◻️ निझर्णेश्वर फाट्यावर झालेल्या दुचाकीच्या अपघातात एक ठार तर दुसरा गंभीर जखमी
◻️ महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील अपघातग्रस्ताच्या मदतीसाठी आले धावून
संगमनेर Live | कोल्हार - घोटी राज्य मार्गावर शुक्रवारी दोन सख्या चुलत भावाचा अपघातत दुर्देवी मृत्यू झाला होता. तर दुसऱ्या दिवशी म्हणजे आज शनिवारी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास कोकणगाव लगत निझर्णेश्वर फाट्यावर झालेल्या दुचाकीच्या अपघातात एक जण ठार तर दुसरी व्यक्ति गंभिर जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे. दरम्यान यावेळी राज्याचे महसूल मंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे याठिकाणाहून जात असल्यामुळे अपघातग्रस्त जखमींच्या मदतीसाठी धावून आले होते.
कोल्हार - घोटी राज्यमार्गावर अपघाताची मालिका सुरूच असून शुक्रवारी दुपारी मांची फाट्यावर ट्रॅक्टर, पिकअप आणि दुचाकीच्या धडकेत तालुक्यातील वडगावपान येथील दोन सख्खे चुलत भाऊ ठार झाल्याची घटना ताजी असतानाच २४ तासात या रस्त्यावर तिसरा बळी गेला आहे.
श्रीरामपूर तालुक्यातील नाऊर येथील ८० वर्षीय तात्याबा गणपत त्रिभवन हे कोकणगाव जवळील शिवापूर येथील आपल्या मुलीकडे राहत होते. ते काल सायंकाळी निझर्णेश्वर फाटा येथे रस्ता ओलांडत होते. यावेळी लोणीकडून संगमनेरकडे जाणाऱ्या दुचाकीची व वृद्ध इसमाची धडक झाली. त्यामध्ये ८० वर्षीय वृध्दाचा मृत्यू झाला तर दुचाकीस्वार प्रशांत केकणे (वय -२३, रा. निफाड) हा गंभीररित्या जखमी झाला असून त्याच्यांवर संगमनेर येथिल खाजगी रुग्णालयात उपचार सुरु असल्याची प्राथमिक माहिती घटनास्थळी उपस्थित असणाऱ्या स्थानिक नागरिकांनी दिली.
अपघात झाल्याच्यानंतर काही मिनिटात राज्याचे महसूल मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे आपल्या ताफ्यासह लोणीकडून संगमनेरच्या दिशेने येत होते. त्यांनी हा अपघात पाहिल्यावर आपल्या गाडीतून खाली उतरत अपघातातील जखमीची विचारपूस करत योग्य त्या सुचना दिल्या.
घटनेची माहिती मिळताच तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अरुण आव्हाड यांनी त्यांच्या सहकाऱ्यांना तात्काळ घटनास्थळी पाठवून मदत कार्य करण्यास सुचित केले.
दरम्यान कोल्हार-घोटी राज्य मार्गावर संगमनेर ते लोणी दरम्यान अपघाताची मालिका सुरूच असून शुक्रवारी दुपारी ट्रॅक्टर, दुचाकी आणि पिकअपच्या विचित्र अपघातात वडगावपान येथील कुळधरण बंधूंना आपला जीव गमवावा लागला होता. त्यानंतर २४ तासातच मांची फाट्याच्या पश्चिमेला असणाऱ्या तीन ते चार किलोमीटर अंतरावर असणाऱ्या निझर्णे फाटा येथे सायंकाळी सात वाजेच्या सुमारास एका वृद्धाला आपला जीव गमवावा लागला. त्यामुळे कोल्हार-घोटी राज्यमार्ग मृत्यू मार्ग बनला की काय.? अशी शंका आता उपस्थित होऊ लागली आहे.