जिल्हा विकासाच्या सर्व क्षेत्रात अग्रेसर राहण्याचे दृष्टीने प्रयत्न करणार - पालकमंत्री

संगमनेर Live
0
◻️ महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या ६३ व्या वर्धापन दिनानिमित्त पोलीस मुख्यालय येथे ध्वजारोहण 

◻️ जिल्ह्यातील ९ हजार ८७४ बांधकाम कामगारांना ४ कोटी ९३ लाख ७० हजार रूपयांचा लाभ

◻️ पालकमंत्री विखे पाटील यांनी पोलीस दलातर्फे मानवंदना स्विकारुन पोलीस परेडचे निरिक्षण केले

◻️ जिल्हयातील शहीद जवान वीरपत्नीना शासनामार्फत ताम्रपट प्रदान
 
संगमनेर LIVE (अहमदनगर) | जिल्हयाच्या सर्वांगीण विकासाचा संकल्प करुन जिल्हा सर्व क्षेत्रात अग्रेसर राहण्याचे दृष्टीने प्रयत्न करणार असून शासकीय योजना लोकाभिमुख करून त्याची अंमलबजावणी गतीने करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन राज्याचे महसूल, पशुसंवर्धन दुग्ध व्यवसाय विकास मंत्री तथा जिल्हयाचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज येथे केले.

महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या ६३ व्या वर्धापन दिनानिमित्त पोलीस मुख्यालय परेड ग्राऊंड येथे आयोजित मुख्य शासकीय समारंभात त्यांच्याहस्ते ध्वजारोहण झाले. त्यावेळी विखे पाटील बोलत होते. या समारंभात जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ, जिल्हा पोलीस अधिक्षक राकेश ओला, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. पंकज जावळे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संभाजी लांगोरे, जिल्हयातील स्वांतत्र सैनिक, ज्येष्ठ नागरिक, विविध विभागांचे विभाग प्रमुख आदी मान्यवर उपस्थित होते.

पालकमंत्री विखे पाटील म्हणाले की, जिल्ह्याला सर्वच स्तरावर पुढे घेऊन जाण्यासाठी राज्यसरकारचे प्रयत्न असून जिल्ह्याच्या प्रगतीसाठी रोजगार निर्मितीवर विशेष लक्ष केंद्रीत करण्यात आले आहे. तसेच तीर्थक्षेत्र पर्यटन, नैसर्गिक पर्यटन आणि औद्योगिक क्षेत्रातून ही रोजगार निर्मिती व्हावी. यासाठी वेगवेगळ्या क्षेत्रात यशस्वीपणे कार्यरत असलेल्या जिल्ह्यातील भूमीपत्रांनी आता योगदान देण्याचा निर्णय केला असून त्यांच्या सहकार्याने आयटी पार्क, लॉजीस्टीक पॉर्क निर्माण करण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत.

कौशल्य विकास कार्यक्रमातून येणाऱ्या काळात प्रत्येक तालुक्यात रोजगार मेळावे भरविले जाणार असून त्याचा ही लाभ जिल्ह्यातील तरूणांना करून देण्याचा निर्धार पालकमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला.

आजच्या कामगार दिनी असंघटीत कामगारांच्या प्रश्नांसाठी त्यांच्या पाठीशी उभे राहून त्यांना भक्कम आधार द्यावा लागेल. यासाठी शासनाने महाराष्ट्र इमारत व इतर बांधकांम कामगार कल्याणकारी महामंडळामार्फत योजना राबविण्यात येत असून जिल्ह्यातील ९ हजार ८७४ बांधकाम कामगारांना ४ कोटी ९३ लाख ७० हजार रूपयांचा लाभ देण्यात आला आहे.

जिल्ह्याच्या औद्योगिक विकासासाठी रोजगार, वृध्दी, गुंतवणूकीत वाढ व ‌स्वंयरोजगारासाठी प्रधानमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम व मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम यावर भर देण्यात आला आहे. या कार्यक्रमात ८१ लाभार्थ्यांची कर्ज प्रकरणे मंजूर झाली असून त्यांना ३ कोटी ७५ लाख रूपयांचे अनुदान मंजूर झाले आहे. मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमात ४८४ लाभार्थ्यांना १९ कोटी ७१ लाख रूपयांचे मार्जिन मनी अनुदान मंजूर झाले आहे असे त्यांनी यावेळी सांगितले.

मुख्य शासकीय ध्वजारोहण समारंभात पालकमंत्र्यांच्या हस्ते जिल्हयातील शहीद जवान वीरपत्नी श्रीमती संगीता दिलीप गांगुर्डे (मु. पो. कोंभळी, तालुका कर्जत) माजी सैनिक आदिनाथ नामदेव धनवटे (मु. पो. भेर्डापूर ता. श्रीरामपूर) यांना शासनामार्फत ताम्रपट प्रदान करण्यात आले. पोलीस विभागातील उल्लेखनीय सेवेबद्दल अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, पोलीस निरीक्षक विजय मारुती करे, पोलीस निरीक्षक मच्छिंद्र खाडे, पोलीस उपनिरीक्षक अण्णासाहेब बन्सी परदेशी, यांच्यासह चार पोलीस हवालदारांना पोलीस महासंचालक पदक देऊन यावेळी गौरवण्यात आले. 

२०२३ चा जिल्हा आदर्श तलाठी पुरस्कार, २०१३-१४ ते २०१९-२० या वर्षाचे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कार आणि २०२१ व २०२२ या वर्षाचे सूक्ष्म व लघू उद्योग घटकासाठी पुरस्कारांचे वितरण ही यावेळी करण्यात आले. महसूल विभागाच्या अनुकंपा धारकांच्या प्रतिक्षायादीतील गट-क उमेदवारांना तलाठी व महसूल सहायक संवर्गात अनुकंपा तत्वावर नियुक्तीपत्रे देण्यात आली. सरळसेवा भरतीत सन २०२१ अंतर्गत भूमी अभिलेख विभागातील भूकरमापक व राज्य उत्पादन शुल्क विभागातील दुय्यम निरीक्षक या पदासाठी अंतिम निवड झालेल्या उमेदवारांना नियुक्ती आदेश ही यावेळी देण्यात आले.

सामाजिक न्याय विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या विविध योजनांची अहमदनगर जिल्ह्याची यशोगाथा व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सामाजिक समता पर्व अंतर्गत विभागामार्फत राबविण्यात आलेल्या विविध उपक्रमांच्या माहिती पुस्तिकेचे प्रकाशन पालकमंत्री विखे पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.

कार्यक्रमाच्या ध्वजारोहणानंतर पालकमंत्री विखे पाटील यांनी पोलीस दलातर्फे मानवंदना स्विकारुन पोलीस परेडचे निरिक्षण केले. या परेड संचलनात पुरुष, महिला पोलीस पथक, होमगार्ड, पोलीस बँड पथक आदी सहभागी झाले होते. जिल्ह्यातील ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिकांशी ही पालकमंत्र्यांनी संवाद साधला. कार्यक्रमाला शासकीय अधिकारी - कर्मचारी, शालेय विद्यार्थी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
 
‍जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजारोहण..

महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या ६३ व्या वर्धापन दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी सिध्दाराम सालीमठ यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी अपर जिल्हाधिकारी सुहास मापारी, निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र कुमार पाटील, जिल्हाधिकारी कार्यालयातील सर्व उपजिल्हाधिकारी, विविध शाखांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !