◻️ राज्यातील ६३ हजार ३३८ कर्मचाऱ्यांना होणार फायदा
◻️ राज्यभरातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी संघटनांनी केले आमदार डॉ. तांबे यांचे अभिनंदन
संगमनेर Live | नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी राज्यातील विनाअनुदानित शाळा, वाढीव तुकड्या यांसह शिक्षण विभागातील विविध प्रश्नांसाठी केलेल्या पाठपुराव्यामुळे महाराष्ट्र सरकारने अकराशे कोटींचा निधी देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.
विविध शिक्षक संघटनांबरोबर आमदार डॉ. तांबे यांनी मुंबईतील आझाद मैदानावर शिक्षण क्षेत्रातील विविध मागण्यांसाठी आंदोलन केले होते. यावर राज्य सरकारने अकराशे कोटी रुपये अनुदान देण्याची घोषणा केली होती. नुकतेच मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्यातील शाळांना अनुदान देण्याच्या व त्यासाठी एक हजार अकराशे कोटी रुपये उपलब्ध करून देण्यासाठी मान्यता दिली आहे.
या निर्णयामुळे ६ हजार १० प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांना तसेच १४८३२ तुकड्यांना अनुदान मिळेल. या निर्णयाचा लाभ राज्यातील सुमारे ६३ हजार ३३८ शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना होणार आहे.
त्रुटींच्या पूर्ततेनंतर २० टक्के अनुदानासाठी ३६७ शाळा पात्र असून ४० टक्के अनुदानासाठी २८४ शाळा पात्र आहेत. २० टक्के अनुदान घेत असलेल्या २२८ शाळांना ४० टक्के अनुदान देण्यात येईल. तर ४० टक्के अनुदान घेत असलेल्या २००९ शाळांना ६० टक्के अनुदान देण्यात येणार आहे. मूल्यांकनास पात्र परंतु राज्य सरकारच्या स्तरावर अद्याप घोषित न केलेल्या ३१२२ शाळांना २० टक्के अनुदान मिळणार आहे.
याचबरोबर राज्यातील आदिवासी शासकीय आश्रम शाळेतील १५८५ रोजंदारी आणि तासिका कर्मचाऱ्यांना नियमित करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णयही घेण्यात आल्या असून याबाबतही आमदार डॉ. तांबे यांनी सातत्याने सरकारकडे पाठपुरावा केला होता.
तसेच जुनी पेन्शन योजना लागू व्हावी यासाठीही आमदार डॉ. तांबे सातत्याने सरकारकडे प्रयत्न करत असून शिक्षण क्षेत्रातील विविध प्रश्नसह कला व क्रीडा शिक्षक मागणी, नवीन शिक्षक भरतीयासाठी ही त्यांचा पाठपुरावा सुरू आहे.
या नव्या निर्णयाने राज्यातील ६३ हजार ३६८ शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी लाभ होणार असून याबद्दल अहमदनगर, नाशिक, धुळे, जळगाव, नंदुरबार यांसह राज्यभरातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी संघटनांनी आमदार डॉ. तांबे यांचे अभिनंदन केले आहे.