◻️ प्रशासक नियुक्तीच्या आदेशाने अनेकाच्या उत्साहावर विरजण
◻️ निवडणूकीनतंर सत्ताकेंद्राची समीकरणे बदलण्याची शक्यता.?
संगमनेर Live | राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील ऑक्टोबर ते डिसेंबर २०२२ मध्ये मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतीच्या निवडणुका लांबणीवर टाकल्या आहेत. यात संगमनेर तालुक्यातील आश्वी बुद्रुक व आश्वी खुर्द या ग्रामपंचायतीचा समावेश आहे. त्यामुळे आश्वी बुद्रुक ग्रामपंचायतींचा कारभार आता प्रशासक म्हणून ग्रामविस्तार अधिकारी एस. जी. माळी तर आश्वी खुर्द ग्रामपंचायतीचा कारभार आर. आर. ठाकरे हे पाहणार असल्याचे आदेश संगमनेर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यानी पारित केले असल्याची माहिती मिळाली आहे.
नुकत्याचं संगमनेर तालुक्यातील ३७ ग्रामपंचायतीच्या दुसऱ्या टप्प्यातील पंचवार्षिक निवडणूका पार पडल्या असून विधानपरिषद निवडणूका जाहीर झाल्या आहेत. तर जिल्हापरिषद व पंचायत समित्याची निवडणूक जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे संगमनेर तालुक्यातील तिसऱ्या टप्प्यात असलेल्या आश्वी बुद्रुक व आश्वी खुर्द ग्रामपंचायतीच्या सरपंचाची ८ जानेवारी रोजी मुदत समाप्त झाल्याने या दोन्ही ग्रामपंचायतीची पंचवार्षिक निवडणूक लांबण्याची शक्यता असल्यामुळे या ग्रामपंचायतीवर प्रशासक म्हणून संगमनेर पंचायत समितीकडून ग्रामविस्तार अधिकारी एस. जी. माळी व आर. आर. ठाकरे यांची नेमणूक करण्यात आली आहे.
तालुक्यातील आश्वी बुद्रुक व आश्वी खुर्द ग्रामपंचायत सरपंचाची ८ जानेवारी रोजी मुदत संपली असली तरी निवडणूकीसाठी आवश्यक असलेली प्रकिया शासन स्तरावर आद्याप सुरु झालेली नाही. त्यामुळे आश्वी बुद्रुक व आश्वी खुर्द ग्रामपंचायतीवर प्रशासकाची नेमणूक करण्यात आली आहे.
आश्वी बुद्रुक येथे लोकनियुक्त सरपंच पदाची जागा अनुसूचित जमातीच्या उमेदवासाठी राखीव असून गावची लोकसंख्या ७ हजार व मतदार ४ हजार ८०० आहे. या ग्रामपंचायतीत सदंस्य संख्या १५ आहे. आश्वी खुर्द येथे लोकनियुक्त सरपंच पदाची जागा सर्वसाधारण महिलेसाठी राखीव आहे. गावची लोकसंख्या ४ हजार ३२२ व मतदार संख्या २ हजार ८०० आहे. या ग्रामपंचायतीत सदंस्य संख्या ११ आहे.
मागील पंचवार्षिकला डिसेंबर महिन्यात निवडणूका पार पडल्या होत्या. परंतू यावेळी जानेवारी महिना सुरु होऊनही या ग्रामपंचायत निवडणूकीबाबत कोणत्याही हालचाली प्रशासकीय स्तरावर होताना दिसत नाही. निवडणूकीसाठी आवश्यक असलेली प्रभाग रचना, प्रभागनिहाय आरक्षण सोडती व हरकती, प्रारुप याद्या व अंतिम मतदार याद्या तसेच त्यानतंर प्रत्यक्षात निवडणूक होणार आहे.
या सर्व प्रक्रियेसाठी किमान दोन ते तीन महिन्याचा कालावधी लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे ८ जानेवारी रोजी मुदत संपलेल्या आश्वी बुद्रुक व आश्वी खुर्द ग्रामपंचायतीबाबत निवडणूका लांबवणीवर पडण्याची चिन्ह असल्याने ग्रामपंचायतीवर प्रशासक नेमण्यात आले आहेत. सध्या आश्वी बुद्रुक ग्रामपंचायतीवर माजी मंत्री आ. बाळासाहेब थोरात याना मानणाऱ्या गटाचे वर्चस्व असून आश्वी खुर्द ग्रामपंचायतीवर महसूलमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील याना मानणाऱ्या गटाचे वर्चस्व असल्याने या ग्रामपंचायत निवडणूकीकडे नागरीकाचे लक्ष लागले आहे.
ग्रामपंचायतीच्या निवडणुकीची अद्याप काेणतीही घाेषणा झालेली नाही. त्यामुळे पुढील किती दिवस प्रशासकाची सत्ता या ग्रामपंचायतीवर राहणार हे मात्र सांगणे कठीण आहे. प्रशासक नियुक्त झाले तरी थेट सरपंचाची निवड हाेणार असल्याने या दोन्ही गावांत आजही निवडणूकीसाठी माेर्चेबांधणी सुरू असल्याचे चित्र दिसून येत असून गावातील प्रस्थापितांकडून सत्ता खेचून आणण्यासाठी तरुणांनी जेष्ठाच्या मार्गदर्शनाखाली नवीन समीकरणे आखणे सुरु केले आहे. मात्र निवडणुकांऐवजी प्रशासक नियुक्तीचे आदेश आले आणि सर्वाच्या उत्साहावर विरजण पडले.
दरम्यान प्रशासक काळात ग्रामविकासाला खीळ बसण्याची शक्यता नागरीकाकडून वर्तवली जात आहे. राज्याच्या ग्रामविकास विभागाने यापुर्वीचं आदेश काढून मुदत संपणाऱ्या राज्यातील ग्रामपंचायतींवर प्रशासक नियुक्त करण्याचे आदेश दिले हाेते. आता निवडणूक कधी हाेणार याकडे या दोन्ही गावातील जनतेचे लक्ष लागले आहे. ताेपर्यंत अनेक समीकरणे बदलण्याची शक्यता वर्तविली जात आहे.