◻ पशुपालकाचे अनोखे प्रेम ; पिंट्या बैलाला बळीराजाकडून निरोप
◻ शाळेला देणगीसह वृक्षारोपण करून आयुष्यभर केलेल्या कष्टाबद्दल वाहिली अनोखी श्रद्धांजली
संगमनेर Live | संगमनेर तालुक्यातील सावरगावतळ येथील पशुपालकाने आपल्या बैलाचा दशक्रियाविधी संपन्न केला. शिवाय त्याचे स्मृतिप्रीत्यर्थ शाळेला देणगीसह वृक्षारोपण करून आयुष्यभर केलेले कष्टाबद्दल अनोखी श्रद्धांजली वाहिली पशुपालकाच्या अनोख्या प्रेमाबद्दल सर्वानी नेहे यांचे कौतुक केले.
सावरगावतळ येथील प्रगतशील शेतकरी बाळासाहेब पांडुरंग नेहे यांच्याकडे ‘पिंट्या आणि सुरत्या’ नावाची बैलजोडी होती. ह्यातील पिंट्या या बैलाचे दहा दिवसापूर्वी अचानक दुःखद निधन झाले होते. सत्तावीस वर्ष या पिंट्या - सुरत्या नावाच्या बैलजोडीच्या सहाय्याने बाळासाहेब यांनी शेतीत प्रचंड काबाडकष्ट करत नंदनवन फुलविले. पिंट्या - सुरत्या बैलजोडीपासून बाळासाहेब यांचा गोठा गोकुळावाणी फुलला आहे. आर्थिक संपन्नता आल्याने त्यांचे जीवन सुखकारक झाले आहे. बाळासाहेबांचे आपल्या या पिंट्या- सुरत्या बैलजोडीवर मुलांप्रमाणे अतोनात प्रेम होते.
पिंट्या या बैलाचे दहा दिवसांपूर्वी निधन झाले. कुटुंबातील एक सदस्य गेल्याचे तीव्र दुःख या कुटुंबाला झाले. माणसाप्रमाणे दहा दिवसांचा दुखवटा पाळून त्याचे सर्व धार्मिक विधी पूर्ण करत बैलाचा दशक्रियाविधी करण्यात आला. याप्रसंगी हभप एरंडे महाराज यांची प्रवचन सेवा तर पुरोहित नंदू जाखडी यांनी सर्व धार्मिक विधी पार पाडले. सावरगावतळ गावच्या परंपरेप्रमाणे मृत पिंट्या बैलाच्या स्मृति चिरंतन जतन करण्यासाठी केशर आंबा रोपांचे रोपण करून जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांना आधुनिक शिक्षणासाठी संगणक कक्ष निर्मितीसाठी भरीव आर्थिक देणगीही देण्यात आली.
बाळासाहेब नेहे यांनी राबविलेल्या ह्या अनोख्या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे. सावरगावतळ हे गाव नेहमी विविध नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात अग्रेसर आहे. ज्या जनावरांमुळे आपली प्रगती झाली त्यांच्याप्रती अशी सहृदयी कृतज्ञता व्यक्त करणारे व्यक्ती समाजात असल्याचे यानिमित्ताने पुन्हा एकदा अधोरेखित झाले असल्याची भावना सावरगातळचे पोलीस पाटील गोरक्ष नेहे यानी व्यक्त केली आहे.