◻ ना. राधाकृष्ण विखे पाटील यांचे मतदार संघात जंगी स्वागत
◻ पक्षाच्या राष्ट्रीय नेत्या पंकजा मुंढे नाराज नाही
◻ मंत्री असताना सुध्दा राज्याचे नेते संगमनेरातच फिरत होते
संगमनेर Live (शिर्डी) | राज्यात जनतेच्या मनातल सरकार आले असल्याने अपेक्षा पूर्ण करण्यासाठी सरकारचे प्रयत्न असतील असा विश्वास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केला.
मंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर मंत्री विखे यांचे प्रथमच मतदार संघात आगमन झाले. शिर्डी विमानतळावर त्यांचे कार्यकर्त्यांनी जोरदार स्वागत केले. माजी मंत्री आण्णासाहेब म्हस्के पाटील भाजपाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र गोंदकर, संघटन सरचिटणीस नितीन दिनकर यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
याप्रसंगी माध्यमांशी संवाद साधताना मंत्री विखे पाटील म्हणाले की, सत्तेवर आलेले सरकार हे जसे जनतेच्या मनातले आहे तसे ते विचारांचे असल्याकडे लक्ष वेधत जनतेच्या अपेक्षाही वाढल्या असल्याने त्या पूर्ण करण्याकरीता श्री. साईबाबांनी शक्ती द्यावी आशी प्रार्थना आपण केली असल्याचे विखे म्हणाले.
मंत्र्यांच्या खाते वाटपासंदर्भात पक्षाचे नेते निर्णय करतील. त्यामुळे विरोधी पक्षांकडून होणारी टिका निरर्थक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. पक्षाच्या राष्ट्रीय नेत्या पंकजा मुंढे कुठेही नाराज नसून या सरकारच्या वाटचालीत त्यांचे योगदान महत्त्वपूर्ण राहणार असल्याचे विखे म्हणाले.
माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या टिकेला महत्व देण्याची गरज वाटत नाही. मंत्री असताना सुध्दा राज्याचे नेते संगमनेरातच फिरत होते. आता सत्ता आणि मंत्रीपद गेल्यानंतर त्यांना गावांची आणि लोकांची आठवण झाल्याचा टोला त्यांनी लगावला.
मंत्री विखे यांचे स्वागत करण्यासाठी सर्वच गावांमध्ये रस्त्याच्या दुतर्फा नागरीक आणि समर्थकांनी गर्दी केली होती. महीलांनी राखी बांधत या आपल्या लाडक्या नेत्याचे औक्षण करून स्वागत केले. तिरंगा देवून अनेकांनी विखे यांना शुभेच्छा दिल्या.