संगमनेर Live | विधिमंडळ पक्षनेते व मा. महसूल मंत्री लोकनेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्या वाढदिवसानिमित्त अमृतवाहिनी बँक व राजहंस संघाच्या वतीने राजहंस दुग्ध विकास कर्ज योजना सुरू करण्यात आली असून या अंतर्गत गाई खरेदी व दूध पुरवठा कामी ५२८ दूध उत्पादकांना ८ कोटी रुपयांचे कर्ज वितरण केले आहे.
सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात अमृतवाहिनी सहकारी बँक व संगमनेर तालुका सहकारी दूध संघ यांच्या संयुक्त विद्यमाने लोकनेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्या वाढदिवसानिमित्त दुग्ध विकास कर्ज योजनेच्या शुभारंभ राजहंस दूध संघ व निमगाव टेंभी येथील म्हाळसाकांत व निळकंठ दूध संस्था या ठिकाणी करण्यात आला. यावेळी राजहंस दूध संघाचे चेअरमन रणजीत सिंह देशमुख, अमृतवाहिनी बँकेचे चेअरमन सुधाकर जोशी, दूध संघाचे उपाध्यक्ष राजेंद्र चकोर, बँकेचे उपाध्यक्ष ॲड. नानासाहेब शिंदे, लक्ष्मणराव कुटे, आर. बी. राहणे दूध संघाचे कार्यकारी संचालक डॉ. सुजित खिलारी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंबादास वाणी, निमगाव टेबीचे सरपंच वर्पे, दूध संस्थेचे चेअरमन गोडसे, उपाध्यक्ष शिंदे, करपे,यांचेसह विविध पदाधिकारी व मान्यवर उपस्थित होते.
राजहंस दुग्धविकास कर्ज योजनेअंतर्गत शेतकरी व दूध उत्पादकांना भांडवली पुरवठ्यासाठी प्रत्येकी २ लाख रुपयांपर्यंत कर्ज उपलब्ध होणार आहे. या योजनेतून तालुक्यातील ५२८ शेतकऱ्यांना ८ कोटी रुपयांचे कर्ज मंजूर करण्यात आले आहे.
याप्रसंगी बोलताना रणजितसिंह देशमुख म्हणाले की, आमदार बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली दूध व्यवसायामुळे ग्रामीण अर्थव्यवस्था मजबूत झाली आहे. गुणवत्ता ही वैशिष्ट्य जपताना राजहंस दूध संघाने आपला देश पातळीवर लौकिक निर्माण केला असून दूध उत्पादकांना गाईचे आरोग्य, मुरघास, नवीन तंत्रज्ञानाचा वापर यांसह सातत्याने विविध सुविधा पुरविल्या आहेत. अमृतवाहिनी बँकेच्या सौजन्याने नव्याने सुरू होणाऱ्या या योजनेमुळे दूध वाढ होण्यास या योजनेचा लाभ होईल.
सुधाकर जोशी म्हणाले की, शेतकऱ्यांच्या जीवनात आर्थिक समृद्धीचा आनंद निर्माण करण्याचे काम अमृतवाहिनी बँकेने केले आहे. शेतकऱ्यांना सहज कर्ज उपलब्ध करून देताना त्यांच्या दूध व्यवसायात वाढ होण्याच्या दृष्टीने ही योजना अत्यंत उपयोगाची ठरणार आहे. या योजनेचा जास्तीत जास्त शेतकरी उत्पादकांनी लाभ घ्यावा असे आवाहनही त्यांनी केले.
दरम्यान या कार्यक्रमाचे प्रास्ताविक ॲड. नानासाहेब शिंदे यांनी केले तर राजेंद्र चकोर यांनी आभार मानले यावेळी परिसरातील शेतकरी, दूध उत्पादक, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.