◻️ मांचीहिल संकुलात ‘महानायक सुभाष बाबू ते महासम्राट छत्रपती शिवाजी महाराज’ याच्यांवर व्याख्यान
संगमनेर Live | भारतात अनेक महान आणि थोर महापुरुषांनी जन्म घेतला. परंतु त्याचा इतिहास व त्यांच्या कार्याची माहिती आजच्या युवा पिढीपर्यत पोहोचवणे गरजेचे आहे. ती माहिती पोहोचवण्याची जबाबदारी शिक्षकांवर असल्याचे आवाहन साहित्यिक व माजी सनदी आधिकारी विश्वास पाटील यानी केले असून स्वातंत्र्य संग्रामात नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे अनन्य साधारण असतानाही इतिहास तज्ञांनी त्याच्या योगदानाकडे दुर्लक्ष केल्याची खंतही पाटील यानी यावेळी व्यक्त केली.
संगमनेर तालुक्यातील मांचीहिल शैक्षणिक संकुलातील प्रागणांत ‘लेखक आपल्या भेटीला’ या प्रयोगशील उपक्रमांतर्गत आयोजित महानायक ‘सुभाष बाबू ते महासम्राट छत्रपती शिवाजी महाराज' या विषयावर व्याख्यानाप्रसंगी मार्गदर्शन करताना प्रसिद्ध कादंबरीकार, साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त विश्वास पाटील बोलत होते. यावेळी मांचीहिल संकुलाचे संस्थापक अँड. शाळीग्राम होडगर, सचिव नीलिमा गुणे, साहित्यिक डॉ. संतोष खेडलेकर, अँड. कोल्हे, प्राचार्य पिसे, मुख्याध्यापिका योगिता दुकळे आदिसह शिक्षण संकुलातील विविध विभागाचे पदाधिकारी, प्राचार्य, शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.
यावेळी पुढे बोलताना विश्वास पाटील यांनी थोर स्वातंत्र्य सेनानी सुभाषचंद्र बोस यांचा जीवनपट अत्यंत विस्तृत आणि आपल्या उगवत्या शैलीमध्ये श्रोत्यांसमोर मांडला. स्वातंत्र्य संग्रामातील सुभाष बाबूंचे योगदान हे अनन्य साधारण असून त्याच्यां योगदानाकडे इतिहास तज्ञांनी आणि अभ्यासकांनी दुर्लक्ष केल्याची खंतही त्यांनी यावेळी बोलून दाखवली. माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू, राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या वैचारिक आणि राजकीय संबंधावर विश्वास पाटील यानी प्रकाश टाकला.
यावेळी विश्वास पाटील यांनी आपल्या ‘संभाजी' या कादंबरीवर बोलताना शहाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराज, माता जिजाऊ यांच्या जीवनकार्याचा आढावा आपल्या भाषणात घेतला. ‘पानिपत' या कादंबरीची निर्मिती आणि त्या पाठीमागची भूमिका देखील यावेळी त्यानी विशद करताना कादंबरीतील प्रसंग श्रोत्यांसमोर उभे केले.
दरम्यान या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. गीते यांनी तर प्रास्ताविक प्रा. प्रदीप जगताप यांनी केले. तसेच कार्यक्रमाचे आभार श्रीमती सांबरे यांनी मानले असून यावेळी व्याख्यान ऐकण्यासाठी मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.