◻️ ना. रामदास आठवले शिर्डी लोकसभा निवडणूक लढण्यास इच्छुक
◻️ खाजगी क्षेत्रासह पदोन्नती मधील आरक्षणाचा ठराव रिपाइं च्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत मंजूर
◻️ रिपाईला लोकसभेच्या २ आणि विधानसभेच्या १० जागा सोडण्याची मागणी
संगमनेर LIVE (शिर्डी) | रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारीणीची बैठक शिर्डी येथे पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय राज्यमंत्री ना. रामदास आठवले यांच्या अध्यक्षेत पार पडली.
ना. रामदास आठवले हे राज्यसभे चे खासदार असून त्यांची मुदत २०२६ पर्यंत आहे. त्यामुळे जर त्यांना लोकसभा निवडणूक लढण्यासाठी शिर्डी मतदारसंघात भाजप ने मित्रपक्ष म्हणून रिपाइं ला जागा सोडुन संधी दिली तर त्या निर्णयाचे आम्ही स्वागत करू. रिपब्लिकन पक्षाला मान्यता मिळण्यासाठी महाराष्ट्रात लोकसभेच्या दोन जागा जिंकणे आवश्यक आहे. त्यासाठी भाजप ने मित्रपक्ष म्हणून रिपाईला लोकसभेच्या २ आणि विधानसभेच्या १० जागा सोडाव्यात अशी मागणी करणारा ठराव आज रिपाइं च्या बैठकीत मंजूर झाल्याची माहिती ना. रामदास आठवले यांनी दिली.
या बैठकीमध्ये पदोन्नतीमधील आरक्षण आणि खाजगी क्षेत्रांतील अरक्षणसह अनेक महत्वपूर्ण विषयावरचे ठराव संमत झाले. ना. रामदास आठवले यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या राष्ट्रीय कार्यकारिणी बैठकीला रिपाइंचे नागालँडचे नवनिर्वाचित आमदार इम्ति चोबा, लिमा चँग, रिपाइंचे राष्ट्रीय सरचिटणीस अविनाश महातेकर, रिपाइंचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष राजाभाऊ सरवदे, सौ.सीमाताई आठवले, राज्य सरचिटणीस गौतम सोनवणे, विनोद निकाळजे, आंध्र प्रदेशचे नागेश्वरराव गौड, तेलंगणाचे रवी पसूला, छत्तीसगडच्या उषा, शिलाताई गांगुर्डे, अँड. बी. के. बर्वे, सुरेश बारशिंग, एम. एस. नंदा, गुजरात प्रभारी जतीन भुट्टा, तामिळनाडू अध्यक्ष फादर सुसाई, दिल्लीचे माजी मंत्री संदीप कुमार, हैद्राबादहुन गोरख सिंग, हरियाणाचे अध्यक्ष सोनू कुंडली आदी मान्यवर उपस्थित होते.
दरम्यान या बैठकीचे नियोजन रिपाईचे स्थानिक जिल्हा अध्यक्ष सुरेंद्र थोरात, संपर्क प्रमुख श्रीकांत भालेराव, विजय वाकचौरे, बाळासाहेब गायकवाड, अहमदनगर दक्षिण जिल्हा अध्यक्ष सुनील साळवे, पप्पू बनसोडे आदीनी यशस्वी केले.
बैठकीतील ठराव पुढीलप्रमाणे :-
१) आगामी २०२४ च्या लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका रिपब्लिकन पक्ष भाजपशी युती करुन आणि एनडीएचा घटक पक्ष म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात निवडणुकांना सामोरे जाईल असा ठराव झाला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नेतृत्व जगात प्रथम क्रमांकाचे असुन ते विश्वनेता ठरले आहेत.
भारतीय स्वातंत्र्याच्या ७५ व्या वर्षात म्हणजेच स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात देशाला जी-२० या आंतरराष्ट्रीय संघटनेचे अध्यक्षपद प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात लाभले. ही देशासाठी गौरवाची बाब असुन जी-२० अध्यक्षपदाचा बहुमान यशस्वीरित्या पार पाडीत असल्याबाबत प्रधानमंत्री नरेंद्र मोदींचे अभिनंदन करणारा ठराव या बैठकीत मंजुर करण्यात आला.
२) पदोन्नतीमध्ये (प्रमोशनमध्ये) रिझर्वेशनचा कायदा संसदेमध्ये केला पाहिजे आणि सुप्रिम कोर्टाने निर्देश दिल्याप्रमाणे प्रमोशनमध्ये रिझर्वेशन सर्व राज्यसरकारांनी अंमलबजावणी केली पाहिजे. तसेच एस.टी, एस.सी. ओ.बी.सी. अधिकारी कर्मचाऱ्यांना पदोन्नती मिळाली पाहिजे असाही ठराव मंजुर करण्यात आला.
३) देशात अनेक सरकारी यंत्रणाचे खाजगीकरण होत आहे त्यामुळे खाजगी क्षेत्रात आरक्षण लागु करण्यात यावे.
४) दलित आदिवासी गरीब भूमिहीनांना ५ एकर जमीन देण्याचा कार्यक्रम शासनाने राज्यात राबवावा. असाही ठराव मंजुर करण्यात आला
५) ओबीसी आणि सर्व जाती समूहांची जातीनिहाय जनगणना व्हावी.
६) भटक्या विमुक्तांसाठी ओबीसी मध्ये वर्गवारी करून भटक्या विमुक्तांना स्वतंत्र आरक्षण देण्यात यावे.
७) सफाई कामगार अनेक वर्षे कंत्राटी कामगार म्हणून काम करतात मात्र त्याचा त्यांना काही लाभ होत नाही. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार जे नित्याचे आहे ते काम कंत्राटी तत्वावर करू नये त्यात कायमस्वरूपी कामगार असावेत.
त्यामुळे सफाईकाम नित्याचेच असल्याने सफाईकामातील कंत्राटी पद्धत बंद करून कायमस्वरूपी सफाईकामगार नेमावेत. सफाई कामगारांना अनेक वर्षे कंत्राटी ठेवण्यात येते त्यात बदल करून त्यांना कायम करावे. ज्या कंत्राटी सफाईकामगारांना सध्या ५ वर्षे झाली आहेत त्यांना तातडीने कायमस्वरूपी तत्वावर सफाई कामगार पदाची नोकरी देण्यात यावी. असाही ठराव मंजुर करण्यात आला.
८) तसेच महिलांना विधानसभेमध्ये आणि लोकसभेमध्ये ३३ टक्के देण्यात आले पाहिजे आणि त्याबाबतचा कायदा संसदेत झाला पाहिजे. असाही ठराव आजच्या बैठकीत संमत करण्यात आला.
९) अमेरिकेत न्यूयॉर्क मधील युनोच्या मुख्यालयात (संयुक्त राष्ट्र महासंघ मुख्यालयात) महामानव डाँ. बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा उभारण्यात आला पाहिजे. तसेच अरबी समुद्र, हिंदी महासागर आणि पश्चिम बंगालचा उपसागर हे तिन समुद्र ज्या कन्याकुमारीच्या ठिकाणी एकत्र येतात त्या ठिकाणी डाँ. बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा उभारण्यात यावा असाही ठराव मंजुर करण्यात आला.