◻️ लोकनेते पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील यांच्या सहाव्या पुण्यतिथीनिमित्त प्रवरा परिवाराच्या वतीने आदरांजली
◻️ समाजातील मोठेपण टिकवायचे असेल तर, दातृत्वाची भावना असणे गरजेचे
संगमनेर Live (लोणी) | समाजातील मोठेपण टिकवायचे असेल तर, दातृत्वाची भावना असणे खुप जरुरीचे आहे. हा संत तुकारामांनी दिलेला विचारच लोकनेते पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील यांच्या उक्ती आणि कृतीमध्ये होता. या विचारातूनच त्यांनी दाखविलेली तळमळ ही समाजाला न्याय देणारी ठरली असल्याचे गौरवोद्गार ह.भ.प उध्दव महाराज मंडलिक यांनी काढले.
लोकनेते पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील यांच्या सहाव्या पुण्यतिथी दिनाचे औचित्य साधून प्रवरा परिवाराच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या आदरांजली समारंभात ह.भ.प उध्दव महाराज मंडलिक यांनी आपल्या किर्तन सेवेतून स्व. बाळासाहेब विखे पाटील यांचा जीवनपट उलगडून दाखवित संतांचा विचारच त्यांनी आपल्या कार्यातून कसा पुढे नेला याचे विवेचन केले. प्रारंभ पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या मातोश्री हिराबेन मोदीजी यांनाही श्रध्दांजली वाहण्यात आली.
महसूल मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील, माजी मंत्री आण्णासाहेब म्हस्के पाटील, खासदार डॉ. सुजय विखे पाटील, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ. शालिनीताई विखे पाटील, गणेश कारखान्याचे चेअरमन मुकूंदराव सदाफळ, अभिमत विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. व्ही. एम मगरे, दिपक पठारे, वसंतराव देशमुख, किसनराव विखे, नंदू राठी, सरंपच कल्पना विखे, उपसरपंच गणेश विखे, अनिल विखे, चांगदेव विखे यांच्यासह प्रवरा उद्योग समुहातील सर्व संस्थाचे पदाधिकारी कार्यकर्ते याप्रसंगी उपस्थित होते.
आपल्या विवेचनात उध्दव ह.भ.प महाराज मंडलीक म्हणाले की, पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील यांचे जीवन म्हणजे समाजासाठी पोटतिडकेने काम करणारे होते. स्वत:चे दु:ख बाजुला ठेवून समाजासोबत राहुन दातृत्वाचा गुण त्यांच्या व्यक्तिमत्वात होता. पद्मश्रींचे स्वप्न विचारातून पुढे घेवून जाणे हेच त्यांचे ध्येय होते, परमेश्वरच अशा माणसांना समाजाची सेवा करायला पाठवित असतो असे त्यांनी सांगितले.
स्व. बाळासाहेब विखे पाटील यांनी सर्व क्षेत्रात आपले योगदान देताना अध्यात्मिक क्षेत्रालाही जवळ केले. यातूनच त्यांच्या प्रत्येक निर्णयात हा संताचा विचार अभिप्रेत होत होता. संत तुकारामांनी ‘जया अंगी मोठेपण’ हा विचार दिला या विचारातूनच डॉ. विखे पाटलांनी वेळप्रसंगी समाजाला अंगावर घेवून लोकहिताचे निर्णय केले आणि काही वेळा निर्णय घेण्यासही भाग पाडले. कारण समाज कार्याची तळमळ त्यांच्या अंगात होती. समाजाप्रती औदार्य दाखविण्याचा त्यांचा स्वभाव होता. त्यामुळेच या परिसरात त्यांनी उभे केलेले काम हे समाजाप्रती एक प्रकारचे दानच ठरले. यातूनच ज्ञानदानाचा हा महाज्ञन अखंडपणे तेवत असल्याचा गौरवपुर्ण उल्लेख त्यांनी केला.
माजीमंत्री आण्णासाहेब म्हस्के पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त करुन, लोकनेते पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील यांच्या समर्पित जीवनपटाचा आढावा आपल्या भाषणात घेतला. ह.भ.प उध्दव महाराज मंडलिक यांचा सत्कार महसूल मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला. प्रवरा परिसरात सामाजिक उपक्रमांतून लोकनेते पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील यांना अभिवादन करण्यात आले.