समृध्दी महामार्गावर नागपूर ते शिर्डी दरम्यान धावली‌ पहिली एसटी बस

संगमनेर Live
0
◻️ वीस जणांनी केला प्रवास ; सात तासात ५४० किलोमीटर अंतर कापले

◻️ जलद व आरामदायी प्रवास झाल्याची प्रवाशांची भावना

संगमनेर Live (शिर्डी) | हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गावर आज नागपूर ते शिर्डी दरम्यान महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची पहिली बस धावली. जलद व आरामदायी प्रवाशाचा २० व्यक्‍तिंनी आनंद घेतला. नागपूरच्या गणेशपेठ आगारातून १५ डिसेंबर रोजी रात्री ९ वाजता निघालेली बस (एमएच ०९, एफएल ०२४८) शिर्डी बस स्थानकावर १६ डिसेंबर रोजी पहाटे ५ वाजता पोहचली. ताशी ८० किलोमीटरच्या वेगाने निघालेल्या बसला गणेशपेठ आगार (नागपूर) ते शिर्डी दरम्यानचे ५४० किलोमीटर अंतर कापण्यास सात तास लागले. आज हीच बस रात्री  ९ वाजता शिर्डीहून नागपूरकडे प्रस्थान करणार आहे‌ .

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ११ डिसेंबर रोजी समृध्दी महामार्गावरील नागपूर ते शिर्डी दरम्यान पहिल्या टप्प्यातील वाहतूक व दळणवळण सेवेचे लोकार्पण केले. त्यानंतर आज राज्य परिवहन महामंडळाची पहिली बस गणेशपेठ आगार (नागपूर) ते शिर्डी दरम्यान धावली. ४५ आसन क्षमतेच्या निम आरामदायी बसमध्ये ३० आसने (पुशबॅक पध्दतीची) बसण्यासाठी व १५ शयन आसने (Sleeper) उपलब्ध होती. या बसमधून २० व्यक्तिंनी प्रवास केला. त्यापैकी १३ आरक्षित प्रवासी, ७ ज्येष्ठ नागरिक (७५ वर्षाच्या पूढील) व १ अनारक्षित प्रवासी होते‌. बससेवेसाठी प्रौढ व्यक्ती १३०० रूपये इतके प्रवासभाडे आकारण्यात आले. तसेच ७५ वर्षावरील ज्येष्ठांना मोफत प्रवास सवलत देण्यात आली. या बससाठी शैलेश खोब्रागडे व भारत भदाडे असे दोन चालक होते. अशी माहिती या बसचे वाहक मनोज तुपपट यांनी दिली.

‘‘लालपरीमधून शिर्डीपर्यंतचा प्रवास अत्यंत आरामदायी व जलद झाला. सात ते आड तासाच्या प्रवाशात थकवा जाणवला नाही. अत्यंत कमी वेळेत प्रवास झाला.श्री.साईबाबांचे दर्शनासाठीचा प्रवास आता एसटीमुळे सुखावणारा झाला आहे. समृध्दीच्या रूपाने आता शहरे जवळ आली असून राज्य निश्चितच प्रगतीपथावर जाईल.’’ अशी भावना या बसमधील प्रवासी रामकृष्ण श्रावणखळ यांनी व्यक्त केली.

‘‘समृध्दी महामार्गावर ताशी ८० ते ९० किलोमीटर वेगाने बस चालविण्याचा अनुभव आनंददायी होता. साडेसहा ते सात तासात नागपूरहून शिर्डीत बस पोहचली. प्रवासांत कोठेही वाहतूक अडथळे नव्हते. त्यामुळे जलद वेगात अपघातमुक्त असा समृध्दीवरील प्रवास आहे.’’ असे मत या बसचे चालक भारत भदाडे यांनी व्यक्त केले.

आज, १६ डिसेंबर रोजी शिर्डीहून रात्री ९ वाजता नागपूरच्या दिशेने या बसचा प्रवास होणार आहे. या बसमध्ये प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा शिर्डी बसस्थानकाच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन प्रवासासाठी शुभेच्छा देण्यात येतील. आजपासून आता दररोज रात्री नऊ वाजता शिर्डीतून नागपूरसाठी नियमित बस सोडली जाणार आहे. अशी माहिती शिर्डी बस स्थानकाचे वाहतूक नियंत्रक रामचंद्र शिरोळे यांनी दिली.

Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !