◻️ पालकमंत्र्यानी नगर येथे घेतला विविध विषयाचा आढावा
◻️ जिल्ह्यातील सर्वसामान्य नागरिकांच्या पालकमंत्र्यांनी जाणून घेतल्या अडी-अडचणी
संगमनेर Live (अहमदनगर) | पिक विम्या पासून शेतकरी दूर जाणे हे चित्र चिंताजनक आहे. तालुक्यातील शेतकरी संख्या आणि पीक विमा योजनेचा लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांच्या संख्येतील तफावत खूप मोठी असल्याने कृषी विभागाला विमा योजनेच्या संदर्भात प्रभावी काम करावे लागेल. सरकारी प्रकल्पांना गौण खनिजांची कोणतीही अडचण येणार नाही यासाठी संबधित विभागांनी समन्वयाने काम करण्याच्या सूचना महसूल तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.
राज्याचे महसूल, पशुसंवर्धन व दुग्ध विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज (४ डिसेंबर) जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित बैठकीत महसूल, कृषी, महाविरण आणि पुरवठा विभागाच्या कामकाजाचा आढावा जाणून विभागात असलेल्या अडचणी जाणून घेतल्या.
या बैठकीस आमदार बबनराव पाचपुते, जिल्हाधिकारी डॉ. राजेन्द्र भोसले, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, अपर जिल्हाधिकारी सुहास मापारी, अतिरिक्त पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे यांच्यासह सर्व उप विभागीय अधिकारी, तहसीलदार यांच्यासह प्रमुख अधिकारी उपस्थित होते.
पालकमंत्री विखे पाटील म्हणाले की, जिल्ह्यातील खाण पट्टयामधुन अवैधरित्या गौण खनिजाचे उत्खनन होणार नाही, यासाठी आवश्यक त्या उपाययोजना अंमलात आणत विकास कामांसाठी आवश्यक असलेल्या खनिजासाठी महसूल विभागाकडून रीतसर परवानगी घेण्याची सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.
यावेळी पालकमंत्र्यांनी पशु धनातील लम्पि त्वचा आजार, अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची भरपाई, पीकविमा, अन्नधान्य वितरण, वीज वितरण आदी विषयांचा उपस्थित अधिकाऱ्यांकडून सविस्तर आढावाही घेतला.
जिल्ह्यातील सर्वसामान्य नागरिकांच्या पालकमंत्र्यांनी जाणून घेतल्या अडी-अडचणी..
तदनंतर पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात जनता दरबारचे आयोजन केले होते. जिल्ह्यातील सर्वसामान्य व्यक्तींची प्रत्यक्ष भेट घेत त्यांची निवेदने स्वीकारत त्यांच्या असलेल्या अडी-अडचणी, असलेले प्रश्न ऐकून घेत त्या सोडविण्यासाठी प्रयत्नशील असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
दरम्यान यावेळी जिल्हाभरातून नागरिक, विविध शिष्टमंडळ, विविध संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.