◻अखंड हरिनाम सप्ताहास आ.विखे पाटील यांची भेट
◻ह.भ.प महंत रामगिरी महाराज यांना राष्ट्रीय ध्वज देवून ‘हर घर तिरंगा’ अभियानाचा प्रारंभ
◻प्रत्येक भारतीयाने आपल्या घरावर तिरंगा फडकवण्याचे केले आवाहन
संगमनेर Live (शिर्डी) | अध्यात्मिक क्षेत्रात १७५ वर्षांची परंपरा असलेल्या सद्गुरु गंगागिरी महाराज अखंड हरिनाम सप्ताह आता विश्वामध्ये पोहोचला आहे. स्वातंत्र्यांच्या अमृत महोत्सवी वर्षात संपन्न होत असलेला हा सप्ताह अध्यात्माबरोबरच राष्ट्रभक्तीची जागृती करणारा ठरेल, ह.भ.प महंत रामगिरी महाराज यांना राष्ट्रीय ध्वज देवून आ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी ‘हर घर तिरंगा’ अभियानाचा प्रारंभ केला.
कोकमठाण येथे सुरु असलेल्या १७५ व्या सद्गुरु गंगागिरी महाराजांच्या अखंड हरिनाम सप्ताहास आ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी भेट दिली आणि ह.भ.प रामगिरीजी महाराज यांचे आशिर्वाद घेतले. प्रवरा परिवाराच्या वतीने त्यांनी रामगिरीजी महाराज यांचा सत्कारही केला.
तसेच पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी स्वातंत्र्यांच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने देशवासियांना प्रत्येक घरावर तिरंगा फडकविण्याचे आवाहन केले आहे. या पार्श्वभूमिवर आ. विखे पाटील यांनी रामगिरीजी महाराज यांच्या हातीही राष्ट्रध्वज देवून उत्तर नगर जिल्ह्यातील अभियानास प्रारंभ केला. याप्रसंगी सप्ताह कमिटीचे सदस्यांसह भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव संपन्न होत असतानाच १७५ वा. अखंड हरिनाम सप्ताह संपन्न होणे हा सुध्दा अमृत योग आहे अशी भावना व्यक्त करुन, आ. विखे पाटील म्हणाले की, या सप्ताहाची परंपरा मोठी आहे. हा सप्ताह आता विश्वमान्य झाला असल्याचा गौरवपूर्ण उल्लेख करुन, आ. विखे पाटील म्हणाले की, देव भक्ती आणि देशभक्तीतूनच देश आत्मनिर्भर बनेल.
यासाठीच स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करताना प्रत्येक भारतीयाने आपल्या घरावर तिरंगा फडकवावा यासाठी उत्तर नगर जिल्ह्यात अभियान सुरु करण्यात आले असून, त्याची सुरुवात या सप्ताहातून केली असल्याचे त्यांनी नमुद केले. ९ ऑगस्ट क्रांती दिनापासून ‘हर घर तिरंगा हर मन तिरंगा’ हा मंत्र सर्वांनीच स्वातंत्र्यांच्या अमृत महोत्सवाच्या कार्यक्रमामध्ये सहभाग घ्यावा असे आवाहनही आ. विखे पाटील यांनी या निमित्ताने केले आहे.
दरम्यान मंत्रिमंडळाचा विस्तार उद्या होण्याची शक्यता असल्याने आ. विखे पाटील यांना मुंबईहून अचानक फोन आला. त्यामुळे सकाळी शिर्डीला साईबाबांचे दर्शन व सप्ताह स्थळी रामगिरीजी महाराजांचे आशीर्वाद घेऊन आ. विखे पाटील मुंबईकडे रवाना झाले आहेत.