब्‍दांच्‍या समुहानेच भावना अभिव्‍यक्‍त होतात. यातूनच मानसीक बळ आणि मानवी भावना अधिक सुदृढ करण्‍याचे काम भाषेच्‍या माध्‍यमातून झाले असल्‍याचे सांगतानाच साहित्‍यातून आदर्श मुल्‍य निर्माण होण्‍याची गरज व्‍यक्‍त करतानाच प्राकृतीक बदलाची निशानी ही साहित्‍य आणि कलेच्‍या माध्‍यमातून दिसते. या कलेचे अमृत साहित्‍यीकांनी आणि कलाकारांनी निर्माण करताना साहित्‍यातून नैतिकतेचा, समानतेचा आणि लोककल्‍याणाचा भाव निर्माण करण्‍याचा प्रयत्‍न करावा असे आवाहन त्‍यांनी शेवटी केले.

साहित्‍य संमेलनाचे अध्‍यक्ष भारत सासणे म्‍हणाले की, समाजाला भाषा किंवा अक्षरज्ञान अवगत झाले असले तरी, समाज एका निरक्षरतेकडे जात आहे का.? अशी भिती व्‍यक्‍त करतानाच कला कधी विभक्‍त होत नाही, तिचे कधी विभाजन करता येत नाही. कला आणि साहित्‍यामध्‍ये विस्‍तृत असे समाजजीवन समाविष्ठ असल्‍यामुळे राजकारणात आणि समाजकारणात तिची व्‍यापकता आपल्‍याला पाहायला मिळते. सद्य परिस्थितीत विचारांची गर्दी वाढली असली तरी, केवळ फॉलोअर्स असून चालणार नाही तर विचावंताची आवश्‍यकता असल्‍याचे त्‍यांनी आवर्जुन सांगितले.

जीवन गौरव पुरस्‍कार प्राप्‍त किशोर बेडकीहाळ सत्‍काराला उत्‍तर देताना म्‍हणाले की, या मिळालेल्‍या पुरस्‍कारापर्यंत पोहोचण्‍यासाठी अनेकांच्‍या हाताची मदत झाली. हा पुरस्‍कार त्‍यांनी दिवंगत पत्‍नी आणि डॉ. नरेंद्र दाभोळकर यांना समर्पित करीत असल्‍याचे सांगताच, पद्मश्रींच्‍या नावाने मिळणारा हा पुरस्‍कार मोठा आहे. कारण पद्मश्रींनी जो विचार दिला तो शोषणमुक्‍त समाज निर्मितीचा होता. समग्र समाज जीवनाच्‍या आर्थिक आणि सांस्‍कृतीक वातावरणातून समाज ताठमानेने उभा राहावा हा सहकार चळवळीचा विचार होता असे त्‍यांनी आपल्‍या मनोगतात सांगितले.

खा. डॉ. सुजय विखे पाटील यांनी स्‍वागत आणि प्रास्‍ताविकातून या साहित्‍य पुरस्‍कारांची ३२ वर्षांपासुनची सुरु असलेली परंपरा प्रवरा परिवाराने जोपासली आहे. साहित्‍यीक आणि कलाकारांचा या पुरस्‍काराने सन्‍मान करण्‍याची मिळणारी संधी हा आमचा गौरव असल्‍याचे ते म्‍हणाले. प्रवरा परिवाराच्‍या वतीने सर्व मान्‍यवरांचा सन्‍मान करण्‍यात आला. या कार्यक्रमास जिल्‍ह्यातून विविध संस्‍थाचे पदाधिकारी, साहित्‍यप्रेमी मोठ्या संख्‍येने उपस्थित होते.

Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !