◻️ बाळकृष्ण गोरे, डॉ. योगेश पाटील व डॉ. कुमार चोथानी यांना साई रत्न पुरस्कार
◻️ समाजातील अंधार वाढत असताना सोनगाव पंचक्रोशीतील साईभक्ताचे दीपस्तंभासारखे काम
संगमनेर Live | मावळतीला गेलेल्या सूर्यनारायण व त्याच्या संधी प्रकाशात साईभक्त तथा प्रसिद्ध गायक विश्वनाथ ओझा यांनी गणपतीला नमन करणारे पहिले भजन म्हटले आणि राहुरी तालुक्यातील माळेवाडी - डुकरेवाडी येथिल साई मंदिराचा वर्धापनदिन व साई रत्न पुरस्कार वितरण सोहळा भक्तीमय वातावरणात संपन्न झाला.
यावेळी साईभक्त तथा प्रसिद्ध गायक विश्वनाथ ओझा यांनी गणपतीला नमन करणारे पहिले भजन सुरु केले आणि समोर उपस्थित असलेले शेकडो भक्तगण साई भजनात तल्लीन झाले होते. तेव्हा साई भजन संध्या आयोजनामागचा साईच्या नामस्मरणाचा खरा उद्देश सफल झाल्याचा आनंद आयोजकाच्या चेहऱ्यावर दिसत होता. भजन संध्या संपताच यानतंर साई रत्न पुरस्काराची घोषणा करून वितरण सोहळा सुरू झाला. यावेळी दशावतार कलावंत बाळकृष्ण गोरे, डॉ. योगेश पाटील आणि डॉक्टर कुमार चोथानी यांना पुरस्कार प्रदान करताना साई भक्तांनी केलेला साई नामाच्या गजराने आसमंत दुमदुमून गेला होता.
याप्रसंगी पुरस्काराला उत्तर देताना तीनही पुरस्कार विजेत्यांनी भावना व्यक्त करताना “पुरस्काराबरोबर आज या बाबांच्या भूमीत आम्हाला मिळालेले प्रेम, भेटलेली माणसं आमच्या कामाला बळ देतील” असे म्हटले
यावेळी ज्यांच्या हस्तें हा पुरस्कार देण्यात आला ते उद्योजक लालजी चौधरी, भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलनचे विश्वस्त अँड. शामा आसावा, राहुरीच्या तहसीलदार संध्या दळवी यांनी समाजातील अंधार वाढत असताना सोनगाव पंचक्रोशीतील साईभक्त करत असलेल्या कामाला दीपस्तंभ संबोधले. मूर्तीतील ईश्वर पुजेबरोबर निसर्गातील ईश्वराची पूजन करण्याच्या संवेदनशीलतेला मनापासून सलाम केला.
याप्रसंगी मंदिराचे रंगकाम, कार्यक्रमासाठी मदत करणाऱ्या साई भक्तांचा साईंच्या दरबारात गौरव करण्यात आला. यानतंर साईंची आरती व उपस्थित भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.
दरम्यान कार्यक्रम थोडा लांबला असला तरीही महाप्रसाद घेतल्यानंतर घराच्या ओढीने निघालेल्या प्रत्येक भाविकाच्या चेहऱ्यावर अध्यात्म, विचारांचा ठेवा आणि महाप्रसाद रुपी पूर्णब्रह्म मिळाल्याचा आनंद दिसत होता. तिच आयोजक असलेल्या साई सेवकांच्या निस्वार्थ कामाची पावती होती.
**साभार :- विकास अंत्रे (वृत्तसंपादक दै. पुण्यनगरी)**