◻️ पिकअप, ट्रॅक्टर आणि दुचाकीचा विचित्र अपघात
संगमनेर Live | कोल्हार घोटी राज्य मार्गावर मांची फाटा येथे शुक्रवारी दुपारच्या सुमारास पिकअप, ट्रॅक्टर आणि दुचाकीच्या विचित्र अपघातात वडगाव पान येथील दोन तरुणाचा मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना घडली आहे. या अपघातामुळे वडगावपानसह पंचक्रोशीत हळहळ व्यक्त केली जात आहे.
शुक्रवारी दुपारच्या सुमारास लोणी कडून संगमनेरच्या दिशेने येणारी पिकअप गाडी आणि मांची फाट्याकडे वळण घेत असलेला ट्रॅक्टर आणि कोल्हार घोटी राज्य मार्गाने जाणारी दुचाकी यांचा विचित्र अपघात झाला. या अपघातात वडगावपान येथील एकमेकांचे चुलत भाऊ असलेले आकाश विलास कुळधरण आणि ऋषिकेश विजय कुळधरण या दोघाचा मृत्यू झाला.
अपघाताची माहिती मिळाल्यावर संगमनेर तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अरुण आव्हाड आणि त्यांचे सहकारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले होते. अपघात झाल्यानंतर पिकअप चालक पोलिसांना अपघाताची माहिती न देता फरार होण्यात यशस्वी झाला.
त्यामुळे पोलीस निरीक्षक अरुण आव्हाड यांनी मांची फाट्यावरील हॉटेलचे सीसीटीव्ही फुटेज तपासून फरार झालेल्या पिकअपचा आणि तिच्या चालकाचा शोध घेण्याचा प्रयत्न करत आहेत. याप्रकरणी संगमनेर तालुका पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून अधिक तपास तालुका पोलीस करीत आहेत.
दरम्यान अपघातात ठार झालेले आकाश आणि ऋषिकेश हे दोन सख्खे चुलत भाऊ असल्याची प्राथमिक माहिती उपलब्ध झाली असून त्यांच्या अपघाती मृत्यूने वडगावपान आणि परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.