जेष्ठ नागरिकांचा विचार करणारा पंतप्रधान मोदींच्या रुपाने प्रथमचं देशाला मिळाला - खा. डॉ. विखे

संगमनेर Live
0
◻️राष्ट्रीय वयोश्री योजनेतील लाभार्थींना साधन साहीत्याचे पिंपळगाव येथे वाटप

◻️नगर जिल्ह्यात वयोश्री योजनेतून ४२ हजार जेष्ठ नागरिकांना लाभ 

◻️शिंदे - फडणवीस सरकार आल्यानंतर सर्व सामान्य माणसाला दिलासा

◻️माफीयाराजच्या माध्यमातून तालुक्याच्या राजकारणात हैदोस

◻️निळवंडेच्या कामात खोडा घालू नका, या माजी मंत्री थोरातांच्या वक्तव्याची खा. विखेनी उडवली खिल्ली 

संगमनेर Live | देशातील जेष्ठ नागरिकांचा विचार करणारा पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या रुपाने प्रथमच देशाला मिळाला. राष्ट्रीय वयोश्री योजनेपासून ते जलजीवन मिशन पर्यतच्या सर्व योजनांमधून सर्वसामान्य नागरीकांचे हित जोपासण्याचा प्रयत्नच केंद्र सरकारच्या माध्यमातून होत असल्याचे प्रतिपादन खा. डॉ. सुजय विखे पाटील यांनी केले.

केंद्र सरकारने जेष्ठ नागरिकांसाठी सुरू केलेल्या राष्ट्रीय वयोश्री योजनेतील पात्र लाभार्थींना साधन साहीत्याचे वाटप करण्यासाठी तालुक्यातील पिंपळगाव येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात खा. विखे बोलत होते. नगर जिल्ह्यात या योजनेतून ४२ हजार जेष्ठ नागरिकांना साधन साहीत्याचा लाभ झाला असून सर्व लाभार्थीना पंतप्रधान मोदीनी मोफत साहीत्य देण्यासाठी सुरू केलेली योजना ग्रामीण भागातील वयोवृध्दापर्यत पोहचविण्यात मोठे समाधान मिळाले असल्याचे त्यांनी सांगितले.

केंद्र सरकाराने समाजातील प्रत्येक घटकासाठी योजना सुरू केल्या आहेत. यामध्ये ग्रामीण भागात जलजीवन मिशन सारख्या योजनेतून नळाद्वारे पाणी देण्यासाठी केंद्र सरकारने निधी उपलब्ध करून दिला असल्याचे सांगून खा. विखे म्हणाले की दिलेल्या सर्व आश्वासनाची पूर्तता करताना २०२४ सालापर्यत प्रत्येक गावात या योजनांची काम पूर्ण झाली असतील. हे काम फक्त केंद्र सरकारच्या महत्वकांक्षी निर्णयामुळे होत असून श्रेय कोणीही घेत असले तरी यामागे पंतप्रधानांची दूरदृष्टी असल्याचे त्यांनी सांगितले.

कोव्हीड संकट असो की त्यानंतर झालेले मोफत लसीकरण मोफत धान्य आणि किसान सन्मान योजनेतून मिळणारे सहा हजार रुपये देण्याचा निर्णय करणारे पंतप्रधान मोदीजी एकमेव असल्याचे त्यांनी सांगितले.

राज्यात शिंदे - फडणवीस सरकार आल्यानंतर ज्या गतीने निर्णय होत आहे त्यातून सर्व सामान्य माणसाला दिलासा मिळत आहे. महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या पाठपुराव्यामुळे निधीची उपलब्धता होत असून मागील सरकार मध्ये फक्त वेळ वाया घालविण्याचे काम झाले. उत्तर नगर जिल्ह्याला वरदान ठरणाऱ्या निळवंडे धरण कालव्यांच्या कामांना पाचवी सुधारीत प्रशासकीय मान्यता देण्याचा महत्वपूर्ण निर्णय राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीत घेण्यात आल्याकडे लक्ष वेधून खा. विखे म्हणाले की यामुळे जिरायती भागातील शेतकऱ्यांना दिलासा देण्याचे मोठे काम राज्य सरकारकडून झाले असल्याचे त्यांनी सांगितले.

यापुर्वी तालुक्यात फक्त मंत्र्याचे तळवे चाटून वाळू माफीयांचा हैदोस घालत होते. या वाळूच्या पैशाने एक पिढी बरबाद केली. सामाजिक वातावरण कलुषित केले. शासनाचा महसूल बुडवणाऱ्या व्यक्ति विरोधात केलेली कारवाई सूडाच्या भावनेतून कशी म्हणता असा सवाल करून या  माफीयाराजच्या माध्यमातून तालुक्याच्या राजकारणात हैदोस सुरू होता असा थेट आरोप त्यांनी केला.

यापुढे महसूलचे अधिकारी माफीयांच्या मागे फिरताना अधिकारी दिसणार नाहीत. सामान्य माणसासाठी काम करतील. महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली वाळू धोरणाचा मसूदा नुकत्याच संपन्न झालेल्या महसूल परीषदेत तयार झाला असून लवकरच याबाबत निर्णय होवून सामान्य माणसाला स्वस्त दरात वाळू उपलब्ध होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

याप्रसंगी खा. विखे पाटील यांनी स्व. अशोकराव मोरे यांच्या कार्याची आठवण करून त्यांना सुमनांजली अर्पण केली. कार्यक्रमास भाजपाचे तालुका अध्यक्ष सतीश कानवडे, डॉ. अशोक इथापे, वसंतराव देशमुख, बापुसाहेब गुळवे, रोहीदास डेरे, डॉ. सोमनाथ कानवडे, अशोक कानवडे, संजय मोरे, अमोल कानवडे, अमोल खताळ, राहूल भोईर, वैभव लांडगे यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

निळवंडेच्या कामात खोडा घालू नका या माजी मंत्री थोरातांच्या वक्तव्याची खिल्ली उडवताना खा. विखे म्हणाले की आजारी असल्यामुळे त्यांना काय काय बदल आणि कोणामुळे निर्णय झाले हे माहीती नव्हते. आता त्यांना सर्व माहीती मिळेल आणि महीन्याभरात त्यांची वक्तव्य बदलतील असा मिश्कील टोला लगावला.

काॅग्रेस नेते राहूल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांवर केलेल्या टिकेचा समाचार घेतांना डॉ. विखे म्हणाले की पंतप्रधान मोदी यांच्यावर टिका करण्यासाठी कोणतीही जागा नाही. त्यामुळेच महापुरुषांवर टिका करून प्रसिध्दी मिळविण्याचा प्रयत्न देशातील राज्यातील नेते करतात. कश्मिर मध्ये मोदीनी तिरंगा फडकवला तेव्हा परीस्थिती वेगळी होती. आज तुम्ही गेलात तेव्हा मोदीजीमुळे बदललेल्या परीस्थीतीमुळेच तेव्हा हे स्वातंत्र्य कोणामुळे याचा विचार त्यांनी करावा

Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !