◻️ मनोली गावचे कै. सुखदेव नाथाजी पाटील भागवत यांचा बुधवार दि. १ मार्च रोजी दशक्रिया विधी
संगमनेर तालुक्यातील मनोली येथिल जेष्ठ व्यक्तीमत्व तसेच अध्यात्मिक, सामाजिक, शैक्षणिक व राजकीय जडनघडणीचे शिलेदार असलेले कै. सुखदेव नाथाजी पाटील भागवत (वय - ८०) यांचे वृध्दापकाळाने सोमवार दि. २० फेब्रुवारी २०२३ रोजी निधन झाले असून त्याच्या निधनामुळे मनोली गावच्या विकासाचा सच्चा मार्गदर्शक हारपल्याची प्रतिक्रिया ग्रामस्थ, नातेवाईक व मित्रपरिवाराने व्यक्तं केली आहे.
क्षेत्र कोणतेही असो आपल्या परिने आपण समाजातील लोंकासाठी झटले पाहिजे. आपल्या ओळखीचा, पदांचा वापर सामान्य लोंकाना झाला पाहिजे. हि तळमळ त्याच्या कार्यशिलतेत होती. त्यामुळे सर्व सामान्यासोबत फिरताना, बसताना त्यांना कधीच कमीपणा वाटला नाही. “जिथे कमी तिथे मी” अशा परोपकारी वृत्तीने काम करत “शुन्यातुन माणुस विश्व उभे करु शकतो” याचा वस्तुपाठ कै. सुखदेव पाटील भागवत यानी आपल्या पुढच्या पिढीला घालून दिला आहे. त्यामुळेचं आहोरात्र गोर-गरीबासाठी झटणाऱ्या कै. सुखदेव पाटील यानी जनसेवेचे दिलेले बाळकडू त्याचा मुलगा मच्छिद्रं भागवत याच्यांत ओत पोत भरलेला असल्यामुळे त्याच्याकडून मागील अनेक वर्षापासून मनोली गावातील विकास कामाबरोबरचं गरीबाची व सामान्य लोंकाची सेवा घडत आहे.
कै. सुखदेव पाटील यांचे बालपण मनोली येथे गेले होते. ७ वी पर्यत शिक्षण झाले होते. त्याचां विवाह जोर्वे येथिल काकड कुटुंबातील जिजाबाई यांच्याशी झाला होता. शेतकरी कुटुंबातील कै. सुखदेव पाटील भागवत यानी गावच्या विकासाचा ध्यास बाळगत १९८५ साली ग्रामपंचायतीची पहिली निवडणूक लढवली होती. यावेळी मोठ्या मताधिक्याने त्याचा विजय झाल्यामुळे उप सरपंच पदाची माळ त्याच्या गळ्यात पडली होती. हाती आलेल्या संधीचे सोने करत कै. सुखदेव पाटील यानी विविध विकास कामाच्या योजनासाठी सतत पाठपुरावा करत अनेक योजना यशस्वी पणे गावात राबवल्या होत्या. हाडाचे शेतकरी असल्यामुळे यांच काळात त्यानी गावातील सेवा सहकारी सोसायटी, दुध संस्था आदि ठिकाणी चेअरमन, व्हा. चेअरमन व संचालक म्हणून काम करताना ‘जनतेची सेवा’ हा ध्यास घेतल्यामुळे विविध संस्थानमध्ये आपल्या कामाचा वेगळा ठसा उमटवला आहे.
राजकीय क्षेत्रात कै. सुखदेव पाटील कार्यरत असले तरी त्यानी आपल्या शेती व कुटुंबाकडे कधीही दुर्लक्ष होऊ दिले नाही. पाच मुली व एक मुलाला शिक्षण व संस्काराची शिदोरी देताना मात्र कधीही काटकसर केली नाही. आपल्या शेतीत नेहमी नवनवीन प्रयोग राबवण्याऱ्या कै. सुखदेव पाटील यानी गावातील शेतकऱ्याची पाण्याची गरज ओळखून आपल्या भावकीच्या मदतीने १९९१ साली रहिमपूर येथून पहिली जलवाहिनी मनोली येथे आणून परिसर हिरवागार केल्यामुळे खऱ्या अर्थाने सुबकता येण्यास सुरवात झाली असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.
कै. सुखदेव पाटील भागवत याना आध्यात्म व धार्मिक कार्याची आवड असल्यामुळे गावातील लहान मोठ्या धार्मिक कार्यक्रमात हिरहिरीने ते सहभागी होत असत. त्यानी विविध धार्मिक स्थळाना भेटी तर दिल्याचं शिवाय आपल्या बरोबर नातेवाईक, मित्र परिवार व ग्रामस्थाना चारधाम यात्रा सुध्दा घडवली होती.
गावच्या राजकारणात मोठा दबदबा निर्माण करत तेवढ्याच ताकदीने ह्या जबाबदाऱ्या ते पेलत होते. प्रत्येकाशी सहज संपर्क आणि आपलं नातं जपणं यात त्यांचा हातखंडा होता. आपल्या परोपकारी वृत्ती सोबतच माणसे पारखण्याची आणि जोपासण्याच्या गुणांमुळेचं राज्याचे महसूल मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील याच्या परिवारासोबत कै. सुखदेव पाटील यांचे जिव्हाळ्याचे संबध होते. त्यामुळे त्यांच्या निधनानतंर ना. विखे पाटील यानी ‘एक सच्चा आणि समर्पित कार्यकर्ता हरपल्याच्या शोकभावना व्यक्त करताना मनोली गावच्या विकासासाठी त्यांनी दिलेले योगदान हे कायम स्मरणात राहील', अशा शब्दात श्रध्दांजली अर्पण केली आहे.
दरम्यान कै. सुखदेव पाटील भागवत यांच्या पश्चात पत्नी गं. भा. जिजाबाई सुखदेव भागवत, भाऊ यादव नाथाजी भागवत, निवृत्ती नाथाजी भागवत, पुतणे ज्ञानदेव कारभारी भागवत, मुलगा मच्छिंद्र सुखदेव भागवत, सून सौ. विजया मच्छिंद्र भागवत, मुलगी सौ. भिमबाई बबन बढे, सौ. शोभा सोन्याबापू ठोसर, सौ. बेबीताई संपत तळोले, सौ. मंगल बाबासाहेब थेटे, सौ. मनिषा अनिल तांबे, पुतणी सौ. सुनंदा शांताराम सुपेकर, गं. भा. सगिता शिवाजी तळोले, नात कु. तेजल मच्छिद्रं भागवत व नातु चि. गौरव मच्छिद्रं भागवत असा मोठा परिवार आहे.
कै. सुखदेव पाटील आता कधीही परत न येणाऱ्या अनंताच्या प्रवासाला गेले असले, तरी ते जे जगले, जे निर्माण केलं ते येणाऱ्या अनेक पिढ्यासाठी प्रेरणादायी असेल हे मात्र नक्की.!
अशा या मानवतेच्या पुजाऱ्याला संगमनेर Live परिवाराकडून दशक्रिया विधीनिमित्त भावपुर्ण श्रध्दांजली.!
मार्गदर्शन व संकलन :- पत्रकार संजय गायकवाड
शब्दाकन :- पत्रकार अनिल शेळके