◻️ विकास म्हणजे काय रे भाऊ.? हे सांगायला मात्र कोणीही पुढे येईना
◻️ मतदाराने टाकलेली ती पोस्ट निवडणूक असलेल्या आश्वी व जोर्वे गटातील गावात झाली तुफान वायरल
संगमनेर Live | संगमनेर तालुक्यातील आश्वी व जोर्वे गटातील १२ ग्रामपंचायतीची पंचवार्षिक निवडणूक प्रक्रिया अतिम टप्यात असल्यामुळे प्रचाराचा धुराळा उडण्यास सुरवात झाली आहे.
प्रचारादरम्यान विकासाच्या आश्वासनाचा वारु चौफेर उधळत असताना विकास म्हणजे काय रे भाऊ.? हे सांगायला मात्र कोणताही उमेदवार अथवा कार्यकर्ता पुढे येत नसून केवळ समाजमाध्यमात फोटो व विडिओ टाकून हवा करताना दिसत आहे. त्यामुळे मतदारानीचं आता घुडघ्याला बाशिंग बांधलेल्या उमेदवाराना समाजमाध्यमावर प्रश्न विचारण्यास सुरवात केली आहे. त्यामुळे आता तरी, हे उमेदवार विकासाचं गमक मतदाराना समजून सांगितील का.? हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
शिर्डी विधानसभा मतदार संघातील आश्वी व जोर्वे गटातील अतिशय प्रतिष्ठेच्या अशा उंबरी बाळापूर, जोर्वे, ओझर खुर्द, रहिमपूर, निमगावजाळी, हंगेवाडी, कणकापूर, सादतपूर, अंभोरे, मालुंजे, पिपंरणे, निबांळे या ग्रामपंचायतीमध्ये निवडणूकीत एकमेकाविरुध्द दंड थोपटलेले दोन्ही गटाचे कार्यकर्ते पायाला भिगंरी लावुन प्रचार करत आहेत.
‘डोअर टू डोर’ भेटीगाठीवर दोन्हीकडील उमेदवार व कार्यकर्त्याचा जोर असला तरी मतदाराच्या कॉर्नर बैठका व प्रचार सभा यामध्ये नेमका आपण विकास काय करणार.? हेच सांगायला उमेदवार व कार्यकर्ते कमी पडत असल्याचे चित्र सर्वत्र दिसत आहे. त्यामुळे सुज्ञ मतदार आता या उमेदवाराची फिरकी घेताना दिसत असून समाज माध्यमात पोस्ट टाकून प्रश्न विचारताना दिसत आहे.
ती पोस्ट खालीलप्रमाणे..
“गावातील ग्रामपंचायत निवडणुकीसाठी उभे असलेले सर्वच उमेदवारांना नम्र विनंती आहे की आपण निवडून आल्यास पाच वर्षात काय काय गावाच्या समस्या दूर कराल.? कोणत्या विकास योजना पूर्ण करणार हे सर्व आम्हा मतदारांना व जनतेला सांगावे. ही आपणांस नम्र विनंती ”
“हे यामुळे लिहीत आहे की असे नको व्हायला की निवडून आल्यावर आपण म्हणायचे की जनतेने आम्हाला हे विचारलेचं नव्हते.?
त्यामुळे आधीच विचारत आहे! आपणाला निवडून दिल्यास आपण गावसाठी काय कामे कराल.? आपण रेकॉर्डिंग करून पाठवा, व्हिडिओ बनऊन पाठवा, लिहून पाठवा किंवा मग गावात बॅनर लाऊन सांगा. आपल्या जाहीरनाम्याची आम्ही सर्व वाट बघत आहोत. ”
दरम्यान वरील पोस्ट समाज माध्यमावर तुफान वायरल होत असल्याने आतातरी प्रचारादरम्यान गावच्या विकासाचा वारु चौफेर उधळणारे उमेदवार व कार्यकर्ते स्पष्ट शब्दात आपण गावात नेमक्या कोणत्या विकासा योजना राबणार आहोत अथवा नेमका काय विकास करणार आहोत.? हे मतदाराना सांगतील का.? हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.