संगमनेर तालुक्यात ग्रामपंचायत निवडणूकीसाठी ८० टक्के मतदान

संगमनेर Live
0
◻️ शिर्डी विधानसभा मतदार संघातील १० व इतर ४ अशा १४ गावानमध्ये आजी - माजी महसूलमंत्र्याची प्रतिष्ठा पणाला

◻️ सादतपूर वगळता १४ पैकी १३ ग्रामपंचायतीमध्ये येणार महिलाराज

◻️ उंबरी बाळापूर, निमगावजाळी, ओझर खुर्द व मालुंजे येथे धक्कादायक निकालाची शक्यता

◻️ ९८ हजार मतदारापैकी ७८ हजार ९१८ मतदारानी बजावला मतदानाचा हक्क

◻️ आश्वी व जोर्वे गटातील गावनिहाय मतदानाची सविस्तर आकडेवारी..

संगमनेर Live | तालुक्यातील ३७ ग्रामपंचायतीसाठी निवडणूक प्रक्रिया रविवारी (१८ डिसेंबर) शांततेत पार पडली असून ९८ हजार ०३ मतदारापैकी ७८ हजार ९१८ मतदारानी आपल्या मतदानाचा हक्क बजावल्यामुळे तालुक्यात सरासरी ८० टक्के मतदान झाल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे. 

यामध्ये प्रामुख्याने शिर्डी विधानसभा मतदार संघातील व संगमनेर तालुक्यातील १० ग्रामपंचायतीसह इतर ४ गावानमध्ये महसूलमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील व माजी महसूलमंत्री आ. बाळासाहेब थोरात यांच्या गटाच्या कार्यकर्त्यानमध्ये थेट चुरशीची लढत झाल्यामुळे मंगळवारी (२० डिसेंबर) होणाऱ्या मतमोजणीकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. दरम्यान सादतपूर वगळता १४ पैकी १३ ग्रामपंचायती मध्ये सरपंच पदी महिला विराजमान होणार असल्याचे स्पष्ट आहे. 

तालुक्यातील व शिर्डी विधानसभा मतदारसंघातील १० गावांमध्ये महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील व माजी महसूल मंत्री आ. बाळासाहेब थोरात यांनी निवडणूकीदरम्यान विशेष लक्ष केंद्रीत केले होते. यामध्ये अंभोरे, मालुंजे, पिंपरणे या ग्रामपंचायतीत ना. विखे गटाकडून मजबूत असे पॅनल उभे करुन आ. थोरात गटाला कडवे आव्हान उभे केले होते.

निबांळे येथे सरपंच पदासाठी चौरंगी लढत पहावयास मिळाली असून जोर्वे, हंगेवाडी, कनकापूर, रहीमपूर, उंबरी बाळापूर, निमगावजाळी, ओझर खुर्द, कोल्हेवाडी या गावांमध्ये ना. विखे व आ. थोरात यांच्यासमर्थक गटात थेट लढत झाली. तसेच सादतपूर ग्रामपंचायत निवडणूकीमध्ये ना. विखे यांच्याचं दोन गटात सत्तास्थापनेसाठी लढत झाली असली तरी, सरपंच पदासाठी तिरंगी लढत याठिकाणी होणार आहे. खराडी व वाघापूर ग्रामपंचायत निवडणूकीत आ. थोरात यांच्या विरोधी गटाच्या सरपंच पदाच्या उमेदवाराला ना. विखे पाटील गटाने पाठीबां दिल्याची माहिती मिळाली आहे.

ग्रामपंचायत उंबरी बाळापूर येथे ना. विखे पाटील व आ. थोरात समर्थ गटात थेट लढत झाली असली तरी माजी पंचायत समिती सदस्य सरुनाथ उंबरकर व रिपाईचे तालुकाध्यक्ष आशिष शेळके यांनी तिसरा पॅनल उभा करुन दिलेल्या निकराचे लढतीमुळे येथे कोणाचे पानिपत होणार हे मंगळवारी होणाऱ्या मतमोजणीनतंरचं स्पष्ट होणार आहे.

मागील पंचवार्षिक निवडणूक निकालानतंर कोल्हेवाडी, निबांळे, हंगेवाडी, कनकापूर, रहीमपूर, ओझर खुर्द, जोर्वे ही गावे आ. थोरात समर्थक गटाच्या ताब्यात असल्याने या ग्रामपंचायतीमध्ये ना. विखे पाटील समर्थक गटाने कडवे आव्हान उभे केले होते. तर मालुंजे, निमगावजाळी, उंबरी बाळापूर येथ ना. विखे पाटील समर्थक गटांची सत्ता असली तरी कुरघोडीचे राजकारण व नव्या - जुन्या कार्यकर्त्यामधील समन्वयाचा अभाव यामुळे या ठिकाणी धक्कादायक निकाल लागल्यास आश्चर्य वाटणार नाही.

दरम्यान राज्यातील सत्तांतरानंतर राजकिय गणिते पुर्णपणे बदलेली असून या निवडणुकीत ‘लोकनियुक्त सरपंच’ पदाची निवडप्रक्रिया कोणाच्या पथ्यावर पडेल हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. त्यामुळे ग्रामपंचायत निवडणूकीत मंगळवारी धक्कादायक निकाल हाती येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. 

मतदान झालेल्या ग्रामपंचायतच्या निवडणुका या येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकांबरोबरच विधानसभा, लोकसभा निवडणुकांची रंगीत तालीम असल्याने या निवडणुकाच्या निकालाकडे पालकमंत्री तथा राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील व त्याचे पारपारीक विरोधक असलेले काँग्रेसचे वरिष्ठ नेते तथा राज्याचे माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांच्या समर्थक कार्यकर्त्याचे लक्ष लागल्यामुळे या निवडणुकीत बाजी कोण मारणार हे मंगळवारी होणाऱ्या मतमोजणीनतंर स्पष्ट होणार असल्याने जिल्ह्याला या निकालाची उत्कंठा लागल्याचे चित्र आहे. 

तसेच तळेगाव व निमोण सह संगमनेर तालुक्यातील ६ गावानमध्ये ना. विखे पाटील प्रणीत भारतीय जनता पक्षाचे उमेदवार उभे असल्यामुळे या ठिकाणी कोणता उलटफेर होणार की चित्र जैसे -थे राहणार याबाबत मोठ्या तर्क वितर्काना उधान आले असले तरी यांचे ही उत्तर मंगळवारीचं मतमोजणी नतंरचं मतदाराना मिळणार आहे.

आश्वी व जोर्वे गटातील गावनिहाय मतदानाची आकडेवारी..

निमगावजाळी :- एकून मतदान - ४६४५, झालेले मतदान - ३८२२ (८२.२८ टक्के), सादतपूर :- एकून मतदान - १०८०, झालेले मतदान - ९५८ (८८.७० टक्के), उंबरी बाळापूर :- एकून मतदान - ३१४४ , झालेले मतदान - २५५९ (८१.३९ टक्के), रहिमपूर :- एकून मतदान - २१३०, झालेले मतदान - १८३४ (८६.१० टक्के), ओझर खुर्द :- एकून मतदान - १४३३, झालेले मतदान - १३२४ (९२.३९ टक्के), कोल्हेवाडी :- एकून मतदान - ४३३४, झालेले मतदान - ३६८९ (८५.१२ टक्के), जोर्वे :- एकून मतदान - ४४१९, झालेले मतदान - ३७८० (८५.५४ टक्के), निबांळे :- एकून मतदान - १०३५, झालेले मतदान - ८९८ (८६.७६ टक्के), कनकापूर :- एकून मतदान - ६९८, झालेले मतदान - ५७६ (८२.५२ टक्के), हंगेवाडी :- एकून मतदान - ११७३, झालेले मतदान - १०७२ (९१.३९ टक्के), मालुंजे :- एकून मतदान - २११६, झालेले मतदान - १८५५ (८७.६७ टक्के), अंभोरे :- एकून मतदान - ३३१०, झालेले मतदान - २७८४ (८४.११ टक्के), वाघापूर :- एकून मतदान - ११५४, झालेले मतदान - १०२६ (८८.९१ टक्के), खराडी :- एकून मतदान - १४००, झालेले मतदान - १२४८ (८९.१४ टक्के) व पिपंरणे :- एकून मतदान - २४१३, झालेले मतदान - १९२७ (७९.८६ टक्के) प्रमाणे झाल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.
Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !