◻️ विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या वक्तव्याचा परखड शब्दात ना. विखे पाटील यांच्याकडून निषेध
◻️ नैराष्येच्या भावनेतून बेताल वक्तव्य करण्याची स्पर्धा आघाडीच्या नेत्यांमध्ये सुरु
◻️ अजित पवारांचं वक्तव्य हे त्यांच्या वैचारिक कोंडीचे लक्षण
संगमनेर Live (शिर्डी) | तीन पक्षांच्या भरकटलेल्या महाविकास आघाडीत सध्या फक्त संशयकल्लोळ वाढला आहे, त्यांच्यामध्ये कोणतीही एकवाक्यता राहीलेली नाही. त्यामुळेच नैराष्येच्या भावनेतून बेताल वक्तव्य करण्याची स्पर्धा आघाडीच्या नेत्यांमध्ये सुरु आहे. सोयीनुसार इतिहासामधील दाखले देणाऱ्यांना छत्रपती संभाजी महाराजांचे बलिदान मान्य कसे होणार.? असा प्रश्न उपस्थित करतानाच छत्रपती संभाजी महाराज सदैव ‘धर्मवीरच’ असतील असे स्पष्ट प्रतिपादन भाजपा नेते आणि महसूल मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले.
धर्मवीर संभाजी महाराज यांच्या संदर्भात विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केलेले अवमानकारक वक्तव्य आणि वारकरी सांप्रदायाच्या संदर्भात महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून केल्या जाणाऱ्या बेताल वक्तव्याचा निषेध करण्यासाठी शिर्डी येथे मंत्री ना. विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली निषेध मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. शिर्डीतील प्रमुख रस्त्यावरून काढण्यात आलेल्या या मोर्चाचे रुपांतर प्रांताधिकारी कार्यालयासमोर सभेमध्ये झाले. या सभेत मंत्री विखे पाटील यांनी महाविकास आघाडीच्या बेताल वक्तव्याचा परखड शब्दात निषेध केला.
अजित पवारांनी जे वक्तव्य केले हे त्यांच्या वैचारिक कोंडीचे लक्षण आहे. वास्तविक यापुर्वी त्यांनीच धर्मवीर म्हणून संभाजी राजेंचा उल्लेख समाज माध्यमातून केला होता. आता अशी कोणती उपरती झाली की, ते धर्मवीर नव्हते असे सांगण्याची वेळ तुमच्यावर आली. महाविकास आघाडीच्या नेत्यांचे हे नैराष्य आहे. त्या भावनेतूनच केवळ प्रसिध्दी मिळविण्यासाठी अशी वक्तव्य केली जात असल्याचा आरोप त्यांनी केला.
ज्यांच्या नावात अंधार आहे त्या प्रवक्त्यांकडून समाजाला कुठल्याही अपेक्षा नाहीत. त्यांना वारकरी सांप्रदाय माहीत नाही, देव देवताही मान्य नाहीत. केवळ इतिहासाची चिरफाड करायची, सोयीनुसार संदर्भ आणि दाखले द्यायचे आणि आपली राजकीय पोळी भाजून घ्यायची एवढाच अजेंडा महाविकास आघाडीचा सुरु असल्याची टिका करुन, मंत्री ना. विखे पाटील म्हणाले की, कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांवर टिका केल्यानंतरही युवासेनेचे नेते यात्रेत जावून त्यांना मिठ्या मारतात. राष्ट्रवादीचे नेते छत्रपती शिवाजी महाराजांना जाणते राजे म्हणण्याची आवश्यकता नाही असे विधान करतात. केवळ सोयीनुसार भूमिका घेत एकमेकांची पाठराखन करण्याचे काम महाविकास आघाडीमध्ये सुरु असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले.
या तीनही पक्षात आता एकवाक्यता राहीलेली नाही. शिंदे फडणवीस सरकारच्या कामामुळे आघाडी सरकारचे नेते आता सैरभैर झाले आहेत. मागील सहा महिन्यात या सरकारने घेतलेल्या चांगल्या निर्णयामुळे महाविकास आघाडीच्या नेत्यांना आता आपल्या अस्तित्वाची धास्ती वाटत असल्यामुळेच बेताल वक्तव्य करुन, चर्चेत राहण्याची स्पर्धा त्यांच्यामध्ये सुरु झाली आहे. परंतू आपल्या बेताल वक्तव्यांमुळे सामाजिक वातावरण कलुशित होत असल्याचे भानही यांना राहीलेले नाही. त्यामुळेच केलेले वक्तव्य मागे घेवून विरोधी पक्षनेत्यांनी माफी मागावी अन्यथा आत्मक्लेश करण्याचा सल्ला मंत्री ना. विखे पाटील यांनी दिला.
या सभेत बाळासाहेबांची शिवसेना पक्षाच्या सौ. अनिता जगताप, वारकरी सांप्रदायाचे नवनाथ महाराज म्हस्के, भाजपाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र गोंदकर, साईप्रसाद कुंभकर्ण यांची भाषण झाली. या मोर्चात संघटन सरचिटणीस नितीन दिनकर, शहर अध्यक्ष सचिन शिंदे, तालुका अध्यक्ष ज्ञानेश्वर गोंदकर, माजी नगराध्यक्ष अभय शेळके, कैलास कोते, मुकूंदराव सदाफळ, ओबीसी आघाडीचे बाळासाहेब गाडेकर, तालुका अध्यक्ष स्वानंद रासणे, भाजयुमोचे सतिष बावके, विश्वासराव कडू, नंदू राठी यांच्यासह राहाता तालुक्यातील भाजपाचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, भजनी मंडळ, नागरीक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.