नवी मुंबई येथे महसूल भवन उभारण्यात येणार - महसूल मंत्री विखे पाटील

संगमनेर Live
0
◻️ कोकण विभागीय महसूल क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धाचे ९ ते ११ डिसेंबर दरम्यान आयोजन

संगमनेर Live (मुबंई) | महसूल हा प्रशासनाचा कणा असून महसूल विभाग अधिक सक्षम करण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे. येणाऱ्या काळात नवी मुंबई येथे महसूल भवन उभारण्यात येणार असून यासंदर्भातील बैठक पुढील आठवड्यात नवी मुंबईत घेण्यात येईल असे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले.
 
कोकण विभागीय महसूल क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धांचे आयोजन ९ ते ११ डिसेंबर दरम्यान चेंबूर येथील राष्ट्रीय केमिकल फर्टीलायझर मैदान येथे आयोजित करण्यात आल्या आहेत. या स्पर्धांचे उद्घाटन आज सकाळी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी कोकण विभागीय आयुक्त डॉ. महेंद्र कल्याणकर, कोकण विभागाचे अपर आयुक्त किशन जावळे, मुंबई उपनगर जिल्हाधिकारी निधी चौधरी, मुंबई जिल्हाधिकारी राजीव निवतकर, ठाणे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, पालघर जिल्हाधिकारी गोविंद बोडके, राष्ट्रीय केमिकल फर्टीलायझरचे एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर अनिल माथूर, बार्कचे मुख्य वास्तुविशारद नागराज, पोलिस उपायुक्त अजय बन्सल यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.
 
महसूल मंत्री म्हणाले की, महसूल विभाग गतिमान करताना आपल्या अधिकारी आणि कर्मचारी यांना चांगल्या सोयी सुविधा उपलब्ध करून देण्याला प्राधान्य असणार आहे. येणाऱ्या काळात याबाबत काय चांगले करता येईल याचा अभ्यास करुन याबाबतची अंमलबजावणी करण्यात येईल. कोविड काळात महसूल विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी यांनी आरोग्य यंत्रणेसह रात्रं दिवस काम करून सामान्य जनतेला दिलासा देण्याचे मोठे काम केले.
 
गेल्या दोन वर्षांपासून कोविड असल्याने महसूल क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धा आयोजित करण्यात आल्या नव्हत्या. दोन वर्षांनी आता क्रीडा आणि सांस्कृतिक स्पर्धा आयोजन केल्याने अधिकारी कर्मचाऱ्यांना निवांत क्षण अनुभवण्याची संधी मिळण्याबरोबरच आपले कला गुण दाखवण्याची संधी मिळाली. दैनंदिन आयुष्यात आपण कामाच्या ताणामुळे स्वतःची ओळख आापण हरवून बसतो पण स्पर्धांमुळे पुन्हा नव्याने चांगले काम करण्याची ऊर्जा मिळेल असेही महसूलमंत्री यांनी यावेळी सांगितले.
 
विभागीय आयुक्त डॉ. कल्याणकर यांनी तीन दिवस आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेमध्ये कोकण विभागातून जवळपास १६०० अधिकारी आणि कर्मचारी सामील झाले असल्याचे सांगितले.मुंबई उपनगर जिल्हाधिकारी यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना खेळ संस्कृती रुजावी यासाठी दरवर्षी अशा स्पर्धा आयोजित करण्यात येत असल्याचे आपल्या भाषणात नमूद केले.
 
आज सकाळी महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी क्रीडा ज्योत पेटवून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली आणि क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवात भाग घेणाऱ्यांना निरोगी खेळ खेळण्यासाठीची शपथ देण्यात आली. कोकण विभागाच्या रत्नागिरी, मुंबई शहर, पालघर, रायगड, सिंधुदुर्ग, ठाणे आणि पालघर अशा सात जिल्हयांनी संचलन केले. क्रीडा संचलनात पालघर जिल्हयाला तृतीय, रायगड जिल्हयाला द्वितीय आणि मुंबई उपनगर जिल्हयाला प्रथम पुरस्कार मिळाला. सांस्कृतिक फाऊंडेशन मार्फत यावेळी मुंबई या संकल्पनेवर आधारीत सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आला.
Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !