◻️ राहुरी येथे इंद्रधनुष्य - २०२२ या १८ व्या महाराष्ट्र राज्य आंतरविद्यापीठ युवक महोत्सवाचे उध्दघाटन
◻️ ध्येय साध्य करण्यासाठी तुम्ही करत असलेली मेहनतच तुम्हाला यशापर्यंत घेवून जाईल
संगमनेर Live (राहुरी) | कलेला कोणतेही वय नसते, ग्रामीण आणि शहरी असा भेदही नसतो फक्त आपल्यातील न्युनगंड बाजूला ठेवून प्रत्येकाने व्यक्त होण्याची संधी शोधली पाहीजे. असे प्रतिपादन महसूल मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले.
महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी येथे इंद्रधनुष्य - २०२२ हा १८ वा. महाराष्ट्र राज्य आंतरविद्यापीठ युवक महोत्सवाचे दि. ५ ते ९ नोव्हेंबर, २०२२ या कालावधीत आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटन ना. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते करण्यात आले, यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. पी.जी. पाटील कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.
यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. कारभारी काळे, चित्रपट अभिनेते भारत गणेशपुरे, कार्यकारी परिषद सदस्य डॉ. प्रदिप इंगोले, दत्तात्रय उगले, तुषार पवार, दत्तात्रय पानसरे, इंद्रधनुष्य २०२२ चे समन्वयक डॉ. प्रमोद पाब्रेकर, अधिष्ठाता डॉ. प्रमोद रसाळ, संशोधन संचालक डॉ. सुनील गोरंटीवार, विस्तार शिक्षण संचालक डॉ. तानाजी नरुटे, कुलसचिव प्रमोद लहाळे, नियंत्रक डॉ. बापूसाहेब भाकरे, विद्यापीठ अभियंता मिलिंद ढोके व राष्ट्रीय सेवा योजनेचे संचालक व विद्यार्थी कल्याण अधिकारी डॉ. महावीरसिंग चौहान उपस्थित होते.
आपल्या भाषणात मंत्री विखे पाटील म्हणाले की, महोत्सवाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना संधी मिळणार आहे. कारण महाविद्यालयातच व्यक्तिमत्व विकासाची जडणघडण होत असते. कृषि महाविद्यालयात जेव्हा आमची पिढी शिक्षण घेत होती त्यावेळी कोणत्याही साधनांची उपलब्धता नव्हती. संवाद हेच माध्यम खुप मोठे होते. आज मात्र सोशल मिडीयामुळे संवाद कमी झाला आणि फक्त सोशल मिडीयावरच व्यक्त होण्याचे प्रमाण वाढले आहे. परंतू आपल्या कलेला व्यासपीठावरुन कसे व्यक्त होता येईल याचा विचार केला पाहीजे असे त्यांनी सुचित केले.
आधी स्वत:वर प्रेम करायला शिका असा संदेश देवून ना. विखे पाटील म्हणाले की, शैक्षणिक वातावरणातही उर्जा आणि उत्साह निर्माण करुन, स्वत:चे करिअर घडविता येवू शकते. यासाठीच स्वत:चा शोध घेण्याची गरज आहे. आपल्याला साहित्य आणि कला संस्कृतीचा मोठा वारसा आहे. याकडे लक्ष वेधून त्यांनी सांगितले की, कलेला कोणतेही वय नसते, ग्रामीण शहरी असा भेद नसतो.आपल्यातील न्युनगंड कमी करुन आपल्यातील सुप्त अंतरंगाना पुढे घेवून जाण्याचा प्रयत्न केला पाहीजे असे आवाहन त्यांनी केले.
ना. राधाकृष्ण विखे पाटील यावेळी बोलतांना पुढे म्हणाले की, कृषि विद्यापीठांनी जगातील पहिल्या पन्नासमध्ये असणाऱ्या विद्यापीठांशी सामंजस्य करार करावेत. कृषि क्षेत्रातील सर्व महत्वाच्या स्टार्टअपमधून उर्जा देण्याचा प्रयत्न व्हायला हवा. यातील तंत्रज्ञान लोकांनी स्वीकारले पाहिजे. तुमचे, तुमच्या कुटुंबाचे व समाजाचे भविष्य तुमच्या खांद्यावर असून ते पुर्ण करण्यासाठी कठोर परिश्रम करा असे आवाहन त्यांनी यावेळी विद्यार्थ्याना केले.
कुलगुरु डॉ. पी. जी. पाटील आपल्या भाषणात म्हणाले की, या स्पर्धेत सहभागी विद्यार्थ्यांनी आपली पूर्ण ताकद लावून निश्चित केलेले ध्येय कठोर परिश्रम करुन साध्य करा. राहुरी कृषि विद्यापीठाने संपूर्ण देशामध्ये जास्त बियाणे तयार करण्याचा विक्रम केलेला आहे. त्याचबरोबर देशामधील पहिले ड्रोन पायलट प्रशिक्षण केंद्र स्थापन करण्यासाठी मान्यता मिळालेली आहे. देशी गाय संवर्धनाचा प्रकल्प पुणे येथे सुरू झालेला असून असून वेगवेगळ्या देशांबरोबर सामंजस्य करार करण्यात आलेले आहेत.
या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थित असलेले चित्रपट अभिनेते भारत गणेशपुरे आपल्या भाषणात विद्यार्थ्यांना उद्देशुन म्हणाले की, आपले ध्येय सुरुवातीलाच निश्चित करा व ते पुर्ण करण्यासाठी कठोर मेहनत करा. तुमच्या ध्येयावर लक्ष ठेवा, आनंदात जगा व आपल्या मस्तीत रहा. ध्येय साध्य करण्यासाठी तुम्ही करत असलेली मेहनतच तुम्हाला यशापर्यंत घेवून जाईल. जो स्वतःला ओळखतो तोच जगात यशस्वी होतो असा कानमंत्र त्यांनी यावेळी बोलतांना दिला.
या कार्यक्रमासाठी माजी आमदार चंद्रशेखर कदम, माजी विद्यापीठ कार्यकारी सदस्य अँड. तानाजी ढसाळ, नामदेव ढोकणे, अँड. सुभाष पाटील, कृषिभूषण सुरसिंग पवार, रावसाहेब तनपुरे तसेच राजभवनातील डॉ. गोविंद कतलाकुटे, डॉ. संतोष परचुरे, डॉ. वाणी लातुरकर, डॉ. विठ्ठलराव नाईक व डॉ. चितोडे तसेच सहयोगी अधिष्ठाता डॉ. उत्तम चव्हाण, डॉ. दिलीप पवार, डॉ. श्रीमंत रणपिसे, डॉ. मिलिंद अहिरे व डॉ. साताप्पा खरबडे हे अधिकारी उपस्थित होते.