इंदिरा गांधीप्रमाणे राहुल गांधी सुद्धा भाजपाचा पराभव करुन पंतप्रधान होतील - बाळासाहेब थोरात

संगमनेर Live
0
◻️ भाजपा सरकारकडून लोकशाही व संविधान संपवण्याचा प्रयत्न

◻️ भाजपा सरकारच्या हुकुमशाहीविरोधात रस्त्यावर उतरून संघर्ष करु

संगमनेर LIVE (मुंबई) | काँग्रेस नेते राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करण्याचा निर्णय अत्यंत दुर्दैवी आहे. कर्नाटकमधील २०१९ च्या एका सभेतील विधानाचा संदर्भ घेऊन खोटी तक्रार दाखल करत हा निर्णय घेतलेला आहे. राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करण्याचा प्रयत्न भाजपा मागील काही दिवसांपासून करत होते. हे सर्व जाणीवपूर्वक व ठरवून केलेले असून खासदारकी रद्द करण्याचा भारतीय जनता पक्षाच्या सरकारचा निर्णय हा लोकशाहीचा खून केला आहे, असा घणाघाती हल्ला महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे.

राहुल गांधी यांची खासदारकी रद्द केल्याचे समजात त्याचे पडसाद विधिमंडळात उमटले. महाविकास आघाडीने या घटनेचा निषेध करत सभात्याग केला व विधानभवनच्या पायऱ्यावर काळ्या फिती लावून मोदी सरकारचा धिक्कार केला. 

यावेळी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, विरोधी पक्षनेते अजित पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे गटनेते अजय चौधरी, समाजवादी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष अबू आझमी यांच्यासह मविआचे आमदार उपस्थित होते. 

यावेळी बोलताना काँग्रेस विधीमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात म्हणाले की, राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करण्याचा निर्णय हा लोकशाहीवरील हल्ला आहे. भारत जोडो यात्रेनंतर भारतीय जनता पक्ष राहुल गांधी यांना जास्तच घाबरू लागला आहे. लोकसभेत राहुलजी गांधी यांनी अदानी-मोदी संबंधाचा मुददा उपस्थित केला होता, त्यातूनच भाजपाने सुडबुद्धीने कारवाई केली आहे. 

केंब्रिज विद्यापीठातील विधानावर लोकसभेत बोलू दिले नाही, त्यांचा माईक बंद करण्यात आला. देशाची वाटचाल लोकशाहीकडून हुकूमशाहीकडे चालली आहे याचा हा पुरावा आहे.

स्व. इंदिरा गांधी यांनी अशाच प्रकारच्या व्यवस्थेचा सामना केला होता आता राहुलजी सुद्धा त्याच व्यवस्थेचा सामना करत आहेत. पण या अत्याचारी व्यवस्थेला तोंड देत इंदिराजी गांधी यांनी जनता पक्षाचा पराभव करत पुन्हा देशाच्या पंतप्रधान झाल्या. राहुलजी गांधीसुद्धा भाजपाचा पराभव करून देशाचे पंतप्रधान होतील असा विश्वासही थोरात यांनी व्यक्त केला.
Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !