◻️ पेट्रोल भरण्यासाठी आलेल्या दुचाकीने घेतला पेट
◻️ कामगारानी दाखवलेल्या प्रसंगसावधानतेमुळे मोठा अनर्थ टळला
◻️ गुरुवार आठवडे बाजार व दिवाळीनिमित्त परिसरात होती मोठी गर्दी
संगमनेर Live | संगमनेर तालुक्यातील आश्वी खुर्द येथिल ईश्वर पेट्रोल पंपावर गुरुवारी दुपारी पेट्रोल भरण्यासाठी आलेल्या दुचाकीने अचानक पेट घेतल्यामुळे अग्नीचा भडका उडाला होता. यावेळी कर्मचाऱ्यानी दाखवलेल्या प्रसंगसावधानतेमुळे मोठा अनर्थ टळला आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, आश्वी खुर्द येथे आज गुरुवार (दि. २७ ऑक्टोबर) रोजी दुपारी १२.३० वाजेच्या सुमारास येथिल सोमनाथ जोरी हे पंपावर दुचाकीला पेट्रोल भरण्यासाठी गेले होते. यावेळी त्यानी पेट्रोल टाकून गाडी पुढे घेतली असता अचानक त्याच्या गाडीने पेट घेतला. गुरुवार आठवडे बाजार असल्याने पंपावर पेट्रोल भरण्यासाठी आलेल्या दुचाकी व चारचाकी वाहणाची मोठी गर्दी होती. तसेच शेजारी मोठी लोकवस्ती असल्याने याठिकाणी एकचं कल्लोळ उडाला होता.
त्यामुळे पंपावरील कर्मचारी चागंदेव लिबांजी दातीर व अनिल मते यानी प्रसंगसावधान दाखवत जीवाची पर्वा न करता या पेटलेल्या दुचाकीकडे धाव घेतली व आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत असताना त्याना सचिन बिडवे व दिपक दातीर यानी बहुमुल्य सहकार्य केल्यामुळे काही वेळात आग विझवण्यात त्याना यश आले आहे.
दरम्यान गुरुवार हा आश्वी खुर्द येथिल आठवडे बाजार व दिवाळी सणानिमित्त पेट्रोल पंपासह परिसरात मोठी गर्दी होती. यावेळी ही घटना घडली असून कर्मचाऱ्यानी क्षणाचाही विलंब न करता दाखवलेल्या प्रसंगसावधानतेमुळे मोठा अनर्थ टळला असल्याने उपस्थित नागरीकानी सुटकेचा निश्वास सोडला आहे. तर येथील कर्मचाऱ्यानी दाखवलेल्या कार्यतत्परतेचे उपस्थित नागरीकानी कौतुक करत पेट्रोल पंप मालकाने त्यानां बक्षिस द्यावे अशी मागणी केली आहे.