शासन नागरिकांच्या पाठीशी, सर्वोतोपरी मदत देण्यात येईल - ना. विखे पाटील

संगमनेर Live
0
◻️अतिवृष्टीने बाधितांचे तातडीने पुनर्वसन करण्याबरोबरच शिर्डी शहर झोपडपट्टीमुक्त करण्यासाठी शासनास प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना

◻️कोऱ्हाळे, नांदुर्खी व शिर्डी मधील अतिवृष्टीबाधित भागांची महसूलमंत्र्यांकडून पाहणी

संगमनेर Live (शिर्डी) | ‘‘अतिवृष्टी आणि ओढे व नाल्यांच्या प्रवाह वळविल्यामुळे तसेच अतिक्रमणांमुळे नागरिकांच्या घरात पाणी शिरल्याने नागरिकांमध्ये अस्वस्थता असून त्यांची गैरसोय झाली आहे. सर्व विभागांनी आपापसात समन्वय ठेऊन अतिवृष्टीने बाधित नागरिकांचे तातडीने पुनवर्संन करावे. शिर्डी झोपडपट्टीमुक्त करण्यासाठी झोपडपट्टी धारकांना पंतप्रधान आवास योजनेतून घरे उपलब्ध करून देण्यासाठी शासनाकडे प्रस्ताव सादर करा.’’ असे निर्देश महसूल, पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज येथे दिले.

राहाता तालुक्यातील मौजे कोऱ्हाळे, नांदुर्खी या गावातील तसेच शिर्डीतील नाला क्रमांक ३४ व ३५ तसेच शहरातील अतिवृष्टीबाधित परिसराची पाहणी केल्यानंतर शिर्डी नगरपरिषदेच्या सभागृहात महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक घेण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते. 

या बैठकीला अपर जिल्हाधिकारी सोनप्पा यमगर, शिर्डी उपविभागीय अधिकारी गोविंद शिंदे, श्री साईबाबा संस्थानचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राहूल जाधव, तहसीलदार कुंदन हिरे, गटविकास अधिकारी सनि सुर्यवंशी, जिल्हा जलसंधारण अधिकारी मनोज ढोकचौळे, शिर्डी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी काकासाहेब डोईफडे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता सागर शिंदे, श्रीनिवास वर्पे तसेच विविध विभागाचे अधिकारी व शिर्डी ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते. 

जमिनीची पाणी साठवण क्षमता संपली असून, सतत पडणारा पाऊस आणि मानवनिर्मित अडथळे दूर करुन कायमस्वरुपी तोडगा काढावा अशा सूचना यावेळी महसूलमंत्र्यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना दिल्या. 

ना. विखे पाटील म्हणाले, शिर्डीतील पाणी वाहून जाणाऱ्या नाल्यांवरील मूळ प्रवाहात अतिक्रमण झाल्यामुळे अतिवृष्टीच्या पाण्यामुळे शहारातील नागरिकांचे हाल झाले. हे संकट जसे नैसर्गिक आहे तसे मानवनिर्मीत चुकांमुळे सर्वत्र पुरपरिस्थिती उद्भवली. ही पुरस्थिती पुन्हा निर्माण होणार नाही. यासाठी शिर्डी नगरपरिषद, साईबाबा संस्थान व जिल्हा प्रशासनातील अधिकाऱ्यांनी तात्काळ उपाययोजना कराव्यात. 

पावसाळयापूर्वी काही विभागांनी आवश्यक ती कामे करणे गरजेचे होते मात्र ते न केल्यामुळे मंत्री विखे पाटील यांनी नाराजी व्यक्त केली. अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करावे आणि झोपडपट्टीमुक्त शिर्डी शहर करण्यासाठी प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातून नागरिकांचे पुनर्वसन करण्यासाठी प्रशासनाने तात्काळ योजना सादर करावी. 

यासाठी शेती महामंडळाकडील उपलब्ध जमीनीचा उपयोग करण्यात यावा अशी सूचना त्यांनी केली. अतिवृष्टीबाधित नागरिकांना श्री साईबाबा संस्थानने आरोग्यविषयक सुविधा उपलब्ध करुन देण्याची सूचना केली आणि नागरिकांना भविष्यात कोणत्याही समस्यांचा सामना करावा लागू नये यासाठी सर्व विभागांनी ताळमेळ ठेऊन सविस्तर प्लॅन तयार करावा असे निर्देश मंत्री ना. विखे पाटील यांनी यावेळी दिले.

बैठकीस उपस्थित स्थानिक पदाधिकारी, नागरिक तसेच माध्यम प्रतिनिधींशी अतिवृष्टी आणि नागरिकांना येणाऱ्या समस्या यावर मंत्री ना. विखे पाटील यांनी संवाद साधला आणि तातडीने उपाययोजना करावे असे सांगितले. शासन नागरिकांच्या पाठीशी उभे असून सर्वोतोपरी मदत देण्यात येईल असे त्यांनी सांगितले.

Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !