◻ आश्वी बुद्रुक व मांची गाव येथे विद्यार्थ्याकडून स्वच्छता
संगमनेर Live | भारतीय स्वातंत्र्याचे अमृतमहोत्सवी वर्ष संपूर्ण भारतभर साजरे केले जात असून या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त ‘सामाजिक बांधिलकी’ या उपक्रमांतर्गत संगमनेर तालुक्यातील मांचीहिल शैक्षणिक संकुलातील ज्ञानगंगा विद्यानिकेतन प्राथमिक विभागाच्या विद्यार्थ्यानी आश्वी बुद्रुक व मांची गावामध्ये स्वच्छता अभियान राबविले.
यावेळी अभियानाची सुरुवात संस्थेचे स्फूर्तिस्थान नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या प्रतिमेचे पूजन करुन करण्यात आली. याप्रसंगी आश्वी पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक सुभाष भोये यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना विद्यार्थ्याच्या कामाचे व संचलनाचे कौतुक केले. यावेळी एनसीसी विद्यार्थ्याकडून मानवंदना देण्यात आली.
यावेळी विद्यार्थ्यानी स्वच्छतेचे संदेश देणारे फलक बनवले होते. आश्वी बाजारतळ, विठ्ठल मंदीर परिसर, रस्ते, हनुमान मंदीर परिसर, स्टेट बॅक रस्ता इत्यादी भाग विद्यार्थ्यानी स्वच्छ केला. यावेळी ग्रामस्थांनी या विद्यार्थ्याना खाऊचे वाटप केले.
दरम्यान हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेच्या मुख्याध्यापिका योगिता दुकळे, एनसीसी विभाग प्रमुख सुभेदार भाऊसाहेब काळे, प्रा. प्रदीप जगताप, नितीन गीते, सुनिल अंगरखे, विलास गाडेकर, शशिकांत देशमुख, किशोर कार्ले, तुकाराम बोऱ्हाडे, शिवाजी साठे, हर्षबाला जगताप, अर्चना तांबे, अनिता गिरी, ताई पवार, शिल्पा खेत्रे, सविता सहाणे, रत्नमाला गायकर, साहेबराव सारबंदे आदिनी परिश्रम घेतले.