◻️ ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याचे आवाहन
◻️ दुधाळ गाई- म्हशींचे गट, शेळी - मेंढी गट व कुक्कुट पालणासाठी मिळणार अर्थसहाय्य
संगमनेर Live (अहमदनगर) | पशुसंवर्धन विभागामार्फत नाविन्यपूर्ण राज्यस्तरीय व जिल्हास्तरीय विविध योजनांसाठी ऑनलाईन पध्दतीने लाभार्थी निवड प्रक्रिया सन २०२२-२३ या वर्षात राबविली जाणार आहे. पशुपालक, शेतकरी, सुशिक्षीत बेरोजगार युवक, युवती व महिलांनी या योजनांचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन पध्दतीने ११ जानेवारी, २०२३ पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. सुनील तुंबारे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.
दुधाळ गाई- म्हशींचे गट वाटप करणे, शेळी - मेंढी गट वाटप करणे, १००० मांसल कुक्कुट पक्षांच्या संगोपनासाठी निवारा शेड उभारणीस अर्थसहाय्य देणे, १०० कुक्कुट पिलांचे वाटप व २५ + ३ तलंगा गट वाटप या योजनांसाठी ऑनलाईन पध्दतीने लाभार्थी निवड प्रक्रिया सन २०२२-२३ या वर्षात राबविली जाणार आहे.
पशुपालकांना डेअरी, पोल्ट्री किंवा शेळीपालन यापैकी ज्या बाबीमध्ये अर्ज करावयाचा आहे त्याची निवड करण्याची सुविधा देखील उपलब्ध करून देण्यात आली आहे. ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी https://ah.mahabms.com हे संकेतस्थळ असून AH.MAHABMS या अँड्रॉईड मोबाईल अँप्लिकेशनद्वारेही अर्ज सादर करता येणार आहे.
योजनांची संपूर्ण माहिती तसेच अर्ज करण्याची पध्दती याबाबतचा संपूर्ण तपशील संकेतस्थळावर तसेच मोबाईल अँपवर उपलब्ध आहे. अर्ज फक्त ऑनलाईन पध्दतीनेच स्विकारले जातील. या संगणकप्रणालीमध्ये अर्ज भरणे अत्यंत सुलभ करण्यात आले असून अर्जामधील माहिती कमीत कमी टाईप करावी लागेल आणि बहुतांशी माहितीबाबत पर्याय निवडण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
त्यामुळे पशुपालकांनी अर्ज भरण्याकरिता स्वतःचे मोबाईलचा जास्तीत जास्त वापर करावा. अर्ज भरताना अर्जदाराने नोंदविलेल्या मोबाईल क्रमांकावर अर्जाच्या स्थितीबाबत संदेश पाठविण्यात येणार असल्याने कोणत्याही परिस्थितीत अर्जदाराने योजनेंतर्गत आपला मोबाईल क्रमांक बदलू नये व मागिल वर्षी अर्ज केलेल्या अर्जदारांनी पुन्हा अर्ज करावयाची आवश्यकता नाही.
योजनेबाबत अधिक माहितीसाठी १९६२ किंवा १८००-२३३-०४१८ टोल फ्री क्रमांकावर किंवा तालुक्याचे पशुधन विकास अधिकारी (विस्तार), पंचायत समिती, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी अथवा उपआयुक्त कार्यालय, तालुका लघुपशुवैद्यकीय सर्वचिकित्सालय अथवा नजीकच्या पशुवैद्यकीय केंद्रावर संपर्क साधावा, असेही आवाहन प्रसिद्धी पत्रकाद्वारे करण्यात आले आहे.